सोलापूर: गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाने दिवाळीप्रमाणे आनंदाचा शिधा जाहीर केला होता. ग्रामीण भागातील गोदामामध्ये बहुतांश भागात माल आला आहे, मात्र पिशव्या नसल्याने तो अद्याप रेशन दुकानात गेला नाही. आनंदाच्या शिध्या’चा माल गोदामातच आहे.
१४ एप्रिलपर्यंत लोकांना किट मिळणार का ? असा प्रश्न कार्डधारकांना पडला आहे. शासनाने दिवाळीप्रमाणे रेशन कार्डधारकांना अवघ्या १०० रुपयात प्रति किलो रवा, चना, साखर व एक किलो पामतेलसह किट देण्याची घोषणा केली होती.
गुढीपाडव्यापासून या शिधा वाटपाला सुरुवात होणार होती. मात्र, पाडवा झाला तरी माल पुरवठा विभागाला प्राप्त झाला नाही, गुढीपाडव्यानंतर जिल्ह्यातील गोदामांमध्ये टप्प्याटप्प्याने माल येण्यास सुरुवात झाली. १९ गोदामांपैकी १५ ठिकाणी माल प्राप्त झाला आहे. १९ पैकी १८ गोदामात रवा प्राप्त झाला नाही . काही ठिकाणी साखर, चना डाळ, पामतेल मिळाले नाही.
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, करमाळा, जेऊर, पंढरपूर, अनवली, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस-१, माळशिरवस-२, नातेपुते, मंद्रुप अक्कलकोट, बार्शी वैराग या ठीकाणी जिल्हा पुरवठा विभागाचे गोदाम आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने ३ लाख ७० हजार ४२१ कीटची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. गुढीपाडव्यानंतर टप्प्याटप्प्याने माल गोदामात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, त्यापैकी बार्शीवगळता एकाही ठिकाणी रवा पोहोचला नाही.
सोबत देण्यात येणारी पिशवी नसल्याने पुरवठा विभागाला कीट तयार करता येत नाही.जिल्ह्यासाठी ३ लाख ४० हजार किलो रव्याची मागणी केली होती. बार्शी येथे फक्त ३० हजार किलो रवा प्राप्त झाला आहे. १२ तालुक्यांसाठी २ लाख ८६ हजार ५०६ किलो साखरेची मागणी केली आहे, मात्र ८३ हज ९१५ किलो प्राप्त झाली आहे. चनाडाळ २ लाख ३२ हजार ८७२ किलोची मागणी केली होती. एक लाख ३७ हजार ५४९ इतकी प्राप्त झाली आहे. दोन लाख २६७ किलो पामतेलची आवश्यकता आहे. मात्र एक लाख ७० हजार १५४ प्राप्त झाले आहे.
शासनाने खासगी कॉन्ट्रॅक्टदारांना दिला ठेका :
आम्ही त्यांना दररोज संपर्क करत आहोत. पुढील एक-दोन दिवसात माल गोदामात दाखल होईल त्यानंतर तो तत्काळ रेशन दुकानामार्फत वितरित केला जाईल. असे जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे म्हणाल्या.
शासकीय गोदामात आनंदाच्या शिध्याचा माल दाखल झाला आहे. कमी अधिक प्रमाण असून, तेथेही पिशव्या पोहोचल्या नाहीत. त्यामुळे रेशन दुकानदारांना अद्याप माल मिळाला नसून त्याचे वितरण होत नाही.