सोलापूर : वारसदार असताना महिलेच्या बनावट सह्या करून पतीच्या विम्याचे २३ लाख ४२ हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी, सासू, सासऱ्यासह एलआयसी एजंटवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सासू- हसिना फैज अहमद शेख, सासरे- फैज अहमद बशिरअली शेख, एलआयसी एजंट आर. एस. कराळे (सर्व रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी आफरीन जावेद शेख (वय २१, रा. महात्मा गांधी नगर, जि. लातूर) यांचे पती जावेद फैज अहमद शेख हे हयात असताना त्यांनी जीवन महामंडळ सोलापूर येथे विमा उतरवला होता. विम्यावर त्यांनी पत्नी आफरीन शेख व आई हसिना शेख या दोघींना ५०-५० टक्के हक्कदार केले होते.
कालांतराने जावेद शेख यांचे निधन झाले, त्यानंतर पत्नी आफरीन शेख यांच्या हक्काचे ११ लाख ७२ हजार रुपये तिला मिळू नयेत म्हणून तिघांनी संगनमत केले. एलआयसी ऑफिस येथे फिर्यादीच्या नावे खोटा अर्ज करून त्यावर आफरीन शेख यांच्या बनावट सह्या केल्या. २३ लाख ४२ हजार रुपये हसिना शेख यांनी परस्पर स्वतःच्या नावे घेऊन फसवणूक केली. विम्याची रक्कम मिळाल्यानंतर आफरीन शेख यांच्या हिश्श्याचे ११ लाख ७२ हजार रुपये दिले नाहीत.
शिवाय काही माहिती न देता आफरीन यांची मुलगी सबिरा जावेद शेख हिच्या नावे ११ लाख ४७ हजार रुपयाचा विमा उतरवला. विमाधारक म्हणून फैज अहमद बशीरअली शेख यांनी स्वतःचे नाव लावले. अशी फिर्याद आफरीन शेख यांनी दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक डोंगरे करीत आहेत.