सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन बोर्डाची शुक्रवारी होणारी बैठक झालीच नाही. यामुळे उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाचा निर्णय पुन्हा खोळंबला आहे.
थांबवलेले काम सुरू करण्यासंदर्भात आदेश देण्यासाठी चेअरमन असीम गुप्ता यांना वेळ नाही तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी ठोस भूमिका घ्यायला तयार नाहीत त्यामुळे सोलापूरला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शुक्रवारी, ६ जानेवारी रोजीच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन बोर्डाच्या बैठकीमध्ये पोचमपाड कंपनीच्या संदर्भात काय निर्णय होणार ? त्याचबरोबर वर्क ऑर्डर यापूर्वीच दिलेल्या सध्याच्या लक्ष्मी कंपनीस पुन्हा पूर्ववत काम सुरू करण्याचे आदेश चेअरमन गुप्ता हे देतील का ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. पण शुक्रवारचीही बैठक झालीच नाही. यामुळे पुढे होणा-या बैठकीपर्यंत समांतर जलवाहिनी कामाचा निर्णय प्रलंबित राहणार आहे.
स्मार्ट सिटीकडून दुस-यांदा टेंडर प्रक्रिया राबवून कोल्हापूरच्या लक्ष्मी इंजिनिअंिरग कंपनीला ६३९ कोटींच्या योजनेचा मक्ता देण्यात आला. मात्र २४ नोव्हेंबर २०२२ रोजी तत्कालीन सीईओ ढेंगळे पाटील यांनी समांतर जलवाहिनीचे काम थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर १५ डिसेंबर २०२२ रोजी स्मार्ट सिटी कार्पोरेशन बोर्डाची बैठक चेअरमन असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समांतर जलवाहिनीचे यापूर्वीचा मक्ता रद्द केलेल्या हैदराबादच्या पोचमपाड कंपनीने पुन्हा हे काम करण्यासंदर्भातला प्रस्ताव बोर्डाकडे सादर केल्याचा गौप्यस्फोट गुप्ता यांनी केला होता. मात्र यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊनच येत्या ६ जानेवारीच्या बैठकीत यावर आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल इतकेच नव्हे तर स्मार्ट सिटी अंतर्गतच्या काही कामात अनियमितता असल्याचे कबूल करत या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले होते. मात्र ही बैठकच झाली नाही.
उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीचे काम अचानकपणे कार्यमुक्तीपूर्वी तत्कालीन सीईओंनी सध्याच्या लक्ष्मी कंपनीचे काम का थांबवले ? तसेच त्यानंतर झालेल्या स्मार्ट सिटी बोर्डाच्या बैठकीमध्ये चेअरमन असीम गुप्ता यांनी इतिवृत्तास मान्यता देऊन थांबवलेले लक्ष्मी कंपनीचे काम सुरू करण्याचे पुन्हा आदेश का दिले नाहीत ? इतिवृत्तावर सही करण्यास विलंब का लागला ? यामध्ये नेमकं गौडबंगाल काय ? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
वास्तविक पाहता स्मार्ट सिटी कार्पोरेशनचे चेअरमन असीम गुप्ता हे ई-मेलद्वारेही आदेश देऊन शकतात. मात्र बैठकही नाही आणि कोणत्याही प्रकारचे आदेश ही दिले जात नाहीत. त्यामुळे समांतर जलवाहिनी कामाच्या संदर्भात अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूरचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटलांकडे जबाबादारी दिली आहे. तेही सोलापुरात महिना-दोन महिन्यांतर येतात. त्यांनीही या विषयासंदर्भात जणू हाताची घडी तोंडावर बोट अशीच भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी गांभीर्याने या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.