सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयात नववधूने मुंडावळया बांधून बारावीचा इतिहासाचा पेपर दिला आहे. नववधू परीक्षेला आल्याने शिक्षकांनी आनंदाने स्वागत केले. शनिवार दि. १८ मार्च रोजी बारावी परीक्षेच्या इतिहास विषयाच्या परीक्षेत नववधु चि.सौ.का. काशिबाई देवेंद्र कोळी हिने हजेरी लावली. विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात तिने विवाह नोंदणी केली होती.
काशीबाई कोळी हिचा लग्नसोहळा गोरजमुहूर्तावर शनिवारी सायंकाळी. ६:३६ वा पार पडणार होता. तरी देखील दुपारी ३ ते ६ पर्यंत नववधुने तीन तास परीक्षा देऊन अक्षतासाठी बोहल्यावर चढली. लग्नातील सर्व विधी पूर्ण करून परीक्षेस उपस्थित राहिली. तिची शिक्षणाबद्दल असलेली धडपड पाहून सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी केंद्रप्रमुख मलकप्पा भरमशेट्टी उपकेंद्रसंचालक खंडेराव घाटगे, परीक्षा प्रमुख सिद्रामप्पा पाटील, परिरक्षक सुरेश रूगे, वधुवर समन्वयक सुरेश आवटे, सहाय्यक राजकुमार गवळी, शरणबसप्पा चानकोटे, गौरीशंकर कोनापूरे, दिपक गंगौंडा आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.