सोलापूर: पूर्व भागातील लक्ष्मी नृसिंह स्वामींच्या मंदिरात गुरुवारच्या जन्मोत्सवानंतर दुसऱ्या दिवशी कल्याणोत्सव आणि रात्री पालखी सोहळा झाला. शेकडो नृसिंहभक्त यामध्ये सहभागी होते. यादगिरी गुट्टा येथून आणलेल्या नृसिंहाच्या मूर्तीची येथे प्रतिष्ठापना झाली असून, गेल्या दोन दिवसात पंचवीस हजार सोलापूरकरांनी नृसिंहस्वामींचे दर्शन घेतले.
चाळीस वर्षांपूर्वी यादगिरीगुट्टा परिसरातून काळ्या पाषणावर कोरलेल्या लक्ष्मी नृसिंह स्वामींची मूर्ती सोलापुरात आणली. उत्सव काळात मूर्तीला सोने चांदीच्या आभूषणांचा साज चढवला जातो. त्यामुळे उत्सव मूर्ती आणखीन भावते. नृसिंह देव भक्तांना पावतो. ज्या भक्तांना वारवार संकटांचा सामना करावा लागत आहे, असे भाविक दर शनिवारी मंदिरात दर्शन घेतल्यास . संकटे दूर जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकटमोचक म्हणून लक्ष्मी नृसिंह स्वामींची ख्याती आहे. मंदिराचे, वैशिष्ट्ये म्हणजे या मंदिराला प्रतिष्ठित व्यक्ती दर शनिवार भेट देतात.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे दर शनिवारी मंदिरात येऊन दर्शन घेतात. माजी महापौर महेश कोठे, विनायक कोंड्याल, श्रीकांचना यन्नम, चेतन नरोटे, नागेश वल्याळ, विजया बड्डेपल्ली यासह अनेक प्रतिष्ठित माणसांची मंदिरावर श्रद्धा आहे. सहाशे स्क्वेअर फुटावर मंदिर असून मंदिरावर सभामंडप आहे. श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानकडून मंदिराची देखभाल होते. देवस्थानने मंदिर परिसरात दोन हजार स्क्वेअर फूट जागा खरेदी केली असून या ठिकाणी सभामंडपाची उभारणी केली आहे.
अधिक माहिती देताना देवस्थानचे विश्वस्त चंद्रशेखर कोंडा यांनी सांगितले, श्रावण मासात मंदिरात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होतात. दर शनिवारी उत्सव सोहळा साजरा होतो. शेवटच्या शनिवारी लक्ष्मी नृसिंह स्वामींचा रथोत्सव निघतो. या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात, भास्कर गाजूल हे देवस्थानचे अध्यक्ष असून दत्तात्रय चिप्पा पंतुलू हे सचिव आहेत.