तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर संस्थानने जानेवारी महिन्यात तेलाचा बुंदी लाडू व शुद्ध तुपाचा लाडू प्रसाद पुरविण्याची निविदा काढली होती. मात्र, अद्यापही ती निविदा उघडण्यात न आल्याने बचत गटाची १० लाख रूपये अनामत रक्कम मंदिर संस्थानकडे पडून आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी तुळजापूर येथील मंदिर संस्थानच्या कारभाराबाबत चर्चा होत आहे. आता एक नवीन प्रकार उघडकीस आला असून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तेलाचा बुंदी लाडू व शुद्ध तुपाचा लाडू प्रसाद पुरवण्याबाबत तीन वर्षाकरता निविदा काढली होती. ही निविदा १८ जानेवारी रोजी ते
१४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत भरण्यात येणार होती.
यामध्ये येथील शिवशक्ती महिला बचत गट तुळजापूर यांनी ही निविदा सर्व शर्थ अटी सहित अनामत रक्कम १० लाख रुपये डिपॉझिट व अनामत किंमत रक्कम ६७ हजार २०० रुपये एवढे भरले. परंतु, ई निविदा उघडण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२२ असतानाही तीन महिने झाले तरी अद्याप निविदा न उघडल्यामुळे येथील शिवशक्ती महिला बचत गटाच्या सरव्यवस्थापक मिनाताई सोमाजी यांनी १५ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर चाललेल्या कारभाराबाबत माहिती दिली. यावेळेस बचत गटाच्या अध्यक्षा लता सोमाजी, सदस्य नायकवाडी आदीसह महिला उपस्थित होत्या.
मिनाताई सोमाजी पुढे बोलताना म्हणाल्या, आज तीन महिने झाले आमच्या बचत गटाचे १० लाख रुपये अनामत रक्कम पडून आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिका-यांना ४ एप्रिल रोजी लेखी निवेदनही दिले होते. पण अद्याप तरी मला उत्तरही प्राप्त झाले नाही. तसेच मंदिर व्यवस्थापन यांच्याकडे १२ एप्रिल रोजी पत्रव्यवहार करूनही यांनी उत्तर दिले नाही. यामुळे बचत गटाचे १० लाख रुपये अनामत रक्कम आज मंदिर संस्थांकडे तीन महिन्यापासून पडून आहेत.
तीन महिने उलटूनही निविदा न उघडण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याकरिता आम्ही लवकरच राज्याचे गृहमंत्री तथा महसूलमंत्री व धर्मादाय कार्यालय उस्मानाबाद यांना निवेदन देऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कारभाराबाबत जाब मागणार आहोत. निविदा वेळेवर उघडली असती तर आजपर्यंत २५ ते ३० गोरगरीब महिलांना हाताला काम मिळाले असते, असेही त्या म्हणाल्या.