अविनाश पांढरे/मोहोळ
भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत अविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असून पारंपरिक विरोधक असलेल्या माजी आ. प्रशांत परिचारक आणि माजी आ. राजन पाटील यांना तुम्हाला एकदा अविरोध केले होते तसे तुम्ही यावेळी करा असे आवाहन विद्यमान चेअरमन व खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते त्याला ही दोघे नेतेमंडळी कसा प्रतिसाद देतात ते एका दोन दिवसात स्पष्ट होईल. विरोधी गटाने यावेळेस जर उमेदवारी अर्ज भरला तरी मी देखील राज्यसभेचा खासदार असून सत्ताधारी पक्षाचा आहे आपण जर मुद्दामहून त्रास देणार असाल तर मलाही जशास तसे वागता येते असे त्यांनी ठणकावून भाषणात सांगितले होते. त्यामुळे विरोधी गट आता कोणता निर्णय घेतो याकडे सर्वांचे निर्णय डोळे लागले लागले आहेत. उद्या दि ३० जुन रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.उद्या कोणकोणते गट, संघटना,पक्ष अर्ज भरतात आणि किती गटात भरतात हे दिसुन येईल. राज्यामध्ये सध्या सत्तांतराची चाहूल लागली असल्याने त्याचेही पडसाद या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज अर्ज भरण्याच्या तिस-या दिवशी माजी आमदार राजन पाटील गटाने आपल्या २० समर्थकांचे अर्ज भरले आहेत अशी माहिती मिळत आहे. आतापर्यंत एकुण २८९ जणांनी अर्ज नेले असून त्यापैंकी ८१ जणांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली. या निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन व खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या सर्व भीमा परीवाराच्या उमेदवारांना महाडिक शेड, पुळूज येथे आपले अर्ज दाखल करावेत असे सांगितले होते. त्याप्रमाणे आतापर्यंत तेथे सुमारे २०० अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जांवर विचार करून त्यापैकी आवश्यक तेवढेच अर्ज उद्या दि ३० जून रोजी भरणार असल्याची माहिती देण्यात आली.
आतापर्यंत भिमा परिवाराच्या वतीने तिघा जणांनी आपले अर्ज दाखल केले असून त्यामध्ये विद्यमान चेअरमन व खासदार धनंजय महाडिक, त्यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक व व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत.
आतापर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालय सोलापूर येथे एकूण १० विभागामध्ये ८१ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये पुळुज गटामध्ये ६ , टाकळी सिकंदर गटामध्ये १०, सुस्ते गटामध्ये १४, अंकोली गटात ८, कोन्हेरी गटात ११, सहकारी संस्था गटात २, अनुसूचित जाती जमाती गटात ६ , संवर्गातून ११ , मागासवर्गीय गटातून ९ ,भटक्या-विमुक्त गटातून ४ असे अर्ज भरण्यात आले.