24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरयुवक सीना नदीत वाहून गेला

युवक सीना नदीत वाहून गेला

एकमत ऑनलाईन

सोलापूर : चुलत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थीचे विसर्जन करायला गेलेला पुतण्या किशोर डिगाजी व्हटकर (वय २७ रा. हनुमान नगर सोलापूर) हा सीना नदीत वाहून गेला. सोमवारी सकाळी दहा वाजता वाहून गेलेला तरूण अद्याप सापडलेला नाही.

काकांच्या अस्थी विसर्जनासाठी व्हटकर कुटुंबिय पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील सीना नदीवरील बंधाऱ्याजवळ गेले होते. अस्थी विसर्जन करून बाहेर येताना सीना नदीतील पाण्याच्या प्रवाहात किशोर व्हटकर याचा तोल गेला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोघांनी हात दिला, मात्र त्यामधूनही तो निसटला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. किशोरला पोहायला येत नव्हते. किशोर हा नातेवाईकांच्या डोळ्यासमोर वाहून गेला. आरडाओरड केली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याला वाचविता आले नाही. दरम्यान, नदी पात्रात ठिकठिकाणी वाळु उपशामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.

त्याचा अनुभव मदत करणाऱ्यांना आला. किशोर व्हटकर पाण्यात बुडाल्यानंतर स्थानिकांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली होती. काही नागरिकांनी चिंचोळी औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलास संपर्क केला. त्यावेळी तेथील प्रमुख जयसिंग जाट हे त्यांच्या पथकासह त्याठिकाणी पोहचले. सोमवारी सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत शोध घेतला, पण किशोरचा तपास लागला नव्हता. त्यानंतर सोलापूर तालुका पोलिस व संबंधित तहसीलदारांना संपर्क साधला. पण, पाच तासानंतरही महसूल यंत्रणा त्याठिकाणी पोहचली नव्हती. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार पवन महिंद्रकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. पण, पाण्याच्या प्रवाहामुळे मदत करता आली नाही. स्वातंत्र्य दिनामुळे एनडीआरएफ चे पथक वेळेत पोहचू शकले नाही, असेही सांगितले जात आहे.

पाकणी, शिवणी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होतो, असे नागरिक सांगत आहेत. वाळू उपशामुळे सीना नदीत ठिकठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे स्थानिक नागरिकांच्या जिवावर बेतत आहेत. उत्तर सोलापूर महसूल विभाग त्याकडे डोळेझाक करीत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. विशेष बाब म्हणजे ही घटना घडल्यावर तब्बल पाच तास महसूल प्रशासनाचे मदत पथक त्याठिकाणी आलेले नव्हते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या