सांगोला : घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपी जाताच चोरट्यांनी प्रवेश केला अन् पत्र्याच्या पेटीतील सुमारे तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख ३० हजार असा सुमारे ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सांगोला तालुक्यात अकोला येथे घडली.
रविवार, २४ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत दत्तात्रय विलास शिंदे (रा. अकोला) यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी दत्तात्रय शिंदे यांनी २४ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास कुटुंबासमवेत जेवण उरकून घरात झोपी गेले. त्यादरम्यान त्यांच्याकडून घराचा दरवाजा उघडा ठेवला. नेमकी हीच संधी साधून चोरट्याने मध्यरात्री घरात प्रवेश केला. पत्र्याची पेटी चोरून बाहेर येऊन गेले.
पेटीतील सव्वातोळे सोन्याची बोरमाळ, एक तोळे सोन्याचे गंठण, तीन ग्रॅम सोन्याचे बदाम, एक ग्रॅम सोन्याच्या कानातील बालीसह रोख ३० हजार रुपये असा सुमारे ७२ हजार रुपयांचा ऐवज पळवला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० च्या सुमारास दत्तात्रय शिंदे यांच्या आई झोपेतून उठल्या असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यांनी मुलगा व पतीला झोपेतून उठवून घरात चोरी झाल्याचे सांगितले. शिंदे कुटुंबीयांनी चोरीला गेलेल्या पेटीचा शोध घेतला असता ती बाहेर आढळली.