सोलापूर : यंदा अपेक्षापेक्षा अधिक पाऊस पडणार असून जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहणार असल्याची भाकणूक मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केली.
रात्री साडेबारा वाजता सातही नंदीध्वज मिरवणुकीने फडकुले सभागृहासमोर विसावले, राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू हे भाकणूकस्थळी विराजमान झाले. समवेत मानकरी राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख, सुधीर देशमुख हेही दाखल झाले. त्यानंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या देशमुखांच्या शेतातील वासराला रात्री १२.३५ वाजता भाकणूकस्थळी आणण्यात आले. वासरु येताच राजशेखर देशमुख यांनी वासराची पूजा केली.
सुरुवातीलाच वासराने मूत्र आणि मलविसर्जन केले. यावरून भरपूर पाऊस पडणार असल्याचे भाकीत हिरेहब्बू यांनी केले. वासरु सुरुवातीपासून बिथरले होते. काहीतरी विचित्र घटनेचे संकेत त्यांनी दिले. वासरासमोर गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी आणि विविध प्रकाराचे धान्य ठेवण्यात आले. वासराने कशालाच स्पर्श केला नाही. यावरून सर्वच वस्तूंच्या किमती स्थिर राहतील, असेही ते म्हणाले.
आजपर्यंत यात्रेतील भाकणूक सत्यात उतरल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर कसलेच संकट येणार नसल्याचा विश्वास हिरेहब्बू यांनी व्यक्त केला. भाकणूक संपताच रात्री उशिरा मानाचे सातही नंदीध्वज हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ झाले.सिद्धेश्वर यात्रेत रविवारी मध्यरात्री १२.३५ वाजता भाकणुकीच्या कार्यक्रमावेळी वासरु बिथरल्यानंतर उपस्थितांनी अस्थिरतेचा अंदाज व्यक्त केला.