सोलापूर : शिक्षिका शाळेला गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घर फोडून आतील ३ लाख ४७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही चोरी मंगळवारी सकाळी १०.४५ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान झाली.
माधुरी अनिरुद्ध देशपांडे (वय ५४, रा. रुबीनगर, ) या ज्ञान प्रबोधनी प्रशालेत स्कॉलरशिपचा क्लासच्या शिक्षिका आहेत. घरातील दीर, जाऊ व त्यांची मुलगी हे नाशिक येथे गेले आहेत. मुलगा कॉलेजला गेल्यावर त्या नेहमीप्रमाणे
घराला कुलूप लावून शाळेला गेल्या. दुपारी माधुरी देशपांडे व त्यांचा मुलगा हे दोघे घरी आले. घराला कुलूप नसल्याचे दिसून आले. आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना बेडरूममधील कपाट फोडून आतील ८१ हजारांचे २७ ग्रॅम लॉकेट, एक लाख २० हजारांच्या बांगड्या, ६० हजारांची कर्णफुले, ३० हजारांचे मंगळसूत्र, ३६ हजारांचे मंगळसूत्र व २० हजारांचा हार, असे एकूण १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विजापूर नाका ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.