34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeसोलापूरसलुन दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

सलुन दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

एकमत ऑनलाईन

सोलापूर : ५ एप्रित ते ३० एप्रिल दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शासन निर्णय काढीत सलून दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी करावयाच्या उपाय योजनांमध्ये अनेक व्यवसायांना सुट देण्यात आली असली तरीही सलून दुकाने, ब्यूटी पार्लर आदी छोटया व्यवसायिकांना मात्र व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे शासनाने नाभिक व्यवसायिकांवर उपासमारीची संक्रांत आणली आहे.

अगोदरच पहिल्या लॉकडाउनच्या वेळी घेतलेले कर्ज व व्यवसायात झालेले नुकसान अद्यापही फिटलेले नसून व्यवसायाचा गाडाही सुरळीत सुरू झालेला नाही. नाभिक व्यवसायावर दुकानदाराचे कुटूंब याबरोबरच दुकानातील कामगार व त्यांचे कुटूंब तसेच सलून साहित्य विक्री करणारे व्यवसायिक असे अनेक घटक अवलंबुन आहेत. या सगळयांवरच शासनाच्या निर्णयामुळे उपासमारीचे वेळ आली आहे. पुन्हा एकदा शासनाने कोरोनाच्या नियंत्रणासाठी सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे नाभिक व्यवसायिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मागील लॉकडाउनच्या काळात राज्यभरात १६ ते १७ नाभिक व्यवसायिकांनी आत्महत्या केल्या होत्या. तिच वेळ शासनाने पुन्हा एकदा आमच्यावर आणली आहे अशी तीव्र भावना नाभिक व्यवसायिकांमधून व्यक्त होत आहे. शासनाने अनेक व्यवसायांना गर्दी होत असूनही व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे मात्र सलून व्यवसायिक सर्व नियम पाळून व्यवसाय करित असतानाही शासनाने ते बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे सलून व्यवसायिकांमध्ये उद्रेक दिसून येत आहे. यासंबंधी नाभिक दुकान संघाचे अध्यक्ष संतोष राऊत, संतसेना नाभिक दुकानदार संघटनेचे माजी अध्यक्ष संतोष धोत्रे, नाभिक एकता मंचचे प्रभाकर भालेकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष वैभव शेटे यांनी एकमतशी संवाद साधताना तीव्र संताप व्यक्त करित शासनाच्या आदेशाचा निषेध केला आहे.

शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून नाभिक व्यवसायिक व्यवसाय करित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सलूनच्या माध्यमातून पसरल्याचे एकही उदाहरण राज्यभरात नाही. तरीही शासनाने दुकाने बंद ठेवण्याचा दिलेला आदेश अन्यायकारक असून शासनाने जाहीर केलेले विकेंड लॉकडाउन पाळण्यास नाभिक व्यवसायिक तयार आहेत मात्र उर्वरित दिवसांमध्ये व्यवसाय चालू ठेवण्यास शासनाने परवानगी द्यावी असे नाभिक दुकान संघाचे अध्यक्ष संतोष राऊत म्हणाले.
शासनाच्या निर्णयाविषयी तीव्र संताप व्यक्त करताना संतसेना नाभिक दुकानदार संघटनेचे माजी अध्यक्ष संतोष धोत्रे यांनी शासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत व्यवसाय करण्यास सर्व व्यवसायिकांना परवानगी दिली मात्र नाभिक व्यवसायिकांची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले हे अन्यायकारक असून शासनाच्या निर्णयाचा निषेध करतो असे म्हणाले. मागील लॉकडाउन कालावधीत १८ व्यवसायिकांनी आत्महत्या केल्या तीच वेळ शासनाने पुन्हा एकदा आणली आहे. नाभिक दुकाने हे ८० टक्के भाडेतत्वावर चालतात. व्यवसायाचा खर्च भागवून कुटूंब चालवावे लागते मात्र आता उपासमार होणार असून शासनाने ही वेळ आमच्यावर आणली आहे असेही ते म्हणाले.

राज्य शासनाने नाभिक व्यवसायिकांवर कु-हाड मारली असून बंदचे आदेश नाभिक व्यवसायापासूनच का सुरू होतात असा प्रश्न नाभिक एकता मंचचे प्रभाकर भालेकर यांनी उपस्थित केला. राजकीय नेते अनेक वेळा कोरोनाचे नियम पायदळी तुडवतात. नाभिक व्यवसायिक सर्व नियम पाळून व्यवसाय करित असतानाही शासन अन्याय करित आहे. हा अन्याय समाज कदापिही सहन करणार नाही. मद्य दुकानांना परवानगी मिळते मग नाभिक दुकांनाना परवानगी का मिळत नाही असा सवाल करित प्रभाकर भालेकर यांनी उपासमारीने मरण्याची वेळ शासनाने नाभिक व्यवसायिकांवर आणली असून आधीच अडचणीत असलेला व्यवसायिक शासनाच्या निर्णयामुळे आत्महत्येच्या दिशेने जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सलून दुकाने बंद झाल्यास व्यवसायिकांचा उदर निर्वाह कसा चालणार याचा विचार शासनाने केला नाही. २५ दिवस व्यवसाय बंद राहिला तर खायचे काय नाभिक व्यवसायिकांच्या आत्महत्या झाल्यास शासन जबाबदार आहे का असा सवाल महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष वैभव शेटे यांनी उपस्थित करित शासनाच्या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाभिक व्यवसायिक हॅण्डग्लोज, मास्क, सॅनिटायझर आदींचा वापर करून तसेच ग्राहकापासून योग्य सामाजिक अंतर पाळून व्यवसाय करतील. शासनाने सलून बंद ठेवण्याच्या आदेशाचा पुर्नविचार करावा अन्यथा दुकानदारांना शासनाने आर्थिक मदत द्यावी. नाभिक व्यवसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ शासनाने आणु नये असे शेटे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागजी दुधाळ- बार्शी, हरिभाऊ कोकाटे -करमाळा, सांगोला, जितेंद्र भोसले -पंढरपूर, दादा माने-मोहोळ, यशवंत साळुंके-माळशिरस, सुदर्शन विभुते-अक्कलकोट, गौरीशंकर कोरे- द. व उ. सोलापूर, सचिन माने- मंगळवेढा, राजु वाळके-माढा, सुहास गाडेकर-कुर्डूवाडी, अण्णा सुरवसे-अकलुज आदी ग्रामीण व्यवसायिकांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध करित ग्रामीण भागात सलून दुकाने मोठया प्रमाणात आहेत. या दुकानांवर दुकानदार व कामगार यांची कुटूंबे अवलंबुन आहेत. व्यवसायासाठी व वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते डोक्यावर आहेत याबरोबरच दैनंदिन खर्च कसा चालवायचा याची चिंता सलून व्यवसायिकांना सतावते आहे. कोरोनापेक्षा शासनाच्या लॉकडाउनचा कोरोनाच जास्त त्रासदायक ठरत असून सर्व समाजघटक अडचणीत असल्याने मदतीचीही शक्यता नाही. त्यामुळे सलून व्यवसायीकांनी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाने कोणताही विचार न करता दुकाने बंद ठेवण्याचा दिलेला आदेश हा सलून व्यवसायिकांची उपासमार करणारा आहे. हा आदेश तातडीने मागे घ्यावा अशी मागणी ग्रामीण भागातील सलून व्यवसायिकांनी केली आहे.

सायखेड येथे अवैध देशी – विदेशी दारू विक्रेत्यांवर कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या