सोलापूर : कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने महापालिका शहरातील 13 लहान खासगी रुग्णालयांमधील कोव्हिड उपचाराची सेवा तूर्त बंद करणार आहे. यामुळे अशा रुग्णालय चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शासकीय तसेच ज्या मोठ्या खासगी रुग्णालयांना कोव्हिड उपचाराची मान्यता आहे, अशा रुग्णालयांवर मोठा ताण पडत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने या रुग्णालयातील बेड्सची संख्या कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
यातील अनेक रुग्णांना उपचाराअभावी आपला जीवही गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गत महिन्यात महापालिकेने लहान खासगी रुग्णालयांना देखील कोव्हिड उपचाराची सेवा देण्याविषयी आवाहन केले होते. याला अनेक रुग्णालयांनी प्रतिसाद दिला. त्यांनी महापालिकेकडून रीतसर मान्यता घेऊन आपल्या रुग्णालयांमध्ये कोव्हिड उपचाराची सुविधा सुरू केली. मोठ्या रुग्णालयांमध्ये बेडअभावी नवीन रुग्णांना उपचाराची सुविधा नाकारली जात असल्याने अनेक रुग्ण छोट्या रुग्णालयात जाऊन उपचार करणे पसंत करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याचे कारण देत शहरातील 13 लहान खासगी रुग्णालयांना कोव्हिडची सेवा बंद करण्याचे तोंडी कळवले आहे. लवकरच लेखी सूचना देऊन रुग्णालयांमधील कोव्हिड उपचाराची मान्यता महापालिका काढून घेणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे संबंधित रुग्णालय चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या आवाहनानुसारच आम्ही कोव्हिड सेवा सुरू केली, पण ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर तुटवड्याचे कारण देत महापालिका अचानक आमच्या रुग्णालयातील कोव्हिड सेवा बंद करण्यास सांगत आहे. ही बाब चुकीची आहे, असे या रुग्णालय चालकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या या अजब धोरणामुळे भावी काळात खासगी रुग्णालये कोव्हिड सेवा देण्यास प्रतिसाद देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे.
ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरच्या तुटवड्यामुळे शहरातील 13 लहान रुग्णालयांना दिलेली कोव्हिड उपचाराची मान्यता काढून घेण्यात येत आहे. ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यावर पुन्हा मान्यता देऊ.
– डॉ. बिरुदेव दूधभाते
(आरोग्याधिकारी, महापालिका )
फ्रान्सवरून २० मेट्रीक टन ऑक्सिजनसह आयएनएस त्रिकंड मुंबईत दाखल