पंढरपूर : पंढरपूरच्या वैभवात भर टाकणारे येथील तुळशी वृंदावन मंगळवार दि.१ डिसेंबर पासून शहरातील नागरिक व विठ्ठल दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटक, भाविक व शहरातील नागरिकांना वृंदावनात प्रवेश देण्यात येईल. दरम्यान, प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली असून लहान मुलांसाठी १५ तर मोठ्यांसाठी २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंिन्सगचे सर्व नियम पाळूनच तुळशी वृंदावनात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती उपवन संरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील व पंढरपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी विलास पवळे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील तुळशी वृंदावन मार्च महिन्यापासून बंद आहे. दरम्यान, राज्य शासनाने एसटी बस सेवा, सिनेमागृहे, मंदिरे, शाळा आणि इतर सर्व आस्थापने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार येथील तुळशी वृंदावन देखील १ डिसेंबर पासून भाविक आणि पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथील यमाई तलावाच्या निसर्गरम्य परिसरात वनविभागाच्या वतीने तुळशी वृंदावनाची उभारणी करण्यात आली आहे. विठ्ठल दर्शनासाठी येणा-या भाविकांना आपला काही वेळ शांतपणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवता यावा, त्याचबरोबर विविध संतांच्या चरित्राविषयी माहिती मिळावी या हेतूने राज्य सरकारने तुळशी वृंदावनाची निर्मिती केली आहे.
येथील वृंदावनामध्ये विविध प्रकारच्या तुळशीबरोबरच इतर अनेक फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. रंगीबेरंगी कारंजे आणि भव्यदिव्य अशा विठ्ठल मूर्तीचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी अनेक भाविक येथे आवर्जून येतात. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे येथील तुळशी वृंदावन पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे. नऊ महिन्यांपासून बंद असलेले तुळशी वृंदावन पुन्हा लोकांसाठी खुले होत असल्याने भाविक व शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. भाविकांनी व शहरातील नागरिकांनी तुळशी वृंदावन विहाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन क्षेत्र अधिकारी पवळे यांनी केले आहे.
ऊसदरासाठी जनहितच्या कार्यकर्त्यांनी युटोपियनच्या गव्हाणीमध्ये टाकल्या उडया