24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeसोलापूरविणेकरी केशव कोलते ठरले यंदाच्या आषाढी वारीतील मानाचे वारकरी

विणेकरी केशव कोलते ठरले यंदाच्या आषाढी वारीतील मानाचे वारकरी

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : आषाढी यात्रा दरवर्षी आषाढ शुध्द एकादशी या दिवशी भरते. यंदाची आषाढी वारी मंगळवार दि. २० जुलै रोजी साजरी होणार आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली जाणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सोबत श्रीच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना मुख्यमंर्त्यांसोबत महापूजेची संधी दिली जाते. तथापि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आषाढी यात्रा कालावधीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे.

त्यामुळे श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची मुख्यमंत्रीच्या हस्ते होणा-या शासकीय महापूजेसाठी मानाचे वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहारा देणा-या एकूण ८ विणेक-यांपैकी २ विणेक-यांना मागी वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला संधी मिळाली होती. तसेच ४ विणेक-यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्याने केशव शिवदास कोलते व बापू साळुजी मुळीक या दोन विणेक-यांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्षे, रा. मु. संत तुकाराम मठ, वार्ड नं. १५, नवनाथ मंदिर पाठीमागे वर्धा, ता.जि. वर्धा) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे.

कोलते हे मागील २० वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहेत. स्वत: व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज ओसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर). ह.भ.प. प्रकाश नवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

त्याप्रमाणे केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्ष) व इंदूबाई केशव कोलते (वय ६६) या दापत्याची आषाढी एकादशी दिवशी पहाटे मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते होणा-या श्रीच्या शासकीय महापुजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवडण्यात आले आहे.

आषाढीवारीसाठी श्री विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
आषाढीवारी साठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक विद्युतरोषणाईने सजविण्यात आली आहे.श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या मंदिरावर,तसेच श्री.संत नामदेव पायरी,श्री.संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप. व श्री.संत तुकाराम भवन येथे आकर्षक व नयनरम्य अशी विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

यंदाची आषाढी वारी दुस-यांदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी होत आहे. यासाठी प्रमुख दहा संतांच्या पालखी सोबत प्रत्येकी चाळीस भाविकांना एसटीने आषाढी वारीसाठी पंढरपुरात येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर प्रथमच वाखरी ते पंढरपूर संतांच्या पादुका घेऊन पायी चालत येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विद्युतरोषणाईच्या माध्यमातून सजवण्यात आली आहे. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक विद्युतरोषणाई मुळे उजळून निघाले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या