सोलापूर : सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात आणखी काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. तत्पूर्वी, महापालिकेकडून पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र लाभक्षेत्र प्राधिकरणाला पाठविण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील नागरिकांसाठी २० ते २५ जानेवारी दरम्यान भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली. त्यानंतर पुढील दीड-दोन महिने शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल.
सोलापूर, पुणे व नगर या जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये जानेवारी महिन्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडलेला आहे. धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडूनही धरण अद्यापही शंभर टक्याहून अधिक भरलेले आहे. सध्या धरणात शंभर टक्के (१००.४५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यात होतो. धरणाचा पाणलोट क्षेत्राचा पट्टा मोठा असून, सुमारे ६ किलोमीटरहून अधिक रुंदी व १४० किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर सुमारे चाळीसहून अधिक सहकारी व खासगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक व्यवसाय अवलंबून आहे. त्यामुळे दरवर्षी ३० हजार कोटींहून अधिकची उलाढाल होते. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी सर्वांत मोठे कोठार म्हणून या जलाशयाकडे पाहिले जाते. धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी सीना-माढा, दहिगाव या योजना, बोगदा, मुख्य कालवा व नदीद्वारे दिले जाते.
उजनी धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. आता १७ जानेवारीपासून कॅनॉलद्वारे शेतीसाठी महिनाभर पाणी सोडण्यात येणार आहे. पावसाळा संपून अडीच महिने होऊनही धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने यंदा उन्हाळ्यात धरण मायनसमध्ये जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र प्राधिकरण, धीरज साळे यांनी केले आहे.
परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडलेला आहे. धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडण्यात आले आहे. याच पाण्याचा वापर करुन येथील जलविद्युत केंद्रातून सुमारे तीन कोटीहून अधिक युनिट वीजनिर्मिती केली. त्यामुळे येथील वीजनिर्मितीचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघाले.