सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली आहे. अशा परिस्थिीत जिल्हाधिकाऱ्यांकडे टँकर मंजुरीचे असलेले आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे ज्या ज्या भागातून संयुक्त टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव येतील, त्याची तातडीने पूर्वतपासणी करून टँकर सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.
यापूर्वी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. तालुक्यातून आलेले टँकर मागणीसाठीचे प्रस्ताव टंचाई विभागाकडून तसेच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त अहवालानंतर जिल्हाधिकार्यांकडे जात होते. मात्र सध्या जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे कामाचा अतिभार मोठा असल्याने आलेले प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी हे अधिकार आता प्रांतांना देऊ केले आहेत.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यातील जवळपास १५ ठिकाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे आणखी टँकरची मागणी वाढणार आहे. त्यामुळे टँकर मंजुरीसाठी दिरंगाई होऊ नये यासाठी या अधिकाराची विभागणी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे. तर सोलापूर शहरासाठी लवकरच उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.
त्यासाठी भीमा नदीकाठचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.जिल्ह्यात १०० ते १२० दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला चारा निर्मितीसाठी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना चारा उपलब्धतेसाठी मोफत बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.