36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeसोलापूरऊसदराची कोंडी कोण फोडणार? स्व. सुधाकरपंत परिचारक यांची उणीव भासू लागली

ऊसदराची कोंडी कोण फोडणार? स्व. सुधाकरपंत परिचारक यांची उणीव भासू लागली

एकमत ऑनलाईन

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर(ता माळशिरस) सध्या गळीत हंगाम चालू होऊन एक महिना होत आला तरी अजूनही ऊस दराचा तिढा न सुटल्याने शेतक-यांमध्येचिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस कारखान्याला गेला पण ऊस दर किती मिळणार? व ऊस दराची कोंडी कोण फोडणार? असे एक ना अनेक प्रश्न सध्या शेतक-यांना पडले आहेत गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना झाला तरीही सोलापूर जिल्हातील साखर कारखान्याने ऊस बिलाची पहिली उचल दर जाहीर केला नाही त्यामुळे ऊस दराकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे यावेळी स्व सुधाकरपंत परिचारक यांची निश्चितपणे उणीव भासली हे तितकेच खरे आहे.

ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही यावेळी जर सुधाकरपंत परिचारक असते तर त्यांनी ऊसदराची कोंडी फोडली असती अशी चर्चा शेतक-यांमधून ऐकायला मिळत आहे. सोलापूर जिल्हा हा साखर पट्टा समजला जातो या भागात ऊसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात आहे त्याचबरोबर या जिल्ह्यांत सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्याने गव्हाणी मध्ये उसाची मोळी टाकून गळीत हंगामास सुरवात केली असली तरी शेतक-यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या ऊसाला यावर्षी किती ऊस दर देणार याबाबत कोणीही बोलायला तयार नाही.

गळीत हंगाम चालू झाला की शेतकरी संघटना ऊस दराबाबत आंदोलने करणे, रस्ता रोको करणे, उसाचे ट्रॅक्टर अडविणे, ऊस भरतीच्या ट्रॅक्टर चे टायर फोडणे, हे चित्र सर्वत्र बघायला मिळायचे अशी परिस्थिती जरी असली तरीही शेतक-या विषयी असलेली तळमळ, शेतकरी हिताचे निर्णय घेणारे व वाहनमालकांचे नुकसान होऊ नये व शेतक-याला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील असलेले सहकार क्षेत्रातील परिपूर्ण अभ्यास असलेले राजकारणातील संत स्वसुधाकरपंत परिचारक स्व:ता पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी फोडायचे हा आतापर्यंतचा इतिहास आहे.

पण गेल्या काही महिन्यांपासून देशासह राज्यावर कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले होते या रोगाची लागण स्व सुधाकरपंत परिचारक यांना झाली पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. सहकार क्षेत्रातील डॉ असलेले या क्षेत्राचा परिपूर्ण अभ्यास असलेले सुधाकरपंत परिचारक नावाचा एक तारा तुटला व पंढरपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली. गळीत हंगाम सुरू झाला की सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे शेतकरी संघटनेचे केंद्रंिबदू होते या ठिक ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन, रस्ता रोको आंदोलन ऊस दरासाठी केली जात होती. अशी परिस्थिती असताना ही स्व:ता पुढाकार घेऊन स्व सुधाकरपंत परिचारक ऊस दराची कोंडी फोडत होते.

गळीत हंगाम चालू होऊन महिना झाला तरी ही ऊस दराचा तिडा कायम आहे यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. ऊस दरासाठी शेतकरी संघटना ही अक्रमक होताना दिसत नाही त्यामुळे ऊस दराचा तिडा कायम आहे तो सोडविण्यासाठी सरकार हे अनुकूलता दर्शवत नाही ही शोकांतिका आहे, यासाठी सरकारने अनुकूलता दर्शविली पाहिजे शेतक-यांनी जिवापाड जपलेल्या ऊसाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी माफक अपेक्षा शेतक-यांतून केली जात आहे.

शेतकरी संघटनचे नेते राजकर्त्यांच्या वळचणीला
सध्या शेतकरी संघटना शेतक-यांच्या ऊसदराबाबत तीव्र स्वरूपात आंदोलन रस्ता रोको मोर्चे काढताना कोठेही दिसत नाही. शेतकरी संघटनेत पूर्वीचे ऊस दरासाठी होणारी अंदोलने आक्रमकता कमी होत असताना दिसत आहे. सत्तासुंदरी च्या मोहात अडकलेले शेतकरी संघटनेचे नेते आज राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे शेतक-यांचा वाली कोण? जो तो स्व:ताच्या स्वार्थासाठी पक्ष संघटनेचा वापर करताना दिसत आहे अशी चर्चा शेतक-यांमधून दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे.

निवार चक्रीवादळाची तीव्रता वाढली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या