सांगोला : वीज चोरीच्या कारवाईत ५० हजार रुपये दंड न आकारण्यासाठी १० रुपयांची लाच स्वीकारताना सांगोल्यात महावितरणच्या वायरमनला सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
राहुल बिरबल गंगणे (वय ३०, रा. सांगोला) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वायरमनचे नाव असून शुक्रवार ८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सांगोला शहरात ही कारवाई झाली. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार तक्रारदाराच्या घरात काही दिवसांपूर्वी वीज गेल्याने वायर काढून मीटरची तपासणी केली. तीच वायर परत मीटरला जोडली. परंतु वायर जोडते वेळी तक्रारदार यांनी चुकीची वायर जोडणी केली.
दरम्यान वायरमन राहुल गंगणे याने २ जुलै रोजी तक्रारदार यांच्या घरातील मीटर तपासून त्याचा फोटो काढला. विजेच्या मीटरमध्ये त्यांनी छेडछाड केल्याची बाब निदर्शनास आली. हा प्रकार पाहता तक्रारदार यांना ५० हजार रुपये दंड होईल असे सांगितले. दंड न करण्यासाठी साहेबांना बोलून त्यांना १० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगत लाच मागितली.
दरम्यान तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. सापळा रचून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वायरमन राहुल गंगणे यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार पकाले, सण्णके, पवार यांच्या पथकाने केली.