सोलापूर : दहा वर्षांपासूनचे अनैतिक . संबंध दुरावल्याने दारूच्या नशेत त्रास देणाऱ्या प्रियकराला महिलेने लाकडी फळीने मारून खून केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री वडकबाळ येथे घडला होता. या महिलेला मंद्रूप पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वडकबाळ येथील नाईक नगर तांड्यावर गुरुवारी सायंकाळी संजय भुताळी पुजारी (वय ३९) या इसमाचा लाकडी फळीने कपाळावर आणि कानावर मारल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांनी त्याची प्रेयसी भाग्यश्री महादेव भोई (वय ३५) नाईक नगर तांडा वडकबाळ हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मंद्रूप पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी ही माहिती दीली.
मयत संजय पुजारी आणि भाग्यश्री भोई यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून ते दोघे वेगळे राहत होते. त्यांच्यातील संबंध दुरावलेले होते. मयत संजय पुजारी दारूच्या नशेत तिच्या घराकडे जाऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत होता. पुन्हा एकत्र राहण्याचा आग्रह धरीत होता; मात्र त्याच्या वागणुकीला कंटाळलेल्या भाग्यश्रीने त्याला अनेकदा घराबाहेर पाठवले. यातून वारंवार तक्रारी होत होत्या. गुरुवारी संजय पुजारी याला लाकडी फळीने मारल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी भाग्यश्री भोई हिला ताब्यात घेतले.