सांगोला : रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग (एन एच- १६६ ) अंतर्गत कोल्हापूर- सांगलीकडून सांगोला शहराकडे येताना आयआरसी, टाऊन प्लॅनिंग आदींचे पायाभूत निकष बाजूला ठेवून काही लोकांच्या फायद्यासाठी काम सुरू आहे. हजारो कोटी रुपये खर्चून बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून सांगोला शहरात येण्यासाठी प्रवेश मार्गच बांधलेला नाही. ही बाब तांत्रिकदृष्ट्या अत्यंत धक्कादायक असून, प्रफुल्ल कदम यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
सांगोला शहर व पश्चिमेकडील अनेक गावांवर हा फार मोठा अन्याय झाला असून, त्यांची फसवणूक झाल्याची बाब किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी निवेदनाद्वारे उघड केली आहे. यासंदर्भात प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडील सर्व गावांचे शिष्टमंडळ थेट पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहे. ७ किमी अगोदर सर्व्हिस रोडने ५ गावाचे रोड क्रॉसिंग, १० स्पीड ब्रेकर्स, २ सूतगिरण्यांच्या रहदारीसह दोन ठिकाणी यू-टर्न घेऊन जीव मुठीत घेऊन सांगोला शहरात प्रवेश केला जातो. ही बाब तांत्रिकदृष्ट्या धक्कादायक व उघडपणे चुकीची व अत्यंत अन्यायकारक आहे. आयआरसी निकषानुसार व व्यावहारिकदृष्ट्या असे संरेखन करताच येत नाही असा स्पष्ट आरोप प्रफुल्ल कदम यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय खुल्या चौकशीची मागणी प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखालील सर्व गावांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांकडे करणार आहेत.