पंढरपूर : व्याजाने घेतलेले पैसे परत करूनदेखील सावकाराने दिलेल्या मानसिक त्रासास कंटाळून लहू दिगांबर शिंगाडे (वय २८, रा. देशमुख मठामागे, भक्तिमार्ग, पंढरपूर) या तरुणाने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत या तरूणाच्या पत्नीने गुरूवारी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहू शिंगाडे यांनी संभाजी मरिबा काळे व अंबिका संभाजी काळे (दोघे रा. पंढरपूर) यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यांनी पैशाची परतफेड करूनदेखील आणखी ४० हजार रुपये व्याजाचे दे म्हणून काळे यांनी शिंगाडे यांच्याकडे तगादा लावला.
तसेच शिवीगाळ, धमकी देऊन लहू यांना त्रास दिला. या त्रासाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्त्या करण्यास, त्याच्या मरणास संभाजी काळे यांनीच प्रवृत्त केल्याची तक्रार मोनाली शिंगाडे यांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बागाव करीत आहेत.