सोलापूर : मागील सहा महिन्यांपासून मित्राचा मृत्यू झाल्याने संदीप हा मानसिक तणावात होता. मात्र बुधवारी रात्री, माझी वाट पाहू नका, मी आता परत येणार नाही, असे तक्षशीलानगर, कुमठा नाका परिसरात राहणाऱ्या संदीप शंकर वाघमारे (वय २५) या तरुणाने फोनवर आपल्या लहान भावास केलेला कॉल शेवटचा ठरला. अशातच त्याने रघोजी हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या धावत्या रेल्वेखाली येऊन आपला जीवनप्रवास संपविला.
गुरुवारी (ता. ३०) संदीपच्या मृत्यूची वार्ता समजताच हादरवून सोडणाऱ्या या निरोपावर विश्वासच बसत नव्हता, असे सांगताना संदीपच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या हृदयदावक घटनेने संपूर्ण कुमठा नाका परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप वाघमारे हा कुमठा नाका येथे कुटुंबीयांसमवेत राहात होता. बुधवारी (ता. २९) सकाळी घरातून निघून गेलेल्या संदीपची अशी बातमी येईल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र गुरुवारी दुपारच्या सुमारास फोन बंद करून ठेवत त्याने आत्महत्या केली. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला. संदीप हा सोलापूरमध्ये पेंटिंगचे काम करीत होता. कुटुंबीय पूर्णत: त्याच्यावर अवलंबून होते.
मात्र काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली वावरत होता. आत्महत्येनंतर त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलवरून आणि आधार कार्डवरून नातेवाइकांशी संपर्क झाला व पोलिसांनी नातेवाइकांना माहिती दिली. नातेवाइकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. मृत संदीपच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे.
बुधवारी घरातून निघून गेलेल्या संदीपची गुरुवारी मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांकडून या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातवाइकांनी गर्दी केली होती. चेहरा आणि डोके छिन्नविछिन्न झाले होते. त्यामुळे त्याला ओळखतासुद्ध येत नव्हते. मात्र त्याच्या शर्टवरून कुटुंबीयांनी ओळखले आणि आक्रोश केला.