सोलापूर : फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या हगलूर येथील तरुणाला अंत्रोळीकरनगर रस्त्यावर जीप चालकाने पाठीमागून ठोकरले. धडकेनंतर जीप चालकाचा वाहनावरील ताबा सुटून त्याने दुचाकीला जवळपास ५० मीटरपर्यंत फरपटत नेले. यात सूरज दादासाहेब पवार (वय २२, हगलुर, दक्षिण सोलापूर) हा तरुण जखमी झाला. त्याला उपस्थितांनी लगेच रुग्णालयात दाखल केले.
सोमवारी १२ वाजण्याच्या सुमारास सूरज हा कुमठा नाका येथून आसरा चौकाकडे दुचाकीवरून जात होता. कुमठा नाका ते महिला हॉस्पिटलदरम्यान पाठीमागून येणाऱ्या (एमएच १४ सीसी ६०६२) या जीपने ठोकरले. यात दुचाकी कारच्या समोरील भागात अडकली. धडकेनंतर पाठीवर पडल्याने त्याच्या पाठीचा भाग पूर्ण सोलून निघाला. याशिवाय दोन्ही हाताचे कोपरे आणि पायालाही जखम झाली होती. दरम्यान, अपघातानंतर चालक तेथे थांबला नाही, अशी माहिती तेथील रविकांत कोळेकर यांनी दिली. दरम्यान, सूरज दुचाकीवरून पडला आणि थोड्याच अंतरावर बाजूला झाला. मात्र जीपचालकाने ५० मीटरपेक्षा जास्त अंतर दुचाकीला फरपटत नेले. त्यानंतर तेथील विजेच्या खांबाला धडक देऊन गाडी थांबली.