बंगळूरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या एकदिवसीय दौ-यावर बंंगळुरूमध्ये दाखल झाले. यानंतर, विमानतळावरील त्यांच्या स्वागताचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कानात काहीतरी बोलताना दिसत आहेत. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रोटोकॉलनुसार, जेव्हा पंतप्रधान विमानतळावर पोहोचतात, तेव्हा राज्याचा प्रमुख अथवा त्यांचा प्रतिनिधी तेथे उपस्थित असणे आश्यक असते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वत: फुलांचा हार घेऊन पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उभे होते. पारंपारिक टोपी आणि हार घालून मोदींचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान मोदी अचानक सिद्धरामय्या यांच्या जवळ जात त्यांच्या कानात काहीतरी बोलले. नेमका याच क्षणी हा फोटो क्लिक झाला आणि आता नेटकरी या फोटोला विविध कॅप्शन्स देऊन तर्कवितर्क लढवत आहेत.
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
गेल्या एका आठवड्यात पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी संवाद साधताना दिसून आले. सहसा मोदी काँग्रेसवर सडकून टीका करताना दिसतात, मात्र अलीकडेच ते राहुल गांधींशी चर्चा करताना, तर मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी हस्तांदोलन करून विनोद करताना दिसले होते. आता काँग्रेसशासित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबतची ही जवळीक पाहून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
















