नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि अखेरीस तो भारतात परत येईल. तेथील जनता आता त्यांच्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे असे जयशंकर म्हणाले.
नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात पीओकेमधील वाढत्या हिंसाचाराबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर होत असलेला विकास पाहून पीओकेचे लोक भारताकडे आकर्षित झाले आहेत. ते इकडचा सकारात्मक बदल पाहून स्वत:ला प्रश्न विचारत आहेत की, या गोष्टी ख-या आहेत, तर आम्हाला इकडे इतका त्रास का होत आहे? आम्ही असा अत्याचार का स्वीकारत आहोत?
लोक हिंसाचाराला कंटाळले आहेत
परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये संपूर्ण अराजकता पसरली आहे, स्थानिक लोक हिंसाचाराला कंटाळले आहेत. वाढती महागाई आणि वाढलेल्या वीजबिलामुळे अनेक दिवसांपासून परिसर अशांत आहे. पीओके एक वेगळी श्रेणी असली तरी, तो शेवटी भारताचा भाग आहे आणि भारतात परत येईल, याबद्दल आमच्या मनात शंका नाही, असेही ते यावेळी म्हणाले.