23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeविशेषअंनिसची यशस्वी वाटचाल

अंनिसची यशस्वी वाटचाल

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रात स्थिरावली आणि ३३ वर्षांची यशस्वी वाटचाल करून आज दखलपात्र ठरली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दूरदृष्टी आणि कल्पक नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट १९८९ साली सुरू झाले, त्यावेळी व्यापक चळवळीत मोठ्या प्रमाणात उपेक्षेचा दृष्टिकोन होता. काहींना असे वाटायचे की, हे काम पुरोगामी कार्याला प्रसंगानुरूप पूरक व दुय्यम वाटत होते. तर काहींना हे काम चिल्लर जादूचे प्रयोग असेही वाटत होते. डॉक्टरांच्या खुनापर्यंत या कार्याला संघटितपणे २४ वर्षे पूर्ण झाली होती. ही वाटचाल अंधश्रद्धा निर्मूलन, शास्त्रीय विचार पद्धती, वैज्ञानिक दृष्टिकोन, कठोर पण विधायक धर्म चिकित्सा, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद ते मानवतावाद या चढत्या मार्गाने करण्याचा प्रयत्न समितीने केला, करते आहे आणि पुढे करणार आहे. योग्य काय, अयोग्य काय?, चांगले काय, वाईट काय? याचा निर्णय आपल्या विवेकाच्या आधारे घेण्याचा आत्मविश्वास जनमानसात रुजवण्याचा अथक प्रयत्न समितीने केला आहे. वास्तवाचे ज्ञान आणि भान आपल्या उक्ती आणि कृतीमधून आचार, विचार, उच्चार व प्रसार या माध्यमातून केवळ जनाधारावर, प्रसंगी स्वत:च्या खिशाला चाट देऊन बहुसंख्य जिल्ह्यांतून कार्यकर्ते महाराष्ट्रात संघटनेचे काम करत आहेत. डॉक्टरांच्या खुनाच्या वेळी महाराष्ट्रात १८० ते २०० शाखांच्या माध्यमातून अगदी कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन हजारो कार्यकर्त्यांनी जनमानसाच्या मनावर संघटनेचा एक वेगळा ठसा उमटवला. या राज्यात आणि देशातही अंधश्रद्धा या विकासाच्या मार्गातील एक प्रमुख अडथळा आहेत. अंधश्रद्धा हा प्रश्न आहे आणि तो विवेकाच्या आधारे सोडवता येतो हे संघटनेने अधोरेखित केले आहे.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या संवेदनशील क्षेत्रात महा. अंनिसने जाहीर संवाद सुरू केला जो संवाद महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णा भाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या निधनानंतर हा संवाद बंद झाला होता. आज समाजात एक सूर दिसतो की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. पण बहुतांश लोक श्रध्देच्या नावाखाली अंधश्रद्धाच जोपासतात. अंधश्रद्धा ही श्रध्देच्या क्षेत्रातील काळा बाजार आहे. सर्व अंधश्रद्धा या विकासविरोधी असतात म्हणून चळवळीचे मत आहे की, श्रद्धा या तपासायला तयार असल्या पाहिजेत. जी श्रद्धा तपासायला तयार असते तिचा आम्ही आदर करतो. पण ज्या श्रद्धा तपासायला तयार नसतात त्या सर्व अंधश्रद्धाच असतात. मानवी प्रगतीचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा आहे. म्हणूनच समाजाला डोळस बनवण्यासाठी समितीने हा सुसंवाद सुरू केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या समग्र वाङ्मयात नमूद केले आहे की, ‘श्रद्धाळूपणा हा गुण काही वाईट नव्हे! परंतु त्यालाही मर्यादा आहेत. श्रद्धाळूपणाच्या पायीच म-हाटी साम्राज्याचा सत्यानाश आपला आपण कसा करून घेतला हे चांगले ध्यानी येईल.’

सर्व जाती-धर्मातील हजारो भोंदू बुवा, बाबा, मांत्रिक, देवी, बाई, माता, महाराज, बापू यांचा भांडाफोड करून त्यांचे खरे रूप लोकांसमोर संघटनेने मांडले. लाखो लोकांची होणारी लूट थांबवली. भानामतीची हजारो प्रकरणे कुशलतेने हाताळून त्यामागील कारणे शोधून त्या कारणांचे निराकरण करून उद्ध्वस्त होणा-या कुटुंबांना महा. अंनिसने जगण्याचा आधार दिला. समुपदेशनाने प्रसंगानुरूप डॉक्टरांच्या उपचारांच्या माध्यमातून प्रबोधन करून होणा-या आत्महत्या थांबवल्या. ज्योतिषाला, बुवाबाजीला, चमत्काराला, भ्रामक वास्तुशास्त्राला, भूत संकल्पनेला, भानामतीला, पोतराज, नरबळी प्रथेला आव्हान देऊन त्यातला फोलपणा जनतेसमोर मांडला. व्यसन, कालबा कर्मकांड, हुंडा पद्धतीला फाटा देऊन, जोडीदाराची विवेकी निवड उपक्रम तरुणाईत रुजवून कमी खर्चाच्या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन जातीविरहित समाजनिर्मितीसाठी चळवळ कृतिशील कार्यरत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही या राज्यात आणि देशात समांतर न्यायव्यवस्था जात पंचायतीच्या नावाखाली चालू होती. त्याच जातीतील काही स्वयंघोषित पंच त्याच जातीतील सामान्य लोकांचे बेमालूमपणे शोषण करीत होते. शोषणाला विरोध केला तर बहिष्कृत केले जात होते. हा अतिशय गंभीर प्रश्न सरकारपुढे मांडून, त्याचा पाठपुरावा करून डॉक्टरांच्या खुनानंतरही सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा मंजूर करण्यास सरकारला भाग पाडून भटक्या-विमुक्त, आदिवासी जनतेला सन्मानाने जगण्याचा हक्क प्रस्थापित करून दिला. पर्यावरणीय रक्षण, विधायक धर्म चिकित्सा, वैज्ञानिक दृष्टिकोन सामान्य माणसात रुजविणे अशा अनेक कृति कार्यक्रमांची माहिती देता येऊ शकेल. महा. अंनिसच्या माध्यमातून होणारे हे मूल्यपरिवर्तन इथल्या सनातन्यांना रुचले नाही. त्यांनी या चळवळीचा म्होरक्या मारला की चळवळ व विचार संपेल, या भोळसट संकल्पनेतून २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून केला.

एक सप्टेंबर २०१३ ला महा. अंनिसच्या सर्व नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी आम्ही सारे दाभोलकर म्हणून निर्धार केला. डॉ. दाभोलकरांचा खून झाला आणि चळवळ संपली असे होऊ नये यासाठी तत्कालीन राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र कार्यकर्त्यांनी पिंजून काढला आणि ‘माणूस मारता येतो, विचार मारता येत नाहीत’ हे आपल्या संघटनात्मक कामातून सिद्ध करून दाखवले. आज महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांतून ३५० हून अधिक शाखांतून हजारो कार्यकर्ते कार्यरत आहेत. रौप्यमहोत्सवी वर्ष, त्रिदशकपूर्ती, आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात यशस्वी पार पाडली. राज्याच्या बाहेर इतर राज्यांतही चळवळीच्या कामाला मागणी वाढली. जगाला दिशादर्शक असे जादूटोणाविरोधी व सामाजिक बहिष्कारविरोधी असे दोन कायदे महाराष्ट्र शासनाला मंजूर करण्यास भाग पाडले. शेजारच्या कर्नाटक राज्यातही तीन वेळा राजकीय नेते, मठाधिपती, मठ संस्थान, सामाजिक संघटना यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे कर्नाटक राज्यातही जादूटोणाविरोधी कायदा मंजूर झाला. केरळ राज्यात तो प्रस्तावित आहे. महा. अंनिसच्या कृतिशील मार्गदर्शन व सहकार्याने दक्षिण आफ्रिकेतील युगांडा देशातही जादूटोणा, नरबळीविरोधी कायदा मंजूर झाला. आज समाजात कुठेही, कधीही अंधश्रद्धांच्या संदर्भात कोणतीही घटना घडली तर प्रसार माध्यमे व समाज हे महा. अंनिसचेच मत घेतात. महा. अंनिसने या क्षेत्रात आपल्या कार्यातून एक वेगळा ठसा उमटवला आहे आणि म्हणूनच महा. अंनिस ही चळवळ आता दखलपात्र ठरली.

पुरोगामी परिवर्तनवादी पक्ष, संस्था, संघटना क्षीण होत असताना डॉक्टरांच्या खुनानंतर एका बाजूला डॉक्टरांनी घडवलेल्या कार्यपद्धतीतून कार्यकर्त्यांनी महा. अंनिस ला सामाजिक क्षेत्रात केंद्रस्थानी पोचवले. लोकांची जात व धार्मिकता ही अस्मिता, अहंकार, अभिनिवेश याद्वारे प्रकट करून त्यामार्फत स्वत: चे राजकारण करणे सध्या राजकीय पुढा-यांकडून चालू आहे. लोकांना अंधश्रद्धा, कर्मकांड, व्रतवैकल्ये, सणावारात गुंतवून ठेवणे व लोकांवर भुरळ पाडणे हे बिनबोभाट चालू आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या २१ व्या शतकातही शिक्षित, अशिक्षित समाज अतिशय किळसवाण्या आघोरी अंधश्रद्धांना बळी पडत आहे. आध्यात्मिक बुवाबाजी वाढते आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांत रुजवणे ही जबाबदारी शिक्षण क्षेत्राची आहे. प्रसार माध्यमे, शासन-प्रशासन यांच्या सहकार्याने प्रबोधनाच्या माध्यमातून मूल्यपरिवर्तनाचे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट समोर आहे. ही लढाई दशकाची नसून शतकाची आहे.

डॉक्टरांनी शून्यातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम सुरू केले. असंख्य कार्यकर्त्यांच्या सहभागाने संघटना वाढली, विस्तारली आणि नावलौकिकाला पात्र ठरली. माणसं येतात- जातात मात्र संस्था, संघटना कायम असतात. संघटनेचा विचार, नेत्याचे कुशल नेतृत्व व कार्यकर्त्यांचा कृतिशील संघटनात्मक प्रतिसाद यातून संघटनेचा नावलौकिक वाढतो आणि संघटनेच्या नावलौकिकामुळे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढतो. महा. अंनिस या संघटनेचे नि:स्वार्थपणे काम करणा-या या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजातील संघटनेचे पाठीराखे, हितचिंतक, आधारस्तंभ हे संघटनेच्या सोबत भक्कमपणे उभे राहतील असा विश्वास आहे. संघटनेचे हे सर्व काम सर्वार्थाने सामाजिक भान असणारे, वेदनेशी नाते जोडणारे, विवेकी विचार जोपासणारे, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचे पाठीराखे, आधारवड असलेल्या पाठीराख्यांच्या लोकसहभागातून चालते. त्यांच्याकडून आजपर्यंत जो आधार, पाठबळ संघटनेला मिळाला तो यापुढेही वृद्धिंगत होईल ही या वर्धापन दिनानिमित्त रास्त अपेक्षा.

-माधव बावगे,
राज्य कार्याध्यक्ष, महा. अंनिस
मोबा.: ९४०४८ ७०४३५

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या