18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeविशेषआठवण प्रज्ञासूर्याची...!

आठवण प्रज्ञासूर्याची…!

एकमत ऑनलाईन

बघता बघता भारताच्या संसदीय लोकशाहीने स्वातंत्र्याची पंचाहत्तरी गाठली ! याचवेळी सहज मागे वळून पाहताना अनेक प्रश्न वर्तमानाला जागवून गेले. या पंचाहत्तर वर्षांत थोड्याफार प्रश्नांची सोडवणूक आपण करू शकलो आहोत; परंतु बहुतांश प्रश्न अनुत्तरितच आहेत, बरेच प्रश्न विस्मृतीत गेले आहेत, काही प्रश्नांची उत्तरं असहनीय आहेत तर काही प्रश्न पार चिंध्या चिंध्या होऊन वेशींवर लटकत आहेत! याच अनेक प्रश्नांपैकी आज एक प्रश्न पडला आणि तो म्हणजे ‘आठवणीत आहेत ना बाबासाहेब…?’
एखाद्या महापुरुषाची जयंती पुण्यतिथी साजरी करणे म्हणजे केवळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे नाही, तर त्या व्यक्तीच्या सर्वांगीण कार्याचे, विचारांचे चिंतन-मंथन करून ते विचार समकालीन सैद्धांतिक परिपेक्ष्यामध्ये; प्रत्येक व्यक्तीबरोबरच संपूर्ण देशाला कसे मार्गदर्शक ठरतील याचे सिंहावलोकन होणे म्हणजे त्या महापुरुषाची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करणे होय ! त्याच अनुषंगाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या समाजोद्धारक आणि भारताच्या सर्वांगीण जडणघडणीमध्ये असलेल्या सर्वोदयी कार्याचा गौरव होण्याबरोबरच वर्तमानात त्यांचे विचार समाजात फक्त बोललेच जात आहेत (?) का ते तोलले पण जात आहेत (?) या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. बालपणापासून ते शेवटच्या श्वासांपर्यंत संघर्ष, प्रतारणा, अपमान आणि अवहेलनेने ओतप्रोत भरलेले जीवन बाबासाहेबांना जगावे लागले! स्वत:च्या परिसरापासून ते अगदी भारतीय संसदेपर्यंत येथील प्रस्थापित व्यवस्थेने बाबासाहेबांना उभ्या हयातीत मनोमन कधी स्वीकारलेच नाही! तरीसुद्ध
न डगमगता हा योद्धा-महापुरुष सातत्याने येथील वंचित, शोषित, पीडित, स्त्री-शुद्रातिशुद्रांचा बुलंद आवाज बनत राहिले.

उपेक्षितांना समाजामध्ये सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन, प्रसंगी प्रस्थापितांसोबत दोन हात करून या दुर्लक्षित वर्गाचे गा-हाणे मांडण्यात ते यशस्वी ठरले. संपूर्ण विश्वामध्ये आपल्या देशाला स्वतंत्र, लोकशाहीवादी, अखंड, अभेद्य, एकजूट, सक्षम, आनंदी, सुरक्षित, न्यायिक आणि धर्मनिरपेक्ष ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस अहोरात्र जागून, उपाशीपोटी, कंबरदुखीचा भयंकर शारीरिक त्रास सोसून भारतीय राज्यघटनेसारखा महान ग्रंथ निर्माण करून २६ जानेवारी १९५० रोजी देशाला अर्पण केला. हे करत असताना बाबासाहेबांनी इंग्लंड, अमेरिका, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडा, सोव्हिएत युनियन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि जपान या जगातील लोकशाहीचे पुरस्कर्ते असलेल्या देशांच्या राज्यघटनांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून त्यातील भारतीय व्यवस्थेला पूरक ठरतील अशीच प्रकरणे, कलमे, परिशिष्टे, परिच्छेद, विभाग फक्त उचलून (कॉपी-पेस्ट नाही) घेतले नाहीत, तर त्या घटकांना भारतीय सर्वांगीण व्यवस्थेनुसार कायदेशीर परिभाषेत रुपांतरित करून भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हे चांगलेच ज्ञात होते की; मला होणारा शारीरिक त्रास मी झेलेन परंतु पुढील येणा-या हजारो पिढ्या व्यथा-वेदना-अन्याय-भेदाभेद-पिळवणूक इत्यादीपासून मुक्त झाल्या पाहिजेत. असे आईचे काळीज घेऊन बाबासाहेबांनी उभं आयुष्य देशाला अर्पण केलं. ते कोणत्याच व्यवस्थेला कधीच शरण गेले नाहीत, की आपली नीती-तत्त्व सोडून पथभ्रष्ट झाले नाहीत.

परंतु आज भोवतालचे वर्तमान सातत्याने अस्वस्थ करीत आहे. भारतीय लोकशाहीची पंचाहत्तरी ओलांडताना देशासमोरील आव्हाने दिवसेंदिवस जास्तच भयंकर होत चालली आहेत. भ्रष्ट-मळके हातच जयंती-पुण्यतिथी साजरी करत आहेत. तेच हात व्यवस्थेचा गळा घोटत आहेत. महापुरुषांचे अनुयायी म्हणणारेच लोक महापुरुषांच्या विचारांची प्रतारणा करताना दिसत आहेत. हे पाहून कधीकधी मन हताश होते आणि महाकवी वामनदादा कर्डकांचे शब्द आठवतात.
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते

तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते ।। धृ।।
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते ।। १।।
तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते ।। ३।।
ढासळत चाललेली लोकशाहीमूल्ये, सत्तापिपासू, गोचीड वृत्तीपायी राजकारणात बोकाळलेले भ्रष्ट अर्थकारण आणि बहुमतांच्या ‘ठोक’शाहीमुळे कधी कधी लोकशाही कोरोनाग्रस्त होऊन व्हेंटिलेटरवर जात आहे. सर्वत्र महामानवांच्या नावाचा जयजयकार करून महामानवांच्या मूल्यांनाच हरताळ फासला जात आहे. महामानवांना डोक्यावर घेऊन मिरवणे हे प्रगतीचे लक्षण नाही, तर त्यांच्या विचारांचे पाईक होऊन ते महान विचार डोक्यात गेले पाहिजेत हीच खरी प्रगती! फोटोला घालायच्या हारापेक्षा त्यांच्या जीवन-तत्त्वांचे सार जर प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनी उतरवले तरच त्यांचा त्याग आणि कर्तृत्व ख-या अर्थाने कारणी लागल्याशिवाय राहणार नाही.
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपताना, बाजूच्या व्यक्तीचा विचार न करता आपणच कृती आणि विचाराने समृद्ध होणे अपेक्षित आहे.

बाबासाहेब एके ठिकाणी लिहितात, ‘मनाची मशागत करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे.’ म्हणजेच माणूस अंतर्बा शुद्ध-प्रांजळ होणे अपेक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, धार्मिक, बौद्धिक, सैद्धांतिक आणि वैचारिक क्षेत्रातील वाङ्मयीन योगदान हे अनन्यसाधारण असून ते नित्य मार्गदर्शक आहे. एके ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुणांना मार्गदर्शन करताना फार महत्त्वपूर्ण लिहितात, ‘ज्याला दु:खातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला आधी शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे.’ म्हणजेच ज्ञान हे महाकाय, विशाल सागरासारखे असून जात, धर्म, पंथ, लिंग, भेद याऐवजी ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आणि तारक विश्वतत्त्व आहे. तेव्हा तरुणांनी बाबासाहेबांना आदर्श मानून स्वत:मध्ये ज्ञानपिपासू वृत्ती धारण करणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेशिवाय सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून इंग्रजीमध्ये लिहिलेले ग्रंथ हे पुढील हजारो पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत.

जसे की, अनहीलेशन ऑफ कास्ट, दि प्रोब्लेम ऑफ रुपी, हू वेअर शुद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्धा अँड हिज धम्मा, कास्ट्स इन इंडिया, फिलॉसॉफी ऑफ हिन्दुइझम, रिडल्स इन हिन्दुइझम, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, दि पार्टिशन ऑफ इंडिया आणि आत्मचरित्रपर ग्रंथ ‘वेटिंग फॉर विजा’ इत्यादी बाबासाहेबांची ग्रंथसंपदा हा त्यांचा सर्वांगीण अभ्यास आणि त्यांच्या विचारांचा परीघ हा प्रकर्षाने त्यांचे जगण्याचे तत्त्वज्ञान, अर्थशास्त्रज्ञ, प्रखर राष्ट्रवाद, शोषितांचा आवाज, भारतातील जात आणि धर्म इत्यादी वैश्विक मानवी मूल्यांनी विस्तारलेला दिसून येतो. म्हणूनच संपूर्ण जग बाबासाहेबांना ‘दि सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून ओळखते ! तेव्हा, वर्तमानात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत, राजकारणी, समाजकारणी, अर्थतज्ज्ञ, अधिकारीवर्ग, उद्योगपती आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपले आदर्श असून; मी माझे काम इमाने-इतबारे करून भ्रष्ट वर्तन करणार नाही, देशातील शेवटच्या घटकाचा विचार करून कार्य करत राहीन अशी ‘शपथ’ घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करावी!

वर्तमानात आपण डॉ. आंबेडकरांची मूल्यं आणि तत्त्वांची रुजवणूक करून जीवन प्रज्ञा, शील, करुणेने समृद्ध करूयात! त्यांनी स्वीकारलेला शांतिदूत महात्मा गौतम बुद्धांचा बुद्ध धम्म, कबीरांच्या दोह्यातील रोखठोक तत्त्व, बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टी, जगद्गुरू तुकोबांचा विश्वव्यापक विवेक-विचार, महात्मा ज्योतिराव फुल्यांचे कर्तृत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाऊ बाणा ही विश्वात्मक तत्त्वे आपण दीपस्तंभ म्हणून समोर ठेवूयात ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जाज्वल्य स्वाभिमान, ज्ञानपिपासा, चरित्र, चारित्र्य, आत्मसंयम, अलौकिक बुद्धिमत्ता, अखंड विद्यार्थी वृत्ती, महान वाक्चातुर्य, विवेकाधिष्ठित धर्म संकल्पना, प्रचंड देशाभिमान, सामान्यांचा विकास, स्वातंत्र्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, प्रभावशाली पोशाख, बहुभाषिकत्व, प्रखर राष्ट्रवाद इत्यादी सर्वांगीण मूल्ये आपल्या जीवनात रुजवून त्यांच्या स्वप्नातील महान, स्वावलंबी, भ्रष्टाचारमुक्त, शक्तिशाली, उद्योगी, धर्मनिरपेक्ष भारत घडवूयात!

-प्रा. डॉ. विठ्ठल खंडूजी जायभाये
कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
मोबा. ९१५८० ६४०६८

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या