20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeविशेषआनंददायी प्रवास

आनंददायी प्रवास

एकमत ऑनलाईन

आयुष्यात अपेक्षित आनंदापेक्षा अनपेक्षित आनंदाचे मोल वेगळेच असते. दादासाहेब फाळके पुरस्कार हा असाच अनपेक्षित आनंद देणारा सुखद धक्का ठरला. या पुरस्काराच्या निमित्ताने माझ्या कारकीर्दीचा पट डोळ्यासमोर तरळून गेला. आजवरच्या कारकीर्दीमध्ये मी काही गमावले नाही, केवळ मिळवतच गेले आहे. आयुष्यात काही गोष्टी मला मानसिक धक्का देणा-या ठरल्या. पण त्या कटू आठवणी मी मनाच्या कुपीत बंद करून टाकल्या आहेत. त्यांना मी कधी उजाळा देत नाही. गेल्या सहा-सात दशकांत सिनेसृष्टी पूर्णपणे बदलून गेली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी मी यातील बदल टिपत असते. याखेरीज माझा अधिकाधिक वेळ सामाजिक कार्यासाठी कसा उपयुक्त ठरेल, यासाठीही मी नेहमीच प्रयत्नशील असते.

सिनेसृष्टीतील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार मला मिळणे ही माझ्याच नव्हे तर कोणाही कलावंताच्या आयुष्यातील अत्यंत सन्मानजनक बाब आहे. खरं सांगायचं तर हा पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती. पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मी अमेरिकेत बोस्टन शहरात होते. ३० सप्टेंबर रोजी पुरस्कार स्वीकारण्याचे निमंत्रण आले तेव्हाही मला यावर विश्वास बसला नाही. आयुष्यात अपेक्षित आनंदापेक्षा अनपेक्षित आनंदाचे मोल वेगळेच असते. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याने मला खरोखरीच मनस्वी आनंद झाला. यानिमित्ताने माझ्याच कारकीर्दीचा पट डोळ्यासमोर तरळून गेला. मी पारेख कुटुंबातील एकुलती एक लेक. आई-वडिलांनी माझ्यावर अतोनात प्रेम केले. पण या प्रेमामुळे, लाडामुळे बिघडणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली. सकाळी लवकर जागे करण्याची सवय त्यांनी लावली. शाळेचा गृहपाठ स्वत:च करण्यासाठी त्यांचा मला आग्रह असायचा. मला नृत्य आवडायचे म्हणून नृत्याचे क्लास लावले. मी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. ते सर्व सोलो नृत्य असायचे. एकदा मला नृत्य करताना प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांनी पाहिले. ते माझ्या वडिलांशी बोलले. अखेर मायानगरीत एन्ट्री झाली. त्यांनी माझे ‘बाप-बेटी’ चित्रपटासाठी कास्टिंग केले. हा चित्रपट पडला. मी आणखी काही चित्रपट केले, परंतु ते चालले नाहीत. मी निराश झाले आणि पुन्हा अभ्यासाला लागले.

‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटासाठी मला ऑफर आली. माझी निवडही झाली. मात्र चित्रपट सुरू होताच दिग्दर्शक विजय भट्ट यांनी मला चित्रपटातून काढून टाकले. एवढेच नाही तर त्यांनी सर्व निर्मात्यांना, आशाकडे स्क्रीन प्रेझेन्स नाही, असे सांगितल्यामुळे माझी काहीशी बदनामी झाली. मी त्यांचे काय बिघडवले होते, देवालाच ठाऊक ! पण त्यांच्या अपप्रचारामुळे माझे करिअर सुरू होण्याआधीच संपले. यादरम्यान फिल्मालय स्टुडिओचे सर्र्वेेसर्वा आणि प्रसिद्ध निर्माते शशधर मुखर्जी म्हणजे काजोलचे आजोबा यांनी ‘दिल दे के देखो’ या चित्रपटासाठी कास्टिंग करण्याची इच्छा माझ्याजवळ बोलून दाखविली. तेव्हा मी अवघी १६ वर्षांची होते. शाळेचा अभ्यास संपला होता. या चित्रपटाचे लेखक नासिर हुसेन होते. दिग्दर्शक जसवंत लालजी यांनी माझी स्क्रीन टेस्ट घेतली. त्यांनी माझा एक क्लोजअप हा मुखर्जी आणि नासिर हुसेन यांना पाठविला. तो त्यांना खूप आवडला. पुढच्या आठवड्यात शम्मी कपूर यांना एक दिवस मोकळा होता. त्यादिवशी त्यांच्यासमवेत एक सीन साधना आणि एक सीन आशा देईल, असे ठरले. पडद्यावर जिचा चेहरा चांगला दिसेल, तिची निवड करायची असे ठरवण्यात आले. शम्मी कपूर आले तेव्हा मी तेथेच होते. मात्र साधनाच्या डोळ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे ती येऊ शकली नाही. संपूर्ण दिवसभर शम्मी यांच्यासमवेत माझे चित्रीकरण पार पडले. या चित्रपटातील काम, लूक, स्क्रीन प्रेझेन्स हा नासिर हुसेन आणि मुखर्जी या दोघांनाही मनापासून आवडला. नायिका म्हणून चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीची सुरुवात करताना मिळालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि माझ्या अभिनयप्रवासाची नाव प्रवासाला निघाली.

आजवरच्या प्रवासात अनेक प्रसिद्ध नायकांसमवेत मी काम केले. देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, मनोज कुमार, जितेंद्र अशा अनेक आघाडीच्या कलाकारांची नावे सांगता येतील. या सर्वांशी माझे ‘कार्डियल रिलेशन’ किंवा
सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. मात्र शम्मी कपूर यांच्याबरोबरचे संबंध कौटुंबिकस्वरूपाचे होते. माझी आणि त्यांची जोडी रोमँटिक होती. प्रत्यक्षात मी त्यांना ‘चाचू’ म्हणायचे. शम्मी कपूर यांची पत्नी नीला देवी यांना ‘चाची’ म्हणायचे. शम्मी आता नाहीत, परंतु नीला यांच्याशी माझा आजही सपंर्क असतो. आम्हा दोघीतील जिव्हाळा इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. विशेष म्हणजे, त्या माझा वाढदिवस कधीही विसरत नाहीत. दरवर्षी माझ्या वाढदिवसाला न चुकता फोन करतात. अशी काही नाती अविस्मरणीय असतात.

देव साहब यांचे व्यक्तिमत्त्व सदाबहार होते. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर त्यांना खूपच अभिमान होता. माझे त्यांच्याशी प्रोफेशनल रिलेशन होते. राजेश खन्ना हे थोडेफार मला घाबरायचे. अर्थात ते थोडे ‘इंट्रोव्हर्ट’ होते. राजेश खन्ना यांचा पदार्पणातील चित्रपट होता ‘बहारों के सपने’. या चित्रपटासाठी एका मोठ्या नायिकेला साईन करण्यात आले होते. मात्र त्या नायिकेने काम करण्यास नकार दिला. त्यानंतर नासिर हुसेन यांनी मला तो चित्रपट करण्यास सांगितले. माझ्याकडे तारखा शिल्लक नव्हत्या. तेव्हा नासिर म्हणाले, की तुझ्या तारखा सांभाळून घेऊ, पण तू हा चित्रपट कर. त्यांच्या सांगण्यावरून राजेश खन्ना यांच्यासोबत हा चित्रपट केला. त्यावेळी मी फिल्म इंडस्ट्रीत स्थिरावलेली नायिका होते आणि राजेश खन्ना पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार होते. मी सीनियर असल्याने राजेश खन्ना मला घाबरून असायचे. अशा अनेक आठवणींचे मोहोळ या पुरस्काराच्या निमित्ताने जागे झाले. आजवरच्या कारकीर्दीमध्ये मी काही गमावले नाही, केवळ मिळवतच गेले आहे. आयुष्यात काही गोष्टी मला मानसिक धक्का देणा-या ठरल्या. जेव्हा मी सेन्सॉर बोर्डासाठी काम करत होते, तेव्हा मी काही चित्रपटांना यू प्रमाणपत्र न दिल्याने काही निर्माते माझ्यावर नाराज झाले. चित्रपट उद्योग वेल्फेअर ट्रस्टसाठी काम करणे म्हणजे तर काटेरी खुर्चीवर बसण्यासारखे होते. तेथील कटू आठवणी मी मनाच्या कुपीत बंद करून टाकल्या आहेत. त्यांना मी कधी उजाळा देत नाही.

गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टी खूप बदलली आहे. माझ्या दुस-या इनिंगमध्ये याचा अनुभव मी घेतला. मला मिळणा-या भूमिका या समाधान देणा-या नव्हत्या. सकाळी नऊच्या शिफ्टमध्ये काम असताना माझे सहकलाकार हे चित्रीकरणासाठी सायंकाळी सहा वाजता यायचे. प्रत्येक चित्रपटावेळी असेच अनुभव येऊ लागले. सिनेसृष्टीत इतर कलाकारांचा मान न ठेवणारे काही जण आहेत. अशा लोकांमुळे अखेरीस मी चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा दशकांत भारतीय चित्रपटविश्वाने तांत्रिक पातळीवर खूपच झेप घेतली आहे. मेकअप असो, संपादन असो, संगीत असो, व्हीएफएक्स असो, यातील अद्ययावततेने आज भारतीय चित्रपटसृष्टी ही हॉलिवूडपेक्षा कमी नाही, हे दाखवून दिले आहे. बाहुबली, आरआरआर, ब्रह्मास्त्र अशा कितीतरी चित्रपटांची नावे वानगीदाखल सांगता येतील. आज चित्रीकरणासाठीचे स्टुडिओ वातानुकूलित झाले आहेत. पूर्वी स्टुडिओत काम करताना घामाच्या धारा लागायच्या. आमच्यासारख्या नायिकांना ड्रेस बदलण्याचे कामही त्याकाळी सोपे नव्हते. झाडामागे जाऊन कपडे बदलावे लागायचे. पण आज तशी स्थिती राहिली नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत व्हॅनिटी व्हॅन आल्यामुळे त्यात नायिका काम आटोपल्यानंतर आरामही करू शकतात. एकंदरीत आजचे वातावरण खूप व्यावसायिक झाले आहे. अर्थातच कलाकारांच्या दृष्टिकोनातून हे बदल सुखावह आहेत.

आयुष्याच्या संध्याकाळी हे बदल मी तटस्थपणाने टिपत असते. मला पूर्वीपासून प्रवासाची, भटकंतीची विलक्षण
आवड आहे. मी अनेकदा अमेरिकेला गेले आहे; परंतु अजूनही मला जग पाहायचे आहे. मी वाचनप्रेमी आहे. वाचनाने विचारांचे जग समृद्ध होते. आजवर मी खूप पुस्तकं वाचली आहेत; पण तितकीच वाचायची राहिली आहेत. त्यांचा धांडोळा घ्यायचा आहे. सिनेसृष्टीतील कलाकार हा माणूस या नात्याने समाजाचा घटक असतो. कलावंतांना इथल्या समाजानं भरभरून प्रेम दिल्याखेरीज तो नावारूपाला येऊ शकत नाही. रसिकांचं, चाहत्यांचं, प्रेक्षकांचं असीम प्रेम हे ऋणात्मक आहे. समाजाचंही आपल्यावर ऋण असतं. त्यातून उतराई होण्यासाठी सेवा हा सर्वमान्य मार्ग आहे. त्यामुळेच माझा अधिकाधिक वेळ सामाजिक कार्यासाठी कसा उपयुक्त ठरेल, याचेही प्रयत्न मी करत राहणार आहे.

-आशा पारेख
ज्येष्ठ अभिनेत्री

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या