18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeविशेषई-कॉमर्सचा नवा धोका

ई-कॉमर्सचा नवा धोका

एकमत ऑनलाईन

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गेल्या काही महिन्यांत विविध पातळ्यांवर गंभीर, अतिगंभीर अशा घटना घडताना दिसत आहेत. त्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. अलीकडेच एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. यामध्ये दोन गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झाले होते. हल्ला झाला होता ज्यामध्ये ४० जवानांचे बळी गेले होते. देशभरात आजवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांमध्ये याची गणना करण्यात आली. आता यासंदर्भात एक माहिती समोर येत असून त्यानुसार या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले स्फोटक पदार्थ दहशतवाद्यांनी अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीकडून खरेदी केले होते. कॅट अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने ‘अ‍ॅमेझॉन’वर देशविघातक कृत्यातील सहभागाचा हा गंभीर आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर या प्लॅटफॉर्मविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. याबरोबरच भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात विकल्या जाणा-या अफू, गांजा आणि चरसची
विक्रीसुद्धा अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून राजरोसपणाने
सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

या विषयाच्या तपशिलात जाताना सर्वांत प्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की, बॉम्ब बनवण्यासाठीचे स्फोटक पदार्थ, त्यांना लागणारी बॅटरी, ट्रिगर आदी बहुतांश साहित्य देशाच्या बाहेरून येते. प्रामुख्याने पाकिस्तानमधून किंवा चीनमधून किंवा इतर शत्रुराष्ट्रामधून चोरट्या तस्करीमार्गे ते भारतात आणले जाते. भूमार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग अशा तिन्ही माध्यमांतून त्यांची तस्करी केली जाते. म्हणजे आकाशातून आणले गेले तर ते विमानतळावर येईल, समुद्रामार्गे आले तर बंदरातून त्याचे स्मगलिंग किंवा बेकायदेशीर आणले जाईल. जमिनीवरून आले तर त्याचे स्मगलिंग करून देशाच्या आत आणले जाईल. एकदा का ते देशाच्या आत आणले गेले की, तेथून त्यांना सदर साहित्य ज्या व्यक्तीला, ज्या ठिकाणी पोहोचवायचे आहे तिथवर पोहोचवण्यासाठी सुयोग्य रणनीती आखलेली असते. किंबहुना, त्यामध्ये एक मोठी साखळी कार्यरत असते. उदा. एखादा पदार्थ काश्मीरच्या एलओसीवरून उरीमध्ये आणण्यात आला तर तेथून एक व्यक्ती ते कुरिअर श्रीनगरला पोहोचवतो. तेथून दुसरे कुरिअर त्याला जेथे हवे तिथे पोहोचवले जाते. तेथून मग जो दहशतवादी स्फोट करणार आहे त्याच्याकडे पाठवले जाते. या साखळीमध्ये दहशतवादी किंवा त्यांचे समर्थक कार्यरत असतात. यामध्ये अनेक माणसे वापरली जातात.

कारण एका माणसाकरवी जर हे पाठवले तर त्याला सुरक्षा यंत्रणेकडून पकडला जाण्याचा धोका असतो. म्हणूनच ३-४ लोक त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवतात. आजही ही छुपी साखळी कार्यरत आहे; परंतु अलीकडील काळात अ‍ॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपनीने या साखळीचे काम सोपे केले आहे. ज्या व्यक्तीला असे साहित्य हवे आहे तो थेट अ‍ॅमेझॉनवरून अथवा अन्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑर्डर करून मागवता येऊ शकते. अ‍ॅमेझॉनचे डिलिव्हरी बॉय दिवसातले १४-१५ तास कोणते ना कोणते पार्सल घेऊन शहरात या ना त्या ठिकाणी वावरत असतात. परिणामी त्यांचा कोणी अडवून तपास करत नाही. यामुळे कुठलाही संशय न येता, कुठलाही धोका न पत्करता दहशतवाद्यांचे समर्थक आपले काम फत्ते करतात. सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलिस किंवा शेजार-पाजारच्यांना याचा जराही मागमूस लागत नाही. कारण सदर पार्सल कोणालाही फोडून पाहता येत नाही. त्यामुळे जिथून त्याची मागणी केली आहे तिथून सदर व्यक्तीच्या हाती ते थेट पोहोचते.

याशिवाय अफू, गांजा, चरस यांसारखे अमली पदार्थही अ‍ॅमेझॉनच्या मदतीने पाठवले जाऊ शकतात. जमिनी सीमेवरून समजा मणिपूरमध्ये सीमेवरील तपासणीला चकवा देऊन अफू, गांजा, चरस भारताच्या हद्दीत आणण्यात आले की तेथून कुरिअर करून ते मणिपूरची राजधानी इम्फाळपर्यंत पोहोचवता येते किंवा पोहोचवले जाते. यानंतर दुसरे कुरिअर इम्फाळपासून गुवाहाटीपर्यंत पोहोचवले जाते. तिसरे कुरिअर गुवाहाटीपासून कोलकात्यापर्यंत पाठवले जाते. चौथे कुरिअर दिल्ली किंवा इतर महानगरांमध्ये पाठवले जाते. अशा प्रकारे ही साखळी सहज आणि राजरोसपणे कार्य करत राहते. धक्कादायक बाब म्हणजे, या साखळीतील एखाद्या व्यक्तीला पकडूनही फारसे काही हाताशी लागण्याच्या शक्यता कमी असतात. कारण पहिले कुरिअर पाठवणा-याला माहीतच नसते की त्या पाकिटात नेमके काय आहे. तो फक्त त्याला दिलेल्या आदेशानुसार पैसे घेऊन ते पाकिट दुस-याला देतो. तशाच प्रकारे दुसरा तिस-याला देतो. अर्थातच यासाठी बराच वेळ लागतो.

तसेच खर्चही बराच होतो. पण ही झाली आजवरची पारंपरिक पद्धती. आता गेल्या काही वर्षांत ई-कॉमर्समुळे घरबसल्या सामान मागवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रात दिग्गज कंपन्या उतरल्या असून त्यांच्या अ‍ॅपवरून साहित्याची ऑर्डर दिली की काही तासांत, दिवसांत घरबसल्या ते साहित्य उपलब्ध होते. याचा फायदा समाजविघातक शक्ती घेत आहेत. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपनीच्या माध्यमातून एखादी व्यक्ती कोणतेही साहित्य थेट त्याला हव्या त्या व्यक्तीच्या घरी पाठवू शकते. यामध्ये साहजिकच खर्च कमी होतो. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसे वापरण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने धोका कमी होतो. त्यामुळे देशविरोधी तत्त्वांनी ही नवी प्रणाली वापरण्यास सुरुवात केल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यात ब-याच अंशी तथ्य असण्याची शक्यता आहे.

दुर्दैवाने ई-कॉमर्स कंपनीवर जे कायदेशीर नियम आहेत ते अजून अस्पष्ट आहेत. बदलत्या काळात आपल्याला यामध्ये स्पष्टता आणावी लागेल. त्यानुसार ई-कॉमर्स कंपन्या कोणते साहित्य घेऊन जाऊ शकतात आणि काय घेऊन जाऊ शकत नाहीत याबाबत नियमावली ठरवून दिली गेली पाहिजे.

-४ ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या