महाराष्ट्र उन्हाने करपलेला आहे. मृग नक्षत्र संपले…. पुढच्या दोन्ही नक्षत्रांनी धोका दिला. तिकडे चेरापुंजीत चार हजार मि.मि. पाऊस कोसळून गेला. इकडे महाराष्ट्रात कडक उन्हात शेती करपून निघाली. केलेल्या पेरण्या फुकट गेल्या. पुन्हा पेरणीची पाळी आली. एकरी दोन हजार रुपयांचा खर्च… वरती मजूरी, एवढे करून पाऊस येईल की, नाही याची खात्री नाही…. सामान्यपणे खरीप हंगाम जवळ आला की, राज्याचा कृषीमंत्री विभागवार दौरे करून बी-बियाणे वाटपांची व्यवस्था कशी आहे, पुरवठा करणा-यांकडे पुरेसे बियाणे पोहोचले की नाही, जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांची त्यासाठी नेमणूक झाली की नाही, बियाणे वाटपांची जबाबदारी कोणत्या कृषी अधिका-यावर आहे… अशा अनेक व्यवस्था विभागवार बैठका घेवून कराव्या लागतात… सध्या महाराष्ट्राचा कृषीमंत्री कोण? ते नाव कोणालाही माहिती नाही… जे दादा भुसे नावाचे कृषीमंत्री आहेत, ते आसाममध्ये जावून चेरापुंजीचा पाऊस बघत बसलेले आहेत.
अशा अवस्थेत सारा महाराष्ट्र होरपळून चालला असताना तिकडे मेघालयातील चेरापुंजीत देशाच्या संपूर्ण मोसमातील अर्धा पाऊस कोसळून गेला. इकडे महाराष्ट्रात सरकार कोसळल्यात जमा आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत कधीही झाले नाही, असे राजकीय धिंगाणे सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोप, आमदारांची पळापळ, सरकार जागेवर नसणे, सारे काही महाराष्ट्राला पार बदनाम करून टाकणारे घडले आहे. पुढे काय होईल, कोणाला सांगता येत नाही. सत्तेच्या साठमारीत सत्तेवर कोण येईल? याचे भविष्य वर्तवता येत नाही. कोणीही आला तरी आता महाराष्ट्राची विस्कटलेली घडी आणि उद्ध्वस्त झालेला शेतकरी, याला सावरण्याची कुवत असलेला नेता आता महाराष्ट्रात शिल्लक नाही. सगळे सत्तेभोवती आणि त्यातून मिळवायच्या पैशांभोवती रिंगण घालणारे आहेत. आषाढी एकादशी जवळ आल्यामुळे आळंदी- देहूतून ज्ञाानोबा- तुकोबांच्या पालख्या पंढरपूरकडे निघाल्या. या कठीण परिस्थितीतही करपवणारे ऊन अंगावर झेलून लाखो लोक या वारीत होते. महाराष्ट्राच्या एकाही वृत्तवाहिनीला भक्तीच्या रिंगणाची, या परंपरेची थेट दखल घ्यावीशी वाटली नाही. वाहिन्यांचे कॅमेरे सूरत, गुवाहटीला पोहोचले. ए.बी.पी. माझा तर जाहिरातच करत राहीले की, आमचा माणूस सुरत येथे पोहोचलाय….. पण आळंदी, देहू ,पंढरपूरला पोहोचावे, असे कोणालाच वाटले नाही. महाराष्ट्र भलतीकडेच निघाल्याची ही लक्षणे आहेत. आता या महाराष्ट्राला कोणी सावरू शकेल, अशी स्थिती नाही. राजकीय पक्ष विकलांग झाले आहेत.
केंद्रात बसलेला भाजपा पक्ष मिळेल त्या मार्गाने एक-एक राज्य पाडण्याच्या मागे आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे सरकार कोसळेपर्यंत वेळ आली. वृत्तपत्रांत निवेदने दिली जात होती… ‘महाआघाडीचे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल….’ पण, ही निवेदने करणा-यांच्या डोळ्यासमोर राज्याच्या ग्रामीण गृहमंत्र्यासोबत ३५ आमदार पळाल्याचे समजलेसुद्धा नाही… या मंत्र्यांनी आपली सुरक्षा व्यवस्था परत पाठवून दिली. तेही मुख्यमंत्र्यांना कळले नाही. सगळे विधानसभेत बसलेले आहेत. विधान परिषदेचे मतदान आटोपले आहे… आणि ३५ आमदार ठाण्याच्या महापौरांच्या बंगल्यावर जेवण करून सुरतेकडे निघाले…. राज्य चालवताना जो चाणक्षपणा लागतो, सावधपणा लागतो, त्याचा पूर्ण अभाव आणि हे का घडले, हे समजून न घेण्याची भूमिका, यातून महाराष्ट्रात अराजक निर्माण झाले. सत्तेवर असलेले आणि सत्तेतून पळालेले दोघेही या भयानक परिस्थितीला, आणि महाराष्ट्रातील जनतेला वा-यावर सोडण्याला जबाबदार आहेत. याही स्थितीत महाराष्ट्रातील जनता हे सगळे राजकीय भयानक नाट्य विनोदाने घेत होते. त्यामुळेच हे चार दिवस थोडे सुस झाले. ‘पंतप्रधान मोदी तुकोबांच्या भेटीला देहूला आले आणि एकनाथाला घेवून पळाले…’ ‘या आषाढीला आता माझी पूजा कोणता मुख्यमंत्री करणार? असा प्रश्न पंढरपूरचा विठुराया विचारतोय….’ अशा हलक्या-फुलक्या विनोदांनी दिवस ढकलले जात होते.
पण हे तात्पुरते विनोद आहेत. त्या विनोदाने क्षणभर हसू आल्यावर महाराष्ट्राची गंभीर राजकीय परिस्थिती बदलत नाही, असे विनोद पावला-पावलावर होतात. माझ्या एका मित्राने गाडी घेतली… शोरूममध्ये ती गाडी बघायला गेलो, ‘होंडा अमेझ…’ गाडी घेणा-याने विचारले ‘डिकी मोठी आहे का?’ शोरूमच्या माणसाने डिकी उघडून दाखवली. ‘खूप मोठी डिकी आहे’. तो किती विनोदी होता… डिकी उघडताना तो म्हणाला… ‘दोन आमदार सहज बसून, गुवाहटीपर्यंत जावू शकतील….’ जे गुवाहटीला गेले त्यांचे भले होओ… पण आजच सांगून ठेवतो… यातील ५० टक्के आमदार आपल्यावरील ई.डी.ची बला टळो, या हिशोबाने गेले आहेत. कोणी आमदार जाधव मॅडम आहेत… यांनी तर ते जाहीरच करून टाकले… केंद्रातील भाजपाच्या सरकारचे हेच धोरण आहे… जी राज्ये आपली नाहीत, तिथं सर्व केंद्रीय यंत्रणा वापरून त्या सरकारांची तोडफोड करायची. कर्नाटकात तेच झाले… मध्यप्रदेशमध्ये पुन्हा शिवराजमामा मुख्यमंत्रिपदी त्याच पद्धतीने आले. तिथेही आमदार फोडले. तोच प्रयोग महाराष्ट्रात झाला.
नुसात झाला नाही तर या भयानक राजकीय नाट्याची अतिशय पद्धतशीर आखणी करून झाला. कोण चूक, कोण बरोबर? याची चर्चा होत राहील…. पण खंत एवढीच वाटते की, महाराष्ट्राचे आघाडीचे सरकार एवढे झोपून कसे राहिले… त्यामुळे गाफील रहाणा-या सरकारने बेफीकीरीमध्येच हे सरकार कोसळेपर्यंत वेळ आणली. राज्याचा गृह राज्यमंत्री (शंभुराजे देसाई) सुद्धा सुरतपर्यंत पोहोचतो… त्याचा पत्ता लागत नाही. एखाद्या जादूगाराने २४ तास संपूर्ण विधानभवनातील नेत्यांना गुंगीचे औषध द्यावे, तशी स्थिती आहे. उद्धवसाहेब म्हणाले, ‘माझ्याच लोकांनी मला फसवले….’ अर्थात जे गेले त्यांची हालत खराब होईल, हे तर नक्कीच आहे… एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितले की, ‘आमच्या मागे महाशक्ती आहे…’ ही महाशक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही… अमेरिका, रशिया नाही… तर मोदी, शहा यांचीच ही महाशक्ती आहे. त्यांच्या संमतीनेच हे सगळं घडले… भाजपा आता यांना वापरून घेणार आणि एकनाथ शिंदे सोडले तर बाकीच्यांना वापरले की, चोथा करून फेकून देणार… हे असेच घडणार…. महाराष्ट्रात फडणवीसांनी हा प्रयोग यापूर्वीही केला… त्यावेळच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांनाच त्यांनी पळवले… माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना पळवले..
तिकडे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष मधुकर पिचड यांना पळवले… बबन पाचपुते यांना पळवले… मराठवाड्यात सूर्यकांता पाटील आणि माजी मंत्री भास्करराव खतगावकर यांना पळवले. आज हे सगळेजण पस्तावलेले आहेत. भास्करराव पाटील तर काँग्रेसमध्ये परत आले. शिंदे यांच्यासोबत जे ३५-४० आमदार असल्याचे सांगितले जाते, त्यांचीही हालत अशीच होईल. या सगळ्यांना सत्ता द्यायची म्हटली तर जे भाजपासाठी वर्षांनुवर्षे काम करत आहेत त्यांना बाजुला फेकून द्यावे लागेल…. आजही त्यांच्यामधील असंतोष नेत्यांनी समजून घेतला नाही तर उद्या भाजपामध्येही एखादा ‘एकनाथ शिंदे’ निघेल. आता शिंदेंच्या माणसांना ठाण्यात मंत्री करायचे तर…. संजय केळकर यांना फेकून द्यावे लागेल. निष्ठावंत माधव भंडारी आयुष्यभर सतरंज्या उचलत आहेत… असे भाजपामध्येही हळूहळू असंतोषाचे स्फोट होवू लागतील. एकनाथ शिंदे यांना अगदी स्पष्टपणे सांगायला हवे की, आज तुम्हाला हे बंड जरी गोड वाटत असले तरी…. जेव्हा सत्तावाटप होईल तेव्हा तुमचेच अर्धे लोक तुमच्या विरोधात उभे राहतील… यापूर्वी असे घडलेले आहे. सर्वांना सत्तेत सामावून घेता येणे शक्य नाही.
तुमच्या भोवती जमलेले कोणीही ‘त्यागी’ आणि ‘सेवाभावी’ आहे, असे अजिबात समजू नका… सत्तेसाठीच ते तुमच्या भोवती आहेत. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा दिला तोही फार मोठ्या तात्विक भूमिकेने दिला, असे अजिबात नाही. त्यात राजकीय तडजोड होतीच…. ‘भाजपा नको’, ही भूमिका होतीच… आणि ती योग्यच होती. पण सत्ता मिळणार याचा लोभ जास्त होता आणि ती मिळाल्यानंतर अडीच वर्षे आघाडीच्या सगळ्याच पक्षांच्या डोक्यात सत्ता गेली. सेनेच्या डोक्यात जास्त गेली. आमदार शिरसाट यांचे पत्र शांतपणे वाचा… असंतोष का निर्माण झाला, याची कारणं त्यात आहेत आणि ती नेमकी आहेत. संजय राऊत यांच्याबद्दल सेनेच्या आमदारांचीच काय भावना होती, हे त्या पत्रात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. उद्या उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरल्यानंतर शिवसेनेचे लढाऊ सैनिक त्यांच्या सोबत राहतील. आजचा संघर्ष थोडासा अडचणीचा वाटला तरी शिंदे यांच्या सेनेला महाराष्ट्रात पाठींबा मिळणार नाही…. ठाण्यातसुद्धा मामुली पाठिंबा मिळेल. आज जो पाठिंबा आहे तो तात्पुरता आहे. शिवसेनेचे नेते म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा रस्त्यावर उतरले तर त्यांच्याच बाजूने शिवसेनेचे कडवे लोक उभे राहतील. पण त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल.
-मधुकर भावे