23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeविशेषउध्दवराव, ६१व्या वाढदिवसाचे अभिनंदन....

उध्दवराव, ६१व्या वाढदिवसाचे अभिनंदन….

एकमत ऑनलाईन

उध्दवराव, तुम्ही आज ६१ वर्षांचे झालात. तुमचा आज वाढदिवस. तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. ‘एक दिवस शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल’ हे बाळासाहेबांचं स्वप्न तुम्ही मुख्यमंत्री होण्याने सत्यात आलं, म्हणूनही अभिनंदन. मानवी जीवनात ५० वाढदिवस, ६१ वा, ७५ वा आणि सहस्त्रपौर्णिमा पाहणारा ८१ वा वाढदिवस महत्वाचे समजले जातात. ६१ वा वाढदिवस हा चिंतन दिवसही आहे. तुम्ही अधिकारावर आलेत, भाजपाच महाराष्ट्रावरच पाच वर्षे राहीलेलं संकट टळल. याचा पुरोगामी महाराष्ट्राला मनापासून आनंद झाला होता. शिवाय तुमच्या एका वाक्याने माझी पिढी सुखावली होती. ते वाक्य होत… ‘ज्यांच्याबरोबर २५ वर्षे राहीलो त्यांनी विश्वास दाखवला नाही, ज्याच्यावर २५ वर्षे टीका करत राहिलो, त्यांनी विश्वास दाखवला…’ २५ वर्षांनतर का होईना, भाजपाच ‘चरित्र’ तुम्हाला समजलं याचा आनंद वाटला.

३० एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत यशवंतरावांनी नेहरुंना साक्ष ठेवून केली. त्याच शिवतीर्थावर तुमचा शपथविधी झाला. त्या शपथविधीने महाराष्ट्र सुखावला होता. तुमच्या राजवटीची सुरूवात झाली. तोच सगळ्या जगालाच कोरोना संकटाने घेरलं. त्यात महाराष्ट्र पिचून निघाला. त्यातून आपण अजूनही बाहेर पडलो नाही. याच दोन वर्षात महाराष्ट्राला ‘निसर्गा’ची दृष्ट लागली. गेल्यावर्षी कोकणात ‘निसर्ग’ वादळ आलं. त्यात अलिबागपासून सिंधुदूर्गापर्यंत शेतकरी आडवा झाला, तो अजून उभा रहायचाय, त्याच्या वाड्या अजून उभ्या राहायच्या आहेत. मदत पोचायची आहे. तेवढ्यातच निसर्गाने केवढी मोठी आफत आणलेली आहे. उत्तराखंडमध्ये दरडी कोसळतात, निष्पाप माणसं मरतात हे आपण ऐकत होतो, पहात होतो.

अस्मानी, सुलतानी पावसानं होत्याच नव्हत केलं, तुम्ही धावून गेलात हे चांगल झालं. ६० वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून तुम्हाला त्याची मदत होईल. संकटाच्यावेळी धावून गेलात हे चांगलच. धावून जाणही सोप नाही. पण नंतरची मदत मार्गी लागण त्याहून कठीण आहे. पूर्वीचे अनुभव चांगले नाहीत. निव्वळ आर्थिक मदत पोहोचविणं एवढ्याने या संकटात भागत नाही. संपूर्ण नवीन आयुष्य उभं करायचं असतं… तुम्ही तळीयेला गेलात… चिपळूणला गेलात आणि मी ६० वर्षे मागे गेलो….

दिग्गज खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

११ जुलै १९६१ची ती काळरात्र. बरोबर ६० वर्षे झाली या ११ जुलैला. पुण्याजवळच पानशेतच मातीच धरण फुुटलं. अर्ध पुणं वाहून गेलं. मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. १२ जुलै १९६१ ला मांडीपर्यंतच्या चिखलात हातात बांबू घेवून लकडी पुलावरती ते उभे होते. दोन दिवसांनी पंडितजी आले, तीन दिवसांनी लष्कराची मदत आली, ढिगारे उपसले गेले. त्यावेळचे पुण्याचे आयुक्त स.ग.बर्वे यांनी ज्या तडफेने सगळी यंत्रणा कामाला लावली… काही काळ लागला. पण आपलं पुनर्वसन निश्चित होणार याचा विश्वास संकटात सापडलेल्या पुण्याला झाला होता. तो यशवंतरावांनी निर्माण केला होता. तब्बल ३ वर्षे लागली हे खरं आहे. पण संकट प्रचंड होत. अर्ध पुणं नव्याने उभं करायचं होतं. यशवंतरावांनी मंत्रालयातले ६ आय.एस.एस. सचिव पुण्यात बसवले. त्यात नगरविकास, आरोग्य, नागरीपुरवठा, पाणी पुरवठा आणि बांधकाम या अधिका-यांना विषय वाटून दिले. त्यांच्या हाताखाली १०० अधिकारी दिले. यशवंतराव राजवाडे यांना समन्वयक नेमलं. १२ दिवस पुण्यात राहून यशवंतराव परत आले. दिल्लीला जाईपर्यंत तब्बल वर्र्षभर पुण्याच्या पुनर्वसनासाठी यशवंतरावांंच्या पुण्यात जुन्या कौन्सिल हॉलमध्ये २२ आढावा बैठका झाल्या.

पुणं हळू हळू सावरलं.
११ डिसेंबर १९६६ रोजी भल्यापहाटे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रचंड भूकंप झाला. १० डिसेंबरला शेतकरी कामगार पक्षाच सांगलीतील राजव्यापी अधिवेशन रात्री संपलं. भूकंपाची बातमी पहाटे समजल्यावर मी, महाराष्ट्र टाईम्सचे वि. ना.देवधर, तरुण भारतचे वसंत उपाध्ये हे वसंतदादांकडून गाडी मागवून पाटणला पोहोचलो. तर ठिक-या होवून आस्मानात उडालेल्या ३०-४० हजार घरांच्या ढिगा-यावर महसूलमंत्री बाळासाहेब देसाई उभे होते. त्यावेळचे चीफ सेक्रेटरी पे मास्टर हजर झाले होते. संध्याकाळी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले. सारी यंत्रणा कामाला लागली. मुखयमंत्री परत गेले. महसूलमंत्री बाळासाहेब देसाई तब्बल ६ महिने पाटणमध्ये राहीले. कॅबिनेटच्या बैठकीलासुध्दा ते येत नव्हते. वसंतराव नाईक यांनी कलेक्टरमार्फत निरोप दिला. कॅबिनेटला तातडीने या.. (तेव्हा मोबाईल नव्हते, कोणताही ट्रंक-कॉल लागायचा नाही. अगदी गर्व्हनमेंट इमिजिट कॉलसुध्दा) बाळासाहेबांनी उत्तर पाठवले. ‘कॅबिनेट पाटणला घ्या’.
भूकंपाने उद्ध्वस्त झालेली सगळी घरे उभी राहील्यावर बाळासाहेब मुंबईत आले. मार्च १९६७मध्ये विधानसभेची निवडणूक आली होती. या निवडणुकीत बाळासाहेब बिनविरोध निवडुन आले होते.

१२ मार्च १९९३
पानशेत, कोयना भूकंप ही निर्सगनिर्मित संकटे होती. १२ मार्च १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडली. ती भारताविरोधातील अतिरेकी कारस्थान्यांनी घडवून आणली. मुंबई हादरली. मुख्यमंत्री शरद पवारच होते. अशक्य वाटणारे काम त्यावेळी घडले. २४ तासात मुंबई पुर्ववत सुरु झाली. उध्दवराव, हा सगळा तपशील एखाद्या चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोर जातो आहे. त्या दिवसात या प्रत्येक ठिकाणी फिरलो आहे. आज ८२ व्या वर्षी ती हिंमत होत नाही. आपण फिरता आहात. पण रागवू नका. सगळा विषय यंत्रणेवर सोपवू नका. संकटाच्या गावात आढावा बैठका घ्या. त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विषय मार्गी लागेपर्यंत त्याच जिल्ह्यात थांबायला सांगा. मुंबईतून हे काम होणार नाही.

तुमच्या वाढदिवशी हे आज लिहावं लागत आहे. तुम्ही वाढदिवस साजरा करणार नाही. तुमची भावना समजू शकतो. दोन वर्ष तुम्ही कोरोना संकटाचा सामना न थकता करता आहात. आता ही संकटग्रस्त भागात दौरे चालूच आहेत. पण ज्या घोषणा होतील, जी मदत जाहीर होईल, ती पोहोचते की नाही हे बघण्याची यंत्रणा तुमची स्वत:ची ठेवा. लोक कमालीचे संकटात आहेत. तुमच्या भोवतीच्या माणसांना अशावेळी कसं बोलायचं, त्यांच्या दु:खी भावनेशी कसं समरस व्हायचं याचही थोडे ट्रेनिंग द्या. वाढदिवसाला पुन्हा एकदा शुभेच्छा.
महाराष्ट्रावरची सगळी संकट टळोत ही प्रार्थना.

३० सप्टेंबर १९९३
१० दिवसांच्या गणपतीला निरोप देवून लातूर तालुक्यातील किल्लारी गाव शांतपणे झोपलं होतं. होत्याच नव्हतं झालं. प्रचंड भूकंप झाला, पहाटे ३ वाजता. सकाळी ८ वाजता त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार निष्णात अधिका-यांची फौज घेवून किल्लारीला पोहोचले होते. त्यात बापू करंदीकर होते, यशवंत भावे होते, रघुनाथन होते, शरद पवार मुक्काम ठोकून होते. लातूरचे पालकमंत्री विलासराव देशमुख होते. तुळजापूरचे आमदार मधुकर चव्हाण मुक्काम ठोकून होते. अनपेक्षित संकटाच्या विरोधात सगळे सरकार एकवटले. आज २८ वर्षांनतर त्या जखमा बुजाल्या आहेत, नवीन किल्लारी उभे राहीले.

२६ जुलै २००५
गेल्या चार दिवसासारखेच अस्मानी, सुलतानी संकट महाराष्ट्रावर कोसळले. आजच्यासारखाच १०० मि.मी. पाऊस कोसळला. पूर्ण मुंबई पाण्याखाली गेली. अनेक लोक बुडालेल्या गाडीत मेले. मुंबई महापालिकेचा एक इंजिनिअर मॅनहोलमध्ये पडून पार जुहूला मृतावस्थेत पोहोचला. १७ जिल्हे पाण्याखाली होते. आजच्यासारखेच बदलापूर बुडाले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्यांच्यासोबत रात्रभर फिरत होतो. ज्यांचा निवारा गेला होता त्यांना प्रथम मंदिरे, शाळा, लग्नाचे हॉल अशा ठिकाणी तातडीने आसरा दिला गेला. यंत्रणेने एवढे छान काम केले. प्रत्येक घरात १० किलो तांदुळ, १० किलो कणिक, १० लिटर रॉकेल व्यवस्थित वाटप झाले. कठीण प्रसंगात शासकीय यंत्रणा संवेदनशील होवून कसं काम करते. हे प्रत्यक्ष पाहिले. शिवाय प्रत्येक घरात १ हजार रुपये रोख दिले गेले. तुमच्या मातोश्रीसमोरचा प्रबोधकार ठाकरे उड्डाणपूल पूर्ण पाण्यााखाली होता. यंत्रणेने चांगल काम करुन, विलासरावांनी दोन रात्री जागून त्या संकटातून मुंबई महाराष्ट्राला बाहेर काढले.

-मधुकर भावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या