18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeविशेषउसाच्या रसाचे फायदे -१

उसाच्या रसाचे फायदे -१

एकमत ऑनलाईन

उसाचा रस हे सर्वांना आवडणारे, स्वस्थ, सहज उपलब्ध असणारे व फायदेशिर असे पेय आहे. उसाचा रस हे एक प्रकारचे नैसर्गीक पेय असून त्यापासून आपल्याला मुबलक प्रमाणात ऊर्जा सुध्दा मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात रणरणत्या आणि कडक उन्हात आपल्या शरीराला थंडावा निर्माण करणारा उसाचा रस तृप्ती देणारा ठरतो व थकवा सुध्दा दूर करण्यास मदत करतो. सामान्यत: उन्हाळ्यात आपण शितपेये पिण्याचा सपाटा लावतो पण त्यापासून आपल्याला कोणतेही आरोग्यदायक फायदे मिळत नाहीत या उलट शितपेयामध्ये असणा-या रासायनिक घटकांमुळे ही पेये आपल्या शरीराला हानिकारक ठरतात. पण उसाच्या रसाच्या सेवनाने अनेक आरोग्यकारक फायदे होतात. उसाचा रस पिल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते कारण त्यात तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीरातील चरबीचा साठा होण्यावर नियंत्रण राहते. उसाचा रस पोटासाठी सुध्दा खुप चांगला मानला जातो.

उसाच्या ताज्या रसाची पौष्टिक घनता अत्यंत प्रभावशाली आहे. या उसाच्या रसात पोटॅशियम, कॉल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मॅग्नीज, जस्त, फॉस्फरस, प्रथिने विविध अमिनोअ‍ॅसीडस्, थायमिन आणि रिबोफ्लेविन सारखे अनेक महत्वाचे पौष्टिक घटक असतात. उसाचा रस खनिजांनी समृध्द आहे. ही खनिजे जीवाणूविरोधी काम करतात व त्यामुळे श्वासा संबंधीची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. इतकेच नाही तर उसाचा लहान तुकडा चघळल्याने तोंडामध्ये भरपूर प्रमाणात लाळ तयार होते. या लाळेमध्ये उसाच्या रसात असलेले कॅल्शियम मिळते. त्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात. त्याचबरोबर उसाच्या रसात नैसर्गीकरित्या अ‍ॅन्टीऑक्सिडंटस् उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे संक्रमण होत नाही. आपली रोगप्रतिकारकता कमकवत असल्यास लवकर संसर्ग होतो व आपण आजारी पडतो. ही समस्या टाळण्यासाठी नियमितपणे उसाचा ताजा रस दररोज सेवन करावा. त्यामुळे उसाचा ताजा एक ग्लास रस आपल्या चांगल्या आरोग्यासाठी वरदान आहे. उसाच्या रसामध्ये साखरेचा नैसर्गीक पुरवठा असतो. जो उर्जेचा एक डोस समजला जातो.

या रसामध्ये ग्लुकोजची मात्रा जास्त असते. त्याच बरोबर इलेक्ट्रोलईटस सुध्दा भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे उसाच्या रसाच्या सेवनाने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. त्यामुळे थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस एक उत्कृष्ट नैसर्गीक पर्यायी पेय आहे. रसामधील ग्लुकोज आपली गमावलेली उर्जा पुन्हा लवकरात लवकर भरून निघण्यास अत्यंत प्रभावी आहे. त्यासाठी थकवा, सुस्ती व अस्वस्थता लवकर कमी करण्यासाठी उसाच्या रसाचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसात अती तिव्र उन्हामुळे आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे निर्जली करणाची भिती कायम आपल्या मनात असते. उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नीजसारखी खनिजे भरपूर असतात. त्यामुळे एक ग्लास ताज्या उसाच्या रसाचे सेवन नियमित केल्यास इलक्ट्रोलईटस् आणि पाण्याची कमतरता भासत नाही. ही एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. सध्याच्या व्यस्त कामामुळे व संगणकाच्या अती वापरामुळे ताण-तणाव वाढला आहे.

या ताणाचे परिणाम माणसाच्या शरीरावर आणि मनावर सुध्दा वेगाने होताना दिसत आहेत व त्यामुळे मानसिक आजार सुध्दा वाढत आहेत. उसाच्या रसात मॅग्नेशियम, अमीनो अ‍ॅसिड असतात जे हार्मोनल पातळी संतुलीत करण्यास आणि तणाव कमी करण्यास फायदेशिर असतात. त्यामुळे रसाचे नियमित सेवन तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत व ठिसूळ बनतात उसाच्या रसाच्या सेवनाने आपल्या शरीरातील कॅल्शियम, पोटॅशियम, लोह व मॅग्नीज पातळी वाढण्यास मदत होते. ज्यामुळे हाडांची मजबूती वाढण्यास मदत होते व हाडे ठिसूळ होत नाहीत. यासाठी उसाच्या रसाचा एक ग्लास दररोज पिल्यास हाडे मजबूत राहण्यास फायदा होतो. ब-याच वेळा पडल्यामुळे, कापल्यामुळे किंवा कठिण पदार्थाच्या मारामुळे निरनिराळ्या प्रकारच्या जखमा होतात. उसाचा रस हा सुक्रोजने समृध्द असलेला आहे जो एक नैसर्गीक उपचार करणारा पदार्थ आहे.

ज्यामुळे जखमामध्ये मृत झालेल्या पेशीचे पुर्ननिर्माण लवकर होण्यास न होते. त्यासाठी दररोज एक ग्लास उसाचा रस पिल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते. कावीळ या आजारामध्ये रक्तातील बिलिरूबीनचे प्रमाण वाढते ज्यामुळे डोळ्यात पिवळेपणा जाणवतो तसेच भूक मंदावणे, अंग मोडून येणे व उलट्या होणे अशी लक्षणे दिसतात. कावीळी वर उसाच्या रसा सारखा किंवा उसासारखा दुसरा इलाज नाही. कावीळ झालेल्या रुग्णांनी दरर उस खावा किंवा उसाचा रस प्यावा. हा रस आले, लिंबु आणि बर्फ न घालता पिल्यास कावीळ पन्नास टक्के वेगाने कमी होते त्याचबरोबर यकृताचे कार्य सुधारून त्यांच्याशी संबंधीत सर्व आजार दूर होतात. त्यामुळे कावीळीवर उसाचा रस अत्यंत गुणकारी आहे. मधुमेह या आजारामध्ये आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. उसाच्या रसामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत राहण्यास फायदेशिर होते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रूग्णांनी योग्य प्रमाणात उसाच्या रसाचे सेवन सुरक्षित असते. टाईप-२ मधुमेह नसलेल्या लोकांसाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत होते. मात्र या रसाचे जास्त प्रमाणात सेवन होणार नाही याची काळजी घ्यावी. कर्करोग प्रामुख्याने हा आजार आपल्या शरीरातील पेशीच्या अनियंत्रीत वाढीमुळे होतो.

ज्यावर उसाचा रस अत्यंत गुणकारी आहे. उसाच्या रसात अ‍ॅन्टीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते. ज्याचा कर्करोगावर शक्तीशाली प्रभाव पडतो. प्रामुख्याने यात असलेल्या फ्लेवीन द्रव्यामुळे कॅन्सरच्या कोशिकांचा प्रसार आणि उत्पादन थांबविण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे उसाच्या रसाचे नियमित केल्यास कर्करोगासारखा गंभीर आजार होण्याचे शक्यता कमी होते. तसेच स्तनांचा आणि पुरस्थ ग्रंथीचा कॅन्सरवर लाभदायक आहे. वास्तविक कोलेस्टेरॉल हा शरीराला आवश्यक असणारा नैसर्गीक घटक आहे. यामध्ये हलका कोलेस्टेरॉल (एलडीएल) मुळे धोका निर्माण होतो. मात्र जड कोलेस्टेरॉल (एचडीएल) हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. त्यासाठी उसाचा ताजा रस नियमित पिल्याने एलडीएलची पातळी कमी होण्यास मदत व ज्यामुळे हृदयाचे संरक्षण होते. या आजारामध्ये मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात स्फटीकजन्य पदार्थ तयार होतात व त्यामुळे अतीव वेदना होतात. प्रामुख्याने हे खडे युरीक अ‍ॅसीडचे असतात.

काही अभ्यासकांच्या मतानुसार उसाच्या रसाचा वापर हे खडे तयार होण्याचा धोका कमी करतात. त्यासाठी नियमितपणे १०० मिली उसाचा रस पिल्यास फायदा होतो. ब-याच महिलांना मासिक पाळीमध्ये रक्तस्त्राव कमी-जास्त होते. ओटीपोटात वेदना होणे किंवा अशक्तपणा येणे अशा समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. तसेच अनेकदा मासिक पाळी अनियमित असते. त्यासाठी उसाचा ताजा रस एक ग्लास नियमितपणे दररोज दोन वेळा सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास वरील सर्व समस्या दूर होतात. मुत्रपिंडाचे कार्य शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी किडनीची कार्यक्षमता चांगली असणे आवश्यक असते. उसाच्या रसामध्ये भरपूर प्रथिने असतात. जे मुत्रपिंडाला उत्तमरित्या काम करण्यास मदत करतात. त्यामुळे याची क्रियाशिलता वाढते. तसेच उसाच्या रसाचा एक ग्लास सेवन सेवनाने लघवीमध्ये होणारी जळ-जळ सुध्दा कमी करण्यास लाभदायक होते. टिप:- वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या