26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeविशेषएका दगडात...

एका दगडात…

एकमत ऑनलाईन

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून यंदाच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुर्मू या आदिवासी संथाल समाजातील आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब खूप गरीब होते. सुरुवातीच्या काळात लहानसहान नोकरी करून कुटुंबाचा गाडा चालविणे हाच त्यांचा उद्देश होता. लिपिकपदाची नोकरी देखील लागली, परंतु सासूरवाडीच्या म्हणण्यानुसार त्यांना ती नोकरी सोडावी लागली. त्यांचे कामात लक्ष लागत नसल्याने मुलांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. इथूनच त्यांची समाजसेवा सुरू झाली. १९९७ रोजी त्यांनी पहिल्यांदा रायरंगपूर पंचायतीच्या कॉन्सिलरपदाची निवडणूक लढली आणि त्या जिंकल्या. २००० रोजी त्यांना आमदारकीचे तिकिट मिळाले आणि निवडून आल्या. त्यानंतर त्या मंत्री झाल्या. २००९ मध्ये पराभूत झाल्यानंतर गावाकडे आल्या. परंतु २०१० मध्ये रस्ते अपघातात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्या निराशेच्या गर्तेत अडकल्या. या धक्क्यातून सावरत असतानाच २०१३ मध्ये भुवनेश्वर येथे दुस-या मुलाचा देखील दुर्घटनेत मृत्यू झाला. नंतर २०१४ रोजी पतीला देखील गमावले. एकानंतर एक आलेल्या संकटाने खचलेल्या मुर्मू यांनी समाजसेवेला वाहून घेतले. आता मुर्मू यांच्या कुटुंबात जावई आणि मुलगी आहे. सामान्य कुटुंबातील मुर्मू यांची वाटचाल आता राष्ट्रपती भवनाकडे होणे निश्चित झाले आहे.

‘एनडीए’कडे सुमारे ४८ टक्के मते आहेत. केवळ एक किंवा दोन प्रादेशिक पक्षांच्या मदतीने बहुमताचा आकडा सहजपणे पार होईल. राष्ट्रपतिपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे. द्रोपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया पाहता भाजपने मारलेला बाण हा अनेकांना घायाळ करणारा ठरला आहे, असाच तो सूर होता. विरोधकांकडून देखील मवाळ भूमिका पहावयास मिळत आहे. विरोधकांना द्रौपदी मुर्मू यांना विरोध करणे सोपे नाही. तूर्त राजकारणातील संकेत पाहता एनडीएने त्यात आघाडी घेतलेली दिसून येते. सध्या संख्याबळ पाहता एनडीएची स्थिती मजबूत आहे. तरीही आपल्या हक्कांच्या मतांबरोबरच अन्य प्रादेशिक पक्षांची मदत घेणे गरजेचे आहे. राष्ट्रपती निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर हे सध्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या कामाला लागले आहेत. त्याचवेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना आपल्याकडे ओढण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.

दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचा पक्ष जेडीयूची भूमिका पाहता भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळे विरोधकांना तोडता येणार नाही, अशी रणनीती भाजपला आखावी लागणार असून ते मोठे आव्हान असेल. द्रौपदी मुर्मू यांचे नाव समोर आणून भाजप आघाडीने अडथळ्याचा पहिला टप्पा सहजपणे ओलांडला आणि आपल्या गरजेनुसार समीकरण तयार केले आहे. मुर्मू यांचे नाव जाहीर होताच पहिली शुभेच्छा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिली. त्यांनी ट्विट करत त्यांच्या नावाप्रति आनंद व्यक्त केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात आपल्याशी चर्चाही केली होती, असे स्पष्टीकरण दिले. त्या ओडिशाच्या असून अशावेळी नवीन पटनायक यांचा पाठिंबा मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु ही गोष्ट केवळ नवीन पटनायकपुरतीच मर्यादित नाही. द्विधा मन:स्थिती तर झारखंडचे मुख्यमंत्री आणि जेएमएमचे नेते हेमंत सोरेन यांच्यासमोरही असणार आहे.

त्यांच्यासमोर पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवार म्हणून येत असतील तर त्यांना सोडून अन्य उमेदवाराला मत देणे सोपे राहणार नाही. सोरेन हे आदिवासी समुदायाच्या राजकारणात आघाडी घेण्याची तयारी करत असताना यशवंत सिन्हा यांना मत देणे जड जाणार आहे. हेमंत सोरेन हे राज्यात सातत्याने आदिवासींचे राजकारण करत आले आहेत. झारखंडमध्ये सुमारे २८ टक्के आदिवासी समुदाय आहे आणि त्याचे पाठबळ सोरेन यांना लाभले आहे. अर्थात विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा हे झारखंडचेच आहेत. त्यामुळे जेएमएम पक्षाच्या द्विधा मन:स्थितीत आणखीच भर पडली आहे. विशेष म्हणजे मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल असताना हेमंत सोरेन यांचे चांगले संबंध होते. याशिवाय महिला आदिवासी नेत्या असल्याने ममता बॅनर्जी किंवा सोनिया गांधी यासारख्या नेत्यांना देखील त्यांचा विरोध करणे सहजासहजी जमणार नाही. काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये देखील हीच स्थिती असणार आहे. या ठिकाणी आदिवासींची संख्या मोठी आहे.

या ठिकाणी अनेक काँग्रेस आमदार आदिवासी जमातीच्या पाठबळावर विधानसभेत गेले आहेत. अशावेळी त्यांची स्थिती गोंधळाची राहू शकते. दुसरीकडे भाजपचे सहकारी घटक पक्ष जेडीयूसमोर फारसे पर्याय नाहीत. त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी तात्काळ शुभेच्छा दिल्या. अर्थात आरसीपी सिंह अजूनही नितीशकुमार यांच्यावर नाराज आहेत. तरीही द्रौपदी मुर्मू यांचे नाव समोर आणून भाजपने चांगली रणनीती खेळली आहे. एनडीएने द्रौपदी मुर्मू यांचे नाव समोर आणून सामाजिक समीकरण आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. वर्षाच्या शेवटी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या ठिकाणी ट्रायबल लोकसंख्या सुमारे दीड डझन जागांवर निर्णायक भूमिका वठविणारी आहे. अर्थात भाजप या जागांवर आतापर्यंत फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तरीही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदिवासीबहुल ५० मतदारसंघांत भाजपने निम्म्यापेक्षा अधिक जागा जिंकल्या. एका अर्थाने पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आदिवासींसह अन्य जमातीत पक्षाचा विस्तार वाढविण्यावर भर दिला आहे.

केंद्र सरकारने याच उद्देशातून बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला देशात जमाती गौरव दिवस म्हणूज साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार सरकार १५ ते २२ नोव्हेंबरपर्यंत जमातीचा गौरवशाली इतिहास, कामगिरी आणि संस्कृती यावर प्रकाश टाकणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. वास्तविक गुजरातबाहेरचा संपूर्ण देशाचा विचार केल्यास नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दलित, वंचित घटक, मागासर्वीय यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी बरेच लक्ष दिले आहे. त्याचा पहिला सकारात्मक परिणाम हा २०१४ च्या निवडणुकीत दिसला. त्यात १३१ सुरक्षित ठिकाणांपैकी ६७ ठिकाणी विजय मिळविला. २०१९ मध्ये पक्षाने आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत ७७ सुरक्षित जागांवर कमळ फुलविले. पाच वर्षांअगोदर रामनाथ कोविंद यांच्या रूपातून दलित व्यक्तीस आणि आता आदिवासी महिलेला राष्ट्रपतिपदावर विराजमान करण्याचा निर्णय झाला आहे. समाजातील सर्व घटकांचा विचार आणि सन्मान केला जात असल्याचा संदेश भाजपने या माध्यमातून सर्वत्र पोचवला आहे. हाच विचार आगामी निवडणुकीत उपयुक्त ठरणार आहे.

-पोपट नाईकनवरे
राज्यशास्त्र अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या