24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविशेषऐतिहासिक ‘पंच’

ऐतिहासिक ‘पंच’

एकमत ऑनलाईन

निकहतने मिळवलेले सुवर्णपदक देशभरातील मुस्लिम मुलींसाठी नव्हे तर सर्वच मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल आणि तिचे सुवर्णपदक मुस्लिम समाजाला एक संदेश देणारेही ठरले आहे. निकहतने सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताच्या नावावर या चॅम्पियनशिप स्पर्धेत ३९ पदके झाली असून, त्यात दहा सुवर्ण, आठ रौप्य आणि २१ कांस्य पदकांचा समावेश आहे. या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या निकहत जरीनची कथाही संघर्षमय आहे.

तेलंगणच्या निजामाबाद येथील २५ वर्षीय भारतीय बॉक्सर निकहत जरीन हिने थायलंडच्या जिनपाँग जुटामेन्सचा ५२ किलो वजनी गटात ५-० असा पराभव करून जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि नवा इतिहास रचला. निकहत बॉक्सर बनण्याची कहाणी खूप रंजक आहे. वडील मोहंमद जमील हे स्वत: फुटबॉल आणि क्रिकेट खेळत असत. त्यांना त्यांच्या चार मुलींपैकी एकीने खेळाडू बनावे असे वाटत होते. त्यांची तिसरी मुलगी निकहतसाठी त्यांनी अ‍ॅथलेटिक्सची निवड केली. आणि अल्पावधीतच वडिलांचा निर्णय निकहतने योग्य ठरवला. काकांनीही तिला बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याची प्रेरणा दिली आणि ती वयाच्या १४ व्या वर्षी वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियन बनली. त्यानंतर तिने एकापाठोपाठ एक पाय-या चढत वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीयांना महिला बॉक्सर म्हटल्यावर सहा वेळा विश्वविजेती एम. सी. मेरी कोमच केवळ आठवते. याव्यतिरिक्त सरिता देवी, जेनी आर. एल. आणि लेखा केसी यांनीही जागतिक विजेतेपद पटकावले आहे.

गेल्या चार वर्षांत भारताने पटकावलेले हे पहिले सुवर्णपदक आहे. निकहतने सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताच्या नावावर या चॅम्पियनशिप स्पर्धेत ३९ पदके झाली असून त्यात दहा सुवर्ण, आठ रौप्य आणि २१ कांस्य पदकांचा समावेश आहे. या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या निकहत जरीनची कथाही संघर्षमय आहे. विशेष म्हणजे, निकहत जरीन ही मुस्लिम मुलगी आहे आणि मुस्लिम मुलींनी पुरुषांसाठीच जणू राखीव आहे, अशी समजूत असलेल्या बॉक्सिंगसारख्या खेळात स्थान मिळवणे कठीण आहे. मात्र मुस्लिम समाजात प्रश्न उपस्थित करणा-यांची बोलती निकहतने बंद केली आहे. लोक निकहतला अनेकदा सांगायचे की, ती मुस्लिम आहे; शिवाय मुलगी आहे त्यामुळे ती बॉक्सिंगमध्ये फार काही करू शकणार नाही. ज्या खेळांमध्ये कमी कपडे घालून खेळावे लागते, असे खेळ मुलींनी खेळू नयेत असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले होते. अनेकवेळा समाजातील लोक आणि नातेवाईक तिला टोमणे मारायचे. मात्र वडील आणि आई परवीन सुलताना या दोघांनीही तिला साथ दिली. निकहतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघेही तिच्या पाठीशी उभे राहिले.

बॉक्सिंग हा असा खेळ आहे जिथे मुलींना प्रशिक्षणासाठी किंवा घराबाहेर पडण्यासाठी शॉर्टस् आणि टी-शर्ट घालावा लागतो. निकहतलाही सामाजिक पूर्वग्रहाला सामोरे जावे लागले. निकहतला आपले स्थान निर्माण करण्यासाठी रिंगच्या आत आणि बाहेरही मेरी कोमशी संंघर्ष करावा लागला. मेरी कोम एक यशस्वी बॉक्सर होती यात शंका नाही. २०१९ मध्ये जेव्हा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचण्या झाल्या तेव्हा मेरी कोमला थेट प्रवेश देण्यात आला. हा निर्णय योग्य असला तरी नियमाचा विचार करता तो चुकीचा होता. त्यामागील तर्क असा होता की, मेरी कोमला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही आणि ती जिंकण्याची शक्यता अधिक आहे. निकहतने याविरुद्ध आवाज उठवत चाचणीची मागणी केली. अर्थात, चाचणीत निकहत मेरी कोमकडून पराभूत झाली असली तरी अडीच वर्षांनंतर तिने सुवर्णपदक जिंकून सुरू केलेली लढाई चुकीची नव्हती आणि हा पराक्रम तीदेखील करू शकते हे सिद्ध केले. तरुण खेळाडूंना संधी देत असल्याचे कारण सांगून ३९ वर्षीय मेरी कोम वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर पडली. निकहतने मिळवलेले सुवर्णपदक देशभरातील मुस्लिम मुलींसाठी नव्हे तर सर्वच मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल आणि तिचे सुवर्णपदक मुस्लिम समाजाला एक संदेश देणारेही ठरले आहे.

अनेक मुस्लिम महिलांनी भारताच्या चित्रपट उद्योगात, क्रीडाविश्वात यश मिळवले आहे. सानिया मिर्झाचे टेनिसमधील यश हे त्याचे एक उदाहरण आहे. केवळ इस्लामच नव्हे तर प्रत्येक धर्मात पुरुषप्रधान समाजाने बनवलेल्या नियमांनुसार पुरुषांना कुटुंब चालविणे, समाजात सक्रिय सहभाग घेणे, कौटुंबिक निर्णय घेणे आणि कुटुंबावर नियंत्रण ठेवणे यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदा-या देण्यात आल्या आहेत. परंतु महिलांमध्ये एक प्रतिभा दडलेली असते. या छुप्या प्रतिभांची गळचेपी करणे कोणत्याही धर्मात शिकवले जात नाही. काश्मीर खो-यातील आयशा अजीज नावाची मुलगी देशातील पहिली महिला पायलट बनली आहे. भारताच्या या मुस्लिम कन्येने मिग-२९ हे लढाऊ विमानही उडविले आहे. मुस्लिम मुली यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरत आहेत. भारतात अशी अनेक उदाहरणे आहेत. अमेरिका, ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणावर सरकारी आणि निमसरकारी विभागांत आपली पात्रता सिद्ध करत आहेत. मुस्लिम समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवायचे असेल तर धर्मांधता आणि कट्टरपणातून बाहेर पडून कर्तृत्ववान तरुणींना प्रोत्साहन द्यावे लागेल. आज मुस्लिम महिलांना पुराणमतवादी नव्हे तर पुरोगामी विचारांची गरज आहे.

-नितीन कुलकर्णी,
क्रीडा अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या