36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeविशेषओळख हैदराबाद संस्थानाची

ओळख हैदराबाद संस्थानाची

एकमत ऑनलाईन

भारतात हैदराबाद, काश्मीर, म्हैसूर यासारखी पश्चिम युरोपीय देशांच्या तोडीची काही बलाढ्य संस्थाने होती तर याउलट काठेवाडच्या संस्थानातील राजे छोट्याशा घरात राहत. गुजरातमधील दारोड, विजानोन, अकाडिया, आलमपूर, काटोडिया ही संस्थाने फक्त एक ते दोन चौ. कि. मी. क्षेत्रफळाची होती. चारशेहून अधिक संस्थानांचे क्षेत्रफळ वीस चौरस मैलाहून कमी होते. भारतात असलेल्या इतर संस्थानांच्या तुलनेत हैदराबाद हे संस्थान अनेक बाबतीत वेगळे होते. हैदराबाद क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुस-या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे संस्थान होते. हैदराबाद संस्थानाची लोकसंख्या १ कोटी ६३ लाख ३८ हजार ५३४ होती, तर क्षेत्रफळ ८२,३१३ चौ. मैल इतके होते. या संस्थानाचा विस्तार १६ जिल्ह्यांत पसरला होता. यापैकी आदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वरंगल, नालगोंडा, महेबूबनगर, मेदक, हैदराबाद शहर व शहरांच्या आसपासचा प्रदेश असलेला अतराफबल्दा हे आठ जिल्हे तेलगू भाषिक, बीदर, रायचूर, गुलबर्गा हे तीन जिल्हे कन्नड भाषिक तर औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद हे पाच जिल्हे मराठी भाषिक म्हणजे आपल्या मराठवाड्यातील होते. (सध्या आठ जिल्हे) संस्थानाचे वार्षिक उत्पन्न २६ कोटी रुपयांचे होते. संस्थानात तेलगू, मराठी, कन्नड, हिंदी व उर्दू या प्रमुख भाषा होत्या. मात्र १८८४ पासून उर्दूला राज्य भाषेचा दर्जा होता.

संस्थानात कमालीचे दारिद्र्य होते, शिक्षणाचा प्रसार नव्हता, समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रध्दा होत्या. चांदीचा हाली सिक्का (रुपया) हे चलन होते. भाकरीचे चित्र असलेला पिवळा ध्वज हा आसफजाही निजामशाहीचा राष्ट्रध्वज होता. चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत व पुढील शिक्षण उर्दू भाषेत दिले जाई. तालुका व जिल् च्या ठिकाणी काही हायस्कूल व माध्यमिक शाळा (फोकानिया) होत्या. वरंगल, औरंगाबाद, गुलबर्गा येथे इंटरमिडीएटपर्यंत शिक्षण व हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठ होते. आरोग्य, रस्ते, उद्योगधंदे, दळणवळण व सार्वजनिक सुविधांचा अभाव होता.

संस्थानात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. हिंदू प्रजेला शेतीशिवाय अन्य पर्यायपण फारसे उपलब्ध नव्हते. तेलंगणामध्ये शेतीची रचना जमीनदारी पद्धतीची होती. मूठभर जमीनदारांच्या मालकीची हजारो एकर जमीन असे.उदा. सूर्यपेठ तालुक्यातील जनारेड्डी प्रतापरेड्डी यांना दीड लाख एकर तर खमम येथील कलरू देशमुख यांना एक लाख एकर जमीन होती. हैदराबाद संस्थानात ५५० जमीनदार असे होते ज्यांना ५०० एकरपेक्षा जास्त जमीन होती. या सर्व जमीनदारांचे वार्षिक उत्पन्न १० कोटींचे होते. मराठवाड्यात व कर्नाटकच्या तीन जिल्ह्यांत रयतवारी पद्धत होती. हैदराबाद संस्थानातील एकूण क्षेत्रफळाच्या ४२ टक्के भाग निरनिराळ्या जहागिरीने व्यापला होता.संस्थानातील लहान-मोठ्या जहागीरदारांची संख्या ११६७ होती. त्यात एक लाखाहून अधिक उत्पन्न असलेले १९ जहागीरदार होते. अत्यंत बुरसटलेली, कमालीच्या शोषणावर आधारलेली आणि पराकोटीच्या अन्यायांनी पुरेपूर भरलेली जमीनदारी व जहागीरदारी होती.
संस्थानातील आर्थिक विषमता पराकोटीला पोहोचली होती.१९४१ मध्ये हैदराबाद संस्थानातील ८५ टक्के प्रजा हिंदू, तर १२.८ टक्के मुस्लिम होते. असे असले तरी सरकारी नोकरीमध्ये मात्र मुस्लिमांचे प्रमाण ७५ टक्के व हिंदूंचे २० टक्के असे होते. सरकारी नोक-यांत १ लाख १२ हजार ७३७ मुस्लिम तर हिंदू केवळ २३,३६८ होते. त्यातही सचिव, विभागप्रमुख, सुभेदार, न्यायाधीश, पोलिस अधिकारी यातील बहुतांश जागांवर मुस्लिमच असत. संस्थानातील १६ पैकी १४ कलेक्टर मुस्लिम होते. सरकारी कार्यालये व न्यायालये यात उर्दूचाच वापर होई. तेलगू, मराठी व कानडी या भाषांना राज्यकारभारात अजिबात स्थान नव्हते.

आरोग्य, रस्ते, उद्योगधंदे, दळणवळण व सार्वजनिक सुविधांचा अभाव होता. औद्योगिकदृष्ट्या हैदराबाद संस्थान मागासलेलेच होते. कोळशाच्या काही खाणी, निजाम शुगर फॅक्टरी व अन्य एक साखर कारखाना, दोन कापड गिरण्या, ‘डेक्कन एअरवेज’ ही छोटीशी विमान कंपनी, वजीर सुलतान टोबॅको कंपनीचा चारमिनार सिगारेट बनवण्याचा कारखाना, ‘फारुखी दंतमंजन’ आणि हर दर्द की दवा म्हणून ओळखल्या जाणा-या ‘जिंदा तिलस्मात’(जिंदा तेल) याशिवाय उल्लेख करावा असा उद्योग हैदराबादमध्ये अस्तित्वातच नव्हता.आजही प्रसिद्ध असलेली संस्थानातील बीदर येथील बिद्री कला तसेच औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादजवळ कागजीपुरा येथे हस्तव्यवसाय म्हणून कागद तयार होई. निजामाची सर्व फर्माने आणि राजपत्र या कागदावरच छापली जात. हिमरू शाली आणि चादर, बीडला गुप्ती तयार केली जात असे. नाही म्हणायला इ.स. १८७४ मध्ये वाडी – हैदराबाद हा ११० मैल लांबीचा रेल्वे मार्ग कार्यान्वित झाला होता.

हैदराबाद संस्थानातील प्रजेला दुहेरी पारतंत्र्यात राहावे लागत होते. राजकीय पारतंत्र्य तर होतेच पण त्याबरोबर जनतेच्या शिरावर सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक पारतंत्र्यही लादण्यात आले होते. ब्रिटिशांपेक्षाही अधिक दडपशाही आणि कोणताही उदारमतवाद न सहन करणारी राजकीय संस्कृती येथे नांदत होती. ख-या अर्थाने हैदराबाद मुक्तिसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची प्रतिकृतीच होय. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जी आंदोलने झाली ती अल्प स्वरूपात का होईना येथे झाली. हिंदू महासभा, आर्य समाज, हैदराबाद स्टेट काँग्रेस यांच्या वतीने नि:शस्त्र प्रतिकाराचे सत्याग्रह झाले. विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ आंदोलन केले. स्वामीजी व त्यांच्या सहका-यांनी वैयक्तिक सत्याग्रह केले. ग्रामीण भागात व सरहद्दीवर अनेक सशस्त्र दले स्थापन झाली. १९४२ च्या चले जाव चळवळीचे पडसाद हैदराबाद संस्थानातही उमटले. अनेक ठिकाणी साराबंदीचे आंदोलन, तर काही ठिकाणी शिंदीची झाडे तोडण्याचा जंगल सत्याग्रह झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी सत्याग्रह झाले. सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकारप्रमाणे ‘गोवर्धन सारोळा’ व ‘मुक्तापूर’सह इतर अनेक गावांत निजामाची सत्ता धुडकावून लावली गेली व जनतेने स्वत:चे शासन निर्माण केले. निजामाच्या गाडीवर बॉम्ब टाकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न नारायणराव पवार व त्यांच्या क्रांतिकारक साथीदारांनी केला. क्रांती कार्यासाठी निधी जमवण्याच्या प्रयत्नातून उमरी बँक लुटली गेली.

हैदराबादचा स्वातंत्र्यलढा हा ख-या अर्थाने लोकलढा होता. सशस्त्र आंदोलनात ध्येयधुंद, प्राणार्पणाची तयारी ठेवणा-या कार्यकर्त्यांनी भाग घेतला. १९३८ ते १९४८ या दहा वर्षांत सुमारे पन्नास हजार लोकांचा आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग होता. १९४७-४८ या वर्षात वीस हजार कार्यकर्ते निजाम सरकारच्या तुरुंगात होते तर तीस हजार कार्यकर्ते भूमिगत कार्य करीत होते. या लढ्याची तुलना आपण गांधीजींच्या आंदोलनातील जनतेच्या सहभागाशी केली तर चित्र अधिक स्पष्ट होईल. त्या काळी भारताची लोकसंख्या चाळीस कोटी होती आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली आंदोलनात दीड लाख कार्यकर्त्यांनी भाग घेतला आणि तुरुंगवास सहन केला. हैदराबाद संस्थानाची लोकसंख्या त्यावेळी एक कोटी ६३ लाख होती. म्हणजे फक्त सहा हजार सत्याग्रही तुरुंगात गेले असते तरी प्रमाण बरोबरीचे ठरले असते. त्याऐवजी वीस हजार कार्यकर्त्यांनी तुरुंगवास सहन केला. म्हणजे हे प्रमाण भारतीय जनसहभागाच्या तिपटीपेक्षा जास्त ठरते.भूमिगत कार्यकर्त्यांची संख्या यात मिळवली तर प्रमाण दहापट होते. वास्तविक पाहता हैदराबादचा स्वातंत्र्यलढा भारतीय स्वातंत्र्याची परिपूर्ती करणारा लढा होता, असे असतानाही हैदराबादच्या मुक्तिलढ्यास संस्थानाचा लढा म्हणून दुर्लक्षित केले जाते, खरेतर ही खेदाची बाब आहे, आपला इतिहास गौरवशाली आहे. हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.

-४भाऊसाहेब शि. उमाटे
लातूर, मो.न.७५८८८ ७५६९९

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या