37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeविशेषकदम कदम बढाये जा..

कदम कदम बढाये जा..

एकमत ऑनलाईन

मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र सध्या तापलेल्या तव्यासारखा आहे. मराठवाड्यात नांदेड अधिक तापते. पण १४ मे रोजी नांदेड येथे होणा-या कमलबाबू (कमल किशोर कदम) यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराच्या निमित्ताने या शहरात एक सांस्कृतिक शीतल झुळुक सर्वत्र पसरेल आणि या सत्काराचा आनंद नांदेडकर अनुभवतील…. कमल किशोर कदम यांचा हा अमृतमहोत्सवी सत्कार शरद पवारसाहेब यांच्या शुभहस्ते होत आहे. या सत्काराच्या पुष्पहाराला हातभार लावायला १०० पार केलेले मराठवाड्यातील क्रांतिवीर केशवराव धोंडगे उपस्थित राहणार आहेत. केशवराव हयातभर विरोधी पक्षात राहिले. पण महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असे आहे की, राजकारणातील विरोध शत्रुत्वात कधीही रुपांतरित होत नाही. यशवंतराव चव्हाणांपासून ही परंपरा आहे. म्हणूनच त्यावेळचे विरोधी पक्षनेते एस.एम. जोशी यांचा सत्कार यशवंतराव मनापासून करू शकतात आणि त्यावेळचे प्रखर विरोधी नेते उद्धवराव पाटील यांच्या सत्कारात यशवंतराव पुढाकार घेतात. महाराष्ट्राने ही परंपरा जपली आहे.

अलीकडे सगळेच काही बिघडले आहे. राजकीय विरोधाला द्वेष, सूड अशा पारंब्या लागलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ झाले असताना नांदेडचा हा सत्कार एक वेगळा संदेश महाराष्ट्राला देईल. शिवाय हा सत्कार पवारसाहेबांच्या हस्ते होत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी, वसंतदादांनी अनेक कार्यकर्त्यांना उभे केले. शरद पवारसाहेब त्याच संस्कारातील आहेत. कमलबाबू जेव्हा शैक्षणिक संस्था उभी करायचे म्हणत होते तेव्हा त्यासाठी लागणारे भांडवल कुठे होते? वसंतदादांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात खाजगी शिक्षण संस्थांना मुक्तहस्ताने परवानगी दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व जाती-धर्माच्या मुलांना उच्चविद्याविभूषित होता आले. पण कमलबाबूंची एम. जी. एम. ही संस्था (महात्मा गांधी मिशन) वसंतदादांनी खाजगी शिक्षणसंस्थांना परवानगी देण्याच्या अगोदरच एक वर्ष आधी सुरू झाली. आर्थिक अडचण कशी मिटवायची? कमलबाबू शरद पवारसाहेबांना भेटले. शरद पवारांनी त्यांना गाडीत घातले आणि महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष वसंतराव पटवर्धन यांच्यासमोर नेवून बसवले. विषय सांगितला. चहा होईपर्यंत कमलबाबूंच्या एम. जी. एम. संस्थेसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यातून ही संस्था उभी राहिली. त्याचा आज वटवृक्ष झाला. असे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात उभे राहिले.

कमलबाबू हे ऋण नेहमी मान्य करतात. अशा या कमलबाबूंचा नांदेड येथे होणारा सत्कार हा आगळावेगळा आहे. कारण या व्यक्तिमत्त्वाने खूप मोठी पदे भूषविली असताना प्रसिद्धीच्या झोतात हा माणूस कधीच राहिला नाही. आपण बरे आणि आपले काम बरे या भावनेने नांदेड असेल, औरंगाबाद असेल, नवी मुंबई, पनवेल, दिल्ली येथील एम. जी. एम. च्या शिक्षणसंस्थांतून त्यांनी अनेक डॉक्टर, इंजिनीअर घडविले. ते स्वत: बी. ई. (सिव्हिल) आणि मुंबईच्या आय. आय. टी.मधून एम. टेक झालेले उच्च विद्याविभूषित आहेत. पण त्यांनी आपल्या शिक्षणाची कधीही जाहिरातबाजी केली नाही. आपल्या संस्थेची जाहिरातबाजी केली नाही. आणि स्वत:बद्दलही ते कधी कोणाशी काही बोलले नाहीत. मंत्री राहिले, शिक्षणमंत्री राहिले. त्यांचे नाव कमल…. कमलदलासारखे पाण्यापासून अलिप्त राहिले. असा हा एक आगळावेगळा माणूस आहे. आजच्या सगळ्या प्रदूषित वातावरणात कमलदलासारखा स्वत:चा कर्मयोग महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी करणारा, एखादा कर्मयोगी शोभावा, इतका शांत, स्वच्छ, निश्चयी, दूरदृष्टीचा, सिध्दीला वाहून घेतलेला, प्रसिध्दीपासून दूर राहिलेला या महाराष्ट्रातला माणूस शोधायचा झाला तर आजच्या तारखेला तरी एम. टेक सारखी उच्च पदवी संपादित केलेला मंत्री राहिलेला पण मंत्रिपद न मिरवलेला एकच कर्मयोगी मला गोदाकाठी दिसतो आहे.

त्यांचे नाव कमल किशोर कदम हे आहे. जिल्हा परिषद असो, साखर कारखाना चालवणे असो, विधानसभेतील आमदारपद असो, विधानसभेचे उपाध्यक्षपद असो, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद असो किंवा शिक्षण मंत्रिपद असो.. संसदीय व्यासपीठावर २२ वर्षे वावरलेला हा नेता, ज्याच्या अंगावर एकही ओरखडा कोणाला ओढता आला नाही, एक नख लावता आले नाही, एक आरोप करता आला नाही. इतका निर्लेप राजकारणी, इतका सरळ-साधा पण ज्यांनी उभ्या केलेल्या प्रचंड कामाची जाहिरात न झालेला हा नेता, गोदाकाठचा कर्मयोगीच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरताना हा नेता कधी मिरवला नाही, आपले मोठेपण सांगत बसला नाही, पत्रकार परिषदा घेत बसला नाही, प्रसिध्दीची कधी हाव ठेवली नाही. स्वत:चे ‘लोकपत्र’ हे वृत्तपत्र हातात असताना कमलबाबूंची छायाचित्रं त्या वृत्तपत्रात कधी पाहायला मिळाली नाहीत. राजकारणापासून हळूच दूर होता होता… कसलीही आदळ-आपट न करता ज्या नेत्याने महात्मा गांधींचे नाव घेऊन एक मिशन हातात घेतले ते त्यांचे शैक्षणिक समर्पण महाराष्ट्राला थक्क करणारे आहे.

देशपातळीवर पोहोचलेले आहे. महात्मा गांधींचे नाव अनेक ठिकाणी असते. अनेक चौकांना असते, अनेक रस्त्याला असते. महात्माजींच्या नावाचे या देशात एवढे रस्ते आहेत की, ते एकत्र जोडले तर थेट महात्माजींपर्यंत पोहोचता येईल. पण या सर्व नावांच्या मागे किंवा पुढे ‘मिशन’ म्हणजे ‘समर्पण’ फक्त कमल किशोर कदम यांच्या शैक्षणिक संस्थेतच आहे. ते नाव आहे ‘एम. जी. एम’. येथे गेल्यावर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला गेला तर ती शालही खादीचीच असेल. या संस्थेत गेल्या ३५ वर्षांत उच्च शिक्षण घेऊन देश-विदेशात गेलेले शेकडो विद्यार्थी आहेत. ते डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, जगभर पसरलेले आहेत. ग्रामीण भागातल्या सर्व जाती-धर्माचे आहेत.

अशी प्रचंड संस्था उभी करणारे कमलबाबू ७५ वर्षांचे झाले. अमृतमहोत्सवाच्या पुढे निघाले. त्यांचे बिनबाद शतक होणार आणि आपण सगळे ते साजरे करणार. गेल्या ६० वर्षांच्या पत्रकारितेत आणि राजकारणात मी वावरतो आहे.. पण कमलबाबूंना फक्त ३ वेळा भेटलो. एकदा त्यांनी आयोजित केलेल्या एम. जी. एम.च्या औरंगाबाद येथील ‘वसंतदादा पाटील जन्मशताब्दी’ सोहळ्याच्या व्याख्यानमालेत… त्या कार्यक्रमाचा समारोप कमलबाबूंनीच केला. पण ते भाषण नव्हते, कृती होती. वसंतदादांच्या कृतज्ञतेपोटी त्यांनी जाहीर केले की, ‘फार न शिकलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांत शहाण्या माणसाचं नाव वसंतदादा पाटील आहे.

त्यांनीच हे ओळखलं की, ग्रामीण भागातल्या मुलांना मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या मोठ्या महाविद्यालयात शिकायला मिळत नाही. श्रीमतांची मुलं मणिपालला जातात, उच्च शिक्षण घेऊन महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रातली मुलं उच्च शिक्षण कधी घेणार? दादांच्या निर्णयामुळेच महाराष्ट्रात अनेकांनी महाविद्यालये सुरू केली पण अजूनही गरीब मुलाला शिक्षण अवघड आहे. म्हणून गरीब मुलांसाठी यावर्षी मी माझ्या संस्थेतर्फे ग्रामीण भागात एक कोटी रुपयांचा निधी या विद्यार्थ्यांच्या फीसाठी खर्च करणार आहे…’ (आणि त्यांनी तो तसा केला.) महाराष्ट्रात हा एकमेव राजकारणी असा आहे की त्यांनी पत्रकारांना फार जवळ केले नाही. प्रसिध्दीची अपेक्षा केली नाही. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीची जाहिरात केली नाही. त्यांनी जे उजव्या हाताने केले ते डाव्या हाताला समजू दिले नाही. इतका निर्लेप माणूस मी ६० वर्षांच्या पत्रकारितेत बघितला नाही. त्यांनी किती माणसांना उभे केले, त्याची गणती करता येणार नाही. त्यांचे राजकीय नेतृत्व, कर्तृत्व एवढे मोठे आहे की, ते पश्चिम महाराष्ट्रात असते तर ते अधिक मोठे झाले असते. त्यांची सामाजिक कुवत मोठी आहे, आवाका आहे.

त्यांना विषय समजतात, प्रश्नांची सोडवणूक शांतपणे कशी करता येते, याची खुबी त्यांना अवगत आहे. ते कोणाशी भांडल्याचे कोणी सांगितले नाही. त्यांच्या तोंडून कुणाला अपशब्द गेल्याचे कोणी ऐकले नाही. त्यांचे बोलणे शांत, संयमी, मुद्याला धरून आणि विषयापुरते राहिले. राजकारणातली निष्ठा त्यांनी जपली. पळापळ केली नाही तसेच आपण ‘राष्ट्रवादी पक्ष’ आणि शरद पवारसाहेब यांच्याशी एकनिष्ठ आहोत, हे दाखवण्याची धडपडही केली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारसाहेबांचा मराठवाडा दौरा नांदेडपासून सुरू झाला. त्या सभेला मी होतो. पवारसाहेब जिथे थांबले होते, तिथे सकाळी लवकर येऊन ते पवारसाहेबांना भेटून, नमस्कार करून गेले. ‘पुढे पुढे करणे’ हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांचे नाव कमल…पाण्यात राहून अलिप्त. ते नावाप्रमाणेच आहेत. आजच्या राजकारणात ‘निष्ठा’ म्हणजे मला काही मिळत असेल तर निष्ठा… मला काही मिळत नसले तर ‘निसटा..’ ५० वर्षांच्या राजकीय जीवनात कमलबाबूंनी हाती घेतलेल्या कामांतून निसटण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आपल्या विचारांशी फारकत कधी घेतली नाही. त्यामुळेच ‘एम. जी. एम’ म्हणजे महात्मा गांधी मिशन या नावाशी प्रतारणा न करता स्वत:च्या वाढदिवशी पत्नीसोबत महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात चिंतन करून दिवस साजरा करणारा महाराष्ट्रात कोणता नेता असेल का?… होय आहे… त्यांचे नाव कमलबाबू आहे. त्यांच्या पत्नीचे नाव लतिका कमलबाबू आहे.

जगात ६०० विद्यापीठांत महात्मा गांधी शिकवले जातात. शिकवणारे प्रोफेसर आणि शिकणारे विद्यार्थी यांना गांधीजी किती समजले, त्यांनी ते किती आत्मसात केले, हे कोणालाच माहीत नाही. ‘एम. टेक’चा अभ्यास करताना, ती पदवी मिळवताना गांधी शिकवले गेले नव्हते. महाविद्यालयात न शिकवलेले गांधी महाराष्ट्रात ज्या थोड्या लोकांना समजले असतील त्यातही पहिला क्रमांक कमलबाबूंचाच आहे. म्हणून ‘एम. जी. एम.’ चा जन्म झाला. या शैक्षणिक यशात श्यामराव कदम यांना कमलबाबूंनी नेहमी आदर्श मानले. त्यांचे बंधू बाबूराव कदम यांच्या अफाट कष्टातून या संस्था उभ्या राहिल्या. हे ऋणही कमलबाबू कधी विसरले नाहीत. म्हणून तर कमलबाबूंच्या सत्काराअगोदर दोन वर्षांपूर्वी बाबूरावांचा सत्कार पवारसाहेबांच्या हस्तेच झाला… हे मराठवाड्याला माहिती आहे.

-मधुकर भावे

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या