26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeविशेषकायदेशीर नियंत्रणाची गरज

कायदेशीर नियंत्रणाची गरज

एकमत ऑनलाईन

लखनौमध्ये १६ वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याने आपल्या आईची गोळी झाडून हत्या केली. कारण काय? आईने पब्जी गेम खेळायला नकार दिला म्हणून! हिंसेशी संबंधित असे असंख्य गेम्स ऑनलाईन उपलब्ध आहेत. भारतात हिंसक ऑनलाईन गेम्सवर नियंत्रण आणण्यासाठी कोणताही कायदा तयार केला गेला नाही. जुगार आणि लॉटरी या बाबी राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतात. काही राज्यांनी ऑनलाईन गेम्स आणि जुगार यावर कायदे बनवले आहेत. परंतु ऑनलाईन गेमिंग आणि त्याच्याशी संबंधित हिंसक प्रवृत्ती यावर कोणताही स्पष्ट कायदा अद्याप तयार झालेला नाही.

लखनौमध्ये १६ वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्याने आपल्या आईची गोळी झाडून हत्या केली. कारण काय? आईने पब्जी गेम खेळायला नकार दिला म्हणून! खुनाचा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्याने आईचा मृतदेह दोन दिवस एका खोलीत बंदिस्त करून ठेवला. लष्करात कार्यरत असलेले वडील आणि शेजारी-पाजारी यांना अजिबात याची खबर लागू दिली नाही. बहिणीला ओलीस ठेवले. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त-हेत-हेच्या कहाण्या रचल्या. ऑनलाईन गेमच्या व्यसनापायी चोरीसह अन्य गुन्हे केल्याच्या यापूर्वी अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. परंतु लखनौची ही घटना डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे. हिंसेला प्रोत्साहन देणारे ऑनलाईन गेम्स आपल्या मुलांवर कशा प्रकारे परिणाम करीत आहेत, याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. गेम्स खेळण्यापासून रोखल्यामुळे अनेक मुलांनी आत्महत्या केली आहे. स्वत:चे नुकसान करून घेतले आहे. घरात चोरी केली आहे.

लखनौच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक पातळीवर फार मोठा बदल होण्याची शक्यता तशी कमीच आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. मोठी घटना घडल्यावर सरकारला जाग येते. काही दिवस बौद्धिक चर्चा होतात आणि त्यानंतर सर्वकाही विस्मृतीत जाते. ऑनलाईन गेम्सचे व्यसन हा भारताच्या युवापिढीसाठी एक मोठा धोका आहे. याचे गांभीर्य आपण जेवढ्या लवकर समजून घेऊ तेवढे चांगले आहे. मुलांच्या दैनंदिन व्यवहारांवर या गेम्सचा दुष्परिणाम दिसत आहे. समाज आणि कुटुंबाशी मुलांचे असलेले बंध यामुळे कमकुवत होत चालले आहेत. सर्वांत गंभीर बाब अशी आहे की, पब्जीसारखे गेम्स मुलांना हिंसक, आक्रमक, चिडचिडे बनवत आहेत. ऑस्ट्रेलियात झालेल्या एका अध्ययनात ऑनलाईन गेमिंग आणि हिंसा यातील संबंधांचा शोध घेण्यात आला. मानसशास्त्रज्ञांचेही असेच मत आहे की, रक्तपात असलेले गेम्स खेळणा-यांना सतत हिंसक दृश्ये पाहण्याचे व्यसन जडते आणि आपल्या ख-याखु-या जीवनातही हिंसेत भाग घ्यायला ते मागेपुढे पाहत नाहीत.

अन्य एका संशोधनात असे दिसून आले आहे की, हिंसा असणारे ऑनलाईन गेम खेळणा-या ६० टक्के मुलांनी कोणताही विचार न करता शस्त्रे हाती घेतली. ज्यांनी हिंसा नसलेले ऑनलाईन गेम खेळले, अशा मुलांपैकी जास्तीत जास्त ४४ टक्के मुलांनी बंदुकीत रुची दाखवली. अमेरिकेत वेगाने वाढत चाललेल्या हिंसक घटनांमागील एक कारण ऑनलाईन हिंसक गेम्स हेही आहे. या पार्श्वभूमीवर, कमी वयाच्या मुलांवर या गेम्सचा जो परिणाम होतो, तो खरा चिंतेचा विषय आहे. याचा सर्वाधिक परिणाम ११ ते १८ वयोगटातील मुलांवर होताना दिसत आहे. हे आव्हान केवळ भारतासमोरच उभे आहे असेही नाही. जगभरातील देश या समस्येशी लढा देत आहेत. चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी शाळकरी मुलांसाठी ऑनलाईन गेमिंगसाठी वेळ निश्चित करण्यात आली. त्याचप्रमाणे त्याची जबाबदारी गेमिंग अ‍ॅप तयार करणा-या कंपन्यांवर टाकण्यात आली आहे. चीनसारखे नियंत्रण भारतात शक्य नाही आणि लखनौमधील घटना हा त्याचाच परिपाक आहे. अन्यथा केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच बंदी घातल्यानंतरही शाळकरी मुलांना पब्जी गेम खेळायला मिळालाच नसता.

पब्जी गेम हे एक उदाहरण आहे. कारण हिंसेशी संबंधित असंख्य गेम्स ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि त्यांच्या वापरकर्त्यांची संख्याही वेगाने वाढत चालली आहे. भारतात हिंसक ऑनलाईन गेम्सवर नियंत्रण आणण्यासाठी कोणताही कायदा तयार केला गेला नाही. जुगार आणि लॉटरी या बाबी राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतात. काही राज्यांनी ऑनलाईन गेम्स आणि जुगार यावर कायदे बनवले आहेत. परंतु ऑनलाईन गेमिंग आणि त्याच्याशी संबंधित हिंसक प्रवृत्ती यावर कोणताही स्पष्ट कायदा अद्याप तयार झालेला नाही. केरळसारख्या एखाद्या राज्याचा अपवाद वगळता अन्य राज्यांकडे तर ऑनलाईन गेमिंगचे व्यसन सोडविण्यासाठी मदत करणा-या खास केंद्रांचीही योजना नाही. ऑनलाईन गेमिंग ही कोकेन, निकोटिन किंवा मॉर्फिन यांच्यासारखीच एक नशा आहे, हे अनेक अध्ययनांमधून समोर आले आहे. लोकांचा पैसा, वेळ आणि अवधान सर्वकाही घेऊन जाणारे हे व्यसन आहे.

पब्जी गेमसारख्या हिंसक गेम्समुळे निर्माण होत असलेल्या समस्यांपासून सरकारे अनभिज्ञ नाहीत. परंतु आता या विषयावर गंभीर चिंतन करण्याची वेळ आली आहे. केवळ विचार करण्यातही आपण बराच वेळ वाया घालवला तर युवा पिढीला फार मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. गेमिंग हा अभ्यास आणि कामामुळे येणारा ताण हलका करण्याचा आणि आपल्याला तणावमुक्त करण्याचा एक चांगला पर्याय आहे. मनोरंजनाचाही तो एक चांगला मार्ग आहे. एकमेकांशी जोडले जाण्याचे हे एक माध्यमसुद्धा ठरू शकते. परंतु याच फायद्यांचे रूपांतर नुकसानीत केव्हा होते, हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे या गेम्सपासून दूर राहणेच चांगले!

-सुचित्रा दिवाकर

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या