22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविशेषकिसान दलाची स्थापना

किसान दलाची स्थापना

एकमत ऑनलाईन

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा कालखंड ग्रामीण भागात आजही ‘रझाकारांची बारी’म्हणून ओळखला जातो. कारण या काळात रझाकारांनी धुमाकूळ घातला होता. रझाकारांच्या अन्याय, अत्याचारामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली. त्यामुळे या भागातील लोकांना आजही रझाकार संघटना आठवते. कासिम रझवीच्या नेतृत्वाखाली ‘रझाकार’ या संघटनेची खरी वाढ झाली. खुद्द निजामाचाच वरदहस्त लाभल्यामुळे या संघटनेने हिंदू प्रजेवर अनन्वित अन्याय-अत्याचारास सुरुवात केली. या संघटनेला ‘पस्ताकोम’ या संघटनेची मोठ्या प्रमाणात साथ मिळाली. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे अहिंसक मार्गाने चालवणे शक्यच नव्हते. हा लढा सशस्त्र लढावा लागणार याची कल्पना भारतीय नेतृत्वाला पण होती. एवढेच नव्हे तर खुद्द महात्मा गांधीजींनी पण या सशस्त्र लढ्यास मूक संमती दिली होती. या काळात सरहद्दीवर भारतीय हद्दीत अनेक सशस्त्र कॅम्प स्थापन करण्यात आले होते. त्याप्रमाणेच अंतर्गत भागातही काही बहादूर तरुणांच्या पुढाकाराने अशी केंद्रे उभारली गेली. त्यात बीदर जिल्ह्यातील आट्टर्गा व तोंडचिर ही सशस्त्र व लढावू केंद्रे होती.

सरहद्दीवरील बा केंद्रापेक्षा ही केंद्रे अत्यंत जोखमीची होती. परिसरातील तरुणांनी रझाकारांशी सशस्त्र लढा देण्यासाठी किसान दलाची स्थापना केली. या किसान दलाचे प्रमुख केंद्र आट्टर्गा ता. निलंगा (सध्या ता. भालकी, जि. बीदर) हे लहानसे गाव होते. येथून जवळ मेहकर हे प्रमुख रझाकार केंद्र होते. शिवाय परिसरातील आळवाई, वलांडी, देवणी, घोरवाडी, भालकी, बस्वकल्याण या गावांत मोठ्या प्रमाणात रझाकारांची केंद्रे स्थापन झाली होती. या गावाचे वैशिष्ट्य असे होते की या गावामध्ये एक-दोन अपवाद वगळता सर्व हिंदूधर्मीय लोक होते. गावाला भौगोलिकदृष्ट्या संरक्षण प्राप्त झाले होते. गावाच्या पूर्व बाजूला एका मैलावर मांजरा नदी वाहत होती. तर गावाच्या पश्चिमेकडे गावाला लागून अर्धचंद्राकृती दाट सिंदबन होते. यामुळे गावातील लोकांना वेळप्रसंगी लपून बसायला नैसर्गिक जागा उपलब्ध झाली होती. अनेक वेळा या सिंदबनाने टोळीला अडचणीच्या वेळी आश्रय दिला. विशेष म्हणजे पैलवानांचे गाव म्हणून हे गाव ओळखले जायचे. या गावातील लोक लढाऊ वृत्तीचे होते.

त्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये रझाकारांकडून होणा-या अन्याय-अत्याचाराच्या बातम्या ऐकून गाववाले अस्वस्थ होत होते. पिराजी बिरादार उंटावरून शिमग्यासाठी माल घेऊन येत होते तेव्हा आळवाईच्या रझाकारांनी पाठलाग करून उंटावरील माल लुटला. आट्टरग्यापासून जवळच मेहकर हे रझाकार केंद्र होते. मेहकर ही या भागातील मध्यवर्ती बाजारपेठ होती. मेहकरमध्ये पठाण व रझाकारांनी दडपशाहीचे धोरण सुरू केले. यामुळे आर्य समाजाचे कार्यकर्ते व रझाकारांत अनेक वेळा वाद निर्माण होत होते. शेरखान व गुलाब शहा हे दोघे या रझाकार केंद्राचे सदर म्हणजे प्रमुख होते. या दोघांची जोडी परिसरातील हिंदू लोकांच्या मनामध्ये धडकी भरवत असे. मेहकर येथील केंद्रात परिसरातील अनेक गावांतील सुमारे एक हजार हत्यारबंद रझाकार सामील झाले होते. या रझाकार व पस्ताकोमांशी आपण लढू शकत नाही असे लोकांना वाटायचे. सर्वसामान्य लोकांना धमकावून खंडणी गोळा करण्याचे काम हे लोक करू लागले. लोक मूकपणाने हा अन्याय सहन करत होते. प्रत्येक गावामध्ये या रझाकारांशी मुकाबला करावा असे म्हणणारे लोक होते. पण त्यांना इतर लोकांचा पाठिंबा मिळत नव्हता. सायगाव नावाच्या गावात असाच यशवंतराव सायगावकर नावाचा एक तरुण होता. त्यांना अन्यायाची प्रचंड चीड होती. उंची सहा फूट,

धिप्पाड शरीरयष्टीचा हा तरुण गावात आर्य समाजाचे कार्य करीत होता. त्यांनी हैदराबाद येथे शिक्षण घेतले होते. तेथून त्यांना आर्य समाजाच्या वतीने विजयवाडा येथे सशस्त्र प्रशिक्षणासाठी पाठवले गेले. तेथे त्यांनी तलवारबाजी, बंदूक चालवणे अशी कौशल्ये प्राप्त केली. हैदराबादला परत आल्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या सर्व तरुणांनी आपल्या गावी जाऊन त्या परिसरातील लोकांना प्रशिक्षण द्यावे व त्यांचे स्थानिक पातळीवर संघटन उभा करावे यासाठी गावी पाठवण्यात आले. गावी आल्यानंतर त्यांचे गुरु चलमलप्पा सुकाळे सावकार यांनी त्यांना बंदूक घेऊन दिली व गावातील तरुणांना प्रशिक्षण देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे यशवंतराव गावातील तरुणांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देऊ लागले. गावातील रझाकारांना ही खबर लागताच ते संतापले पण यशवंतराव सावध होते. एके दिवशी यशवंतराव आपल्या मित्रांसह गावातील गणपतराव शेळगे यांच्या शेतात हुरडा खाण्यासाठी जात होते. नदीजवळ कादरपाशा नावाचा गावातील रझाकार सदर होता. तो तेथे महिलांना त्रास देत होता. यशवंतराव व त्यांच्या सोबतच्या तरुणांनी त्यास सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता. उलट त्याने यशवंतराव यांच्यावर बंदूक रोखली. आता तो आपल्याला मारणार असे वाटल्यामुळे यशवंतरावांनी आपल्या बंदुकीतून गोळी सोडली. कादरपाशा मारला गेला.

आता आपण गावात परतू शकत नाही हे यशवंतराव यांना कळाले. ते तेथून पळाले ते थेट आट्टर्गा येथे आले. येथे त्यांचे मामा लिंबाजी मास्तर राहत होते. गावातील तरुणांना ही बाब समजली. त्यांनी यशवंतराव यांचे स्वागत केले. आता ते या गावातील तरुणांना प्रशिक्षण देऊ लागले. या गावातील लोकांनी मात्र त्यांना साथ दिली. (यशवंतराव सायगावकर यांची मुलाखत यूट्यूबवर उपलब्ध आहे.) आट्टर्गा येथे निवृत्तीराव गायकवाड, मुरलीधर गायकवाड, यशवंतराव सायगावकर, व्यंकटराव माणिकराव मुळे (मिरकल), लिंबाजी बिरादार, बळवंतराव मास्तर, ज्ञानू बोळेगावकर, डॉ. चनप्पा तुगावकर (काळसर तुगाव), भीमराव बिरादार (मिरकल), शेषराव वाघमारे (निलंगा), दादाराव हालसे, ग्यानोबा बिरादार, आत्माराम मिरखले, लिंबाजी उगले, सिद्राम पाटील, निवृत्तीराव धनगर, नारायण जाधव, तुकाराम सागावे, रामा बोळेगावे व समस्त गावक-यांनी मिळून किसान दलाची स्थापना केली. (तोंडचिर परिसरात आप्पाराव पाटील कौळखेडकर, तुकाराम पाटील तादलापूरकर व त्यांच्या इतर बहादूर शूरवीरांची टोळी स्थापन केली. अर्थात किसान दलाच्या दोन वेगवेगळ्या टोळ्या होत्या. नंतरच्या काळात त्यांनी एकत्र पण कार्य केले आहे.) स्वत:च्या गावासह परिसरातील अनेक गावांवर रझाकारांचा हल्ला झाला की हे बहादूर तरुण आपल्या प्राणाची पर्वा न करता मदतीला धावून जात. इतर वेळी परिसरातील गावांत जाऊन आपण करीत असलेल्या कार्याची माहिती देत. रझाकार व पस्ताकोम यांच्याशी संघटितपणे मुकाबला करू असे आश्वासन दिले जाई. यामुळे भयभीत झालेल्या लोकांना यांचा आधार वाटू लागला. या टोळीतील तरुणांचा पहिला सामूहिक पराक्रम म्हणजे संभा दरोडेखोराचा वध. संपूर्ण गाव लुटण्याचा प्रयत्न करणा-या संभा दरोडेखोराचा टोळीतील तरुणांनी वध केला.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या