26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeविशेषगोर्टा हत्याकांड

गोर्टा हत्याकांड

एकमत ऑनलाईन

मुचळंबच्या घटनेनंतर सरकार दरबारी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे रझाकारांना अधिकच जोर चढला. हिसामोद्दिनच्या वधात गोरट्यातील लोक सहभागी होते असा रझाकारांचा समज झाला होता. गोर्टा (ता. बसवकल्याण) या २००० लोकवस्तीच्या गावात ४०० घरे होती. १० मे १९४८ ला सकाळीच हिसामोद्दिनच्या वधाच्या सूडबुद्धीने पेटलेल्या २५०० पेक्षा जास्त रझाकारांनी व पस्तकौमानी गोरट्यावर आकस्मिक हल्ला केला. यात घोरवाडी, भालकी, हुमनाबाद, बसवकल्याण, हुलसूर, बेलूर, मेहकर गावचे रझाकार व पस्ताकोम होते. मोठ्या संख्येने हत्यारबंद रझाकार अचानक गावात घुसले व त्यांनी दिसेल त्यास मारण्यास सुरुवात केली. हिंदू लोक आकस्मिक हल्ल्यामुळे घाबरले. त्यांना काहीच सुचत नव्हते. जो तो आपल्या घरांत दडून जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. रझाकार लोकांना घराबाहेर ओढत आणि त्यांना ठार करत. नारायणराव मक्तेदार, रामराव पटवारी व बस्वप्पा मालीपाटील यासारख्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना देखील त्यांच्या वाड्यातून बाहेर ओढत आणून गावच्या मध्यभागी असलेल्या लक्ष्मीच्या देवळापुढे ठार करण्यात आले. भीमराव पोलिस पाटील व त्यांच्या पत्नीने आपली मुले बसप्पा व आणेप्पा यांना वाचवण्यासाठी गोरट्यातील रझाकार सदर रसुलखा यास ४२ तोळे सोने दिले. रसूल हा भीमराव पाटलाजवळ बसलेला होता म्हणून त्यांनी विश्वास ठेवला. पण त्यांचे वा मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. गोरट्यात महादप्पा डुमणे यांचा तीन मजली मजबूत व भव्य वाडा होता. जणू छोटा किल्लाच. त्यावेळी इतर कोणत्याही इमारतीपेक्षा वाडा उंच व विस्ताराने मोठा होता. गावातील लुटालूट, जाळपोळ, हिंसाचार पाहून जवळपास ८५० लोकांनी या वाड्यात आश्रय घेतला.

त्यात ज्यांच्याकडे हत्यारे होती असे नागप्पा हलम्बरे, काशाप्पा भालके, सिद्रामप्पा पटणे, मारुतीअण्णा कोणे, चनाप्पा डुमणे, दानू कोळी, विठोबा कोळी, मारुतीराव परीट हे कुशल वीर होते. वाड्यात जमलेल्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी या बहादूर तरुणांवर आली. माडीवर पत्रे लावून मोर्चाच्या जागा केल्या गेल्या व मोर्चे धरले गेले. इकडे गावात घोंघावणारे रझाकाररूपी वादळ आता डुमणे सावकाराच्या वाड्याकडे वळले. डुमणे सावकाराचा वाडा लुटावा, जाळून टाकावा या हेतूने रझाकार तिकडे वळले पण तिथे वेगळेच घडले. रझाकारांना वाड्यातून प्रतिकार होऊ लागला. वाड्यातील तरुणांनी आता निर्वाणीचे युद्ध करायचे ठरविले होते. आतून फायरिंग होऊ लागली. गोफण गुंड्याचा व दगड-धोंड्यांचा भयानक मारा सुरू झाला. वाड्यातून होत असलेल्या आकस्मिक प्रतिकारामुळे अनेक रझाकार ठार झाले. कित्येक जखमी झाले. आतील जबरदस्त प्रतिकारामुळे ते आता पुढे सरकू शकत नव्हते. दिवसभराच्या लढाईत अनेक रझाकार मारले गेले, रझाकारांशी लढताना मारुतीअण्णा कोणे व चनाप्पा बिरादार या दोघांना वीरमरण आले. दिवसभर हा मुकाबला चालला. सूर्यास्त होऊन अंधार पडू लागला तशी रझाकारांनी फायरिंग बंद केली व ते गाव सोडून निघून गेले .

रझाकार जाताच वाड्यातील ग्रामस्थांनी विचार केला की अपमानित झालेले रझाकार उद्या दुप्पट तयारीने येतील या विचाराने रात्रीच्या सुमारास वाड्यातील लोक बाहेर पडले व आपापल्या पाहुण्यांच्या गावांना रातोरात निघून गेले. इकडे रझाकारांनी दिवसभर गावातील जवळपास २०० लोकांची हत्या केली. दुस-या दिवशी रझाकार परत जोमाने आले.आता गावात स्मशानशांतता पसरली होती. सगळीकडे मृतदेहांच्या जळण्याचा वास येत होता. बराच वेळ फायरिंग करूनही डुमणे सावकाराच्या वाड्यातून कोणताच प्रतिकार होत नसल्याचे बघून आता हळूहळू रझाकार वाड्यात घुसले. सर्व संपत्ती लुटली व संपूर्ण वाडा कमरेइतका खोदून बघितला व शेवटी वाड्याला आग लावली गेली. हा वाडा कित्येक दिवस जळत होता. वाड्याचा वरचा भाग पूर्ण जळाला असून लोखंडी बीम मात्र शाबूत आहेत. आपल्यावरील जखमा दाखवत आजही तो उभा आहे. गोर्टा हत्याकांडाची बातमी संपूर्ण हैदराबाद संस्थानात पसरली. स्थानिक वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर हायकोर्टातील वकिलांची प्रोटेस्ट कमिटी सरकारकडे पाठवून मागणी केली की आम्ही गोरट्यात जाऊन नेमके काय घडले आहे हे पाहू इच्छितो. शेवटी सरकारला वकिलांची मागणी मान्य करावी लागली. वकिलांच्या ‘प्रोटेस्ट कमिटीने’ होनाळी, मुचळंब व गोर्टा परिसरातील गावांचा दौरा केला व तेथून निर्वासित झालेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. तसेच त्यांनी गावातील हरिजन, मुसलमान व पस्ताकौम यांच्याही मुलाखती घेतल्या. कमिटीने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या हल्ल्यात २०० लोक मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी झाले.

आर्थिक नुकसान सुमारे ७० लाख रुपयांचे झाल्याचे कमिटीने नमूद केले. कमिटी १७ मे १९४८ ला म्हणजे घटनेनंतर सात दिवसांनी गोरट्यात पोहोचल्यानंतर केवळ कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. कावळे, गिधाडे मृतदेहांना खात होते. अनेक ठिकाणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. सर्व परिसरात दुर्गंधी पसरली होती. कडब्याच्या बनमीत अनेक मृतदेह आढळून आले. सात दिवसांनंतरही एकही सरकारी अधिकारी पंचनाम्यासाठी आला नव्हता. या घटनेची नोंद भारत सरकारच्या श्वेतपत्रिकेतही करण्यात आली आहे, हैदराबाद संस्थानातील भारत सरकारचे प्रतिनिधी के. एम. मुन्शी यांनीसुद्धा या परिसराचा दौरा केला व आपल्या ‘द एंड ऑफ अन इरा’या पुस्तकात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. या घटनेमुळे परिसरातील अनेक गावांतील लोकांनी आपले घरदार सोडून भारतीय हद्दीत आश्रय घेतला.
(सदर घटनेविषयीची डॉक्युमेंट्री यूट्यूबवर पाहता येईल.)

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या