17.6 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeविशेषचंद्राबाबू का रडले?

चंद्राबाबू का रडले?

एकमत ऑनलाईन

एकेकाळी देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समावेश अंसणारे तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना ढसढसा रडताना गेल्या आठवड्यात सर्वांनी पाहिले. नायडू यांनी देशातील सर्व राजकीय विचारधारांची एक संपूर्ण परिक्रमा केली. संयुक्त आघाडीकडून भाजपकडे आणि तिथून पुढे काँग्रेस आघाडीपर्यंत ती जाऊन पोहोचली. परंतु विविध विचारधारांशी क्रमश: हातमिळवणी करण्याची किंमतही चंद्राबाबू नायडू यांना मोजावी लागली. वायएसआर काँग्रेसचा वाढता पाठिंबा पाहता भावनिक आवाहन करणेच त्यांच्या हाती उरले आहे.

अलीकडेच एक व्हीडीओ वृत्तवाहिन्यांवरून सर्वांनी पाहिला. तेलुगू देसम पक्षाचे नेते एन. चंद्राबाबू नायडू या व्हीडीओत ढसढसा रडताना दिसले. एकेकाळी अपराजित नेते म्हणून ओळखल्या जाणा-या या नेत्याला रडताना एवढा आवेग अनावर व्हावा, असे नेमके काय घडले असावे, असा प्रश्न सर्वांनाच पडला. नायडू हे तीन वेळा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. आंध्र प्रदेशचे विभाजन होण्यापूर्वी दोन वेळा आणि त्यानंतर एकदा त्यांनी हे पद भूषविले आहे. अत्यंत चाणाक्ष राजकारणी म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रीय राजकारणातही स्वीकारार्ह चेहरा असलेले ते नेते आहेत. पाच दशके सार्वजनिक जीवनात असलेल्या नायडू यांनी या प्रवासात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. अशा नेत्याने धाय मोकलून रडावे, अश्रू पुसावेत आणि ‘मुख्यमंत्री होईपर्यंत आंध्र प्रदेशच्या विधानसभेत पाऊल टाकणार नाही,’ अशी प्रतिज्ञा करावी, ही दृश्ये पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. ही दृश्येच संपूर्ण कहाणी सांगणारी आहेत.

नेता सत्तेत असो वा नसो, त्याची अशी दृश्ये लोकांच्या भावनांना चटकन हात घालणारी असतात. गेल्या काही आठवड्यांपासून वायएसआर काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते एकमेकांवर तिखट शब्दांत हल्ले करीत आहेत. अनेक ठिकाणी तर शारीरिक हल्लेही होतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अर्थात, राजकारणाच्या अंगणात एकंमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे ही काही अपरिचित घटना नव्हे. परंतु वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीमधील ही शेरेबाजी पुन्हा भडकणे नायडूंसाठी खूपच नुकसानदायक आहे. जेव्हा असे आरोप-प्रत्यारोप होतात, तेव्हा दोनच मार्ग असतात. एक म्हणजे, राजकीय शेरेबाजीचा स्तर आणखी खाली घेऊन जाणे आणि ज्यांना चर्चा गंभीरपणे व्हावी असे वाटते त्यांना दु:ख देणे. दुसरा मार्ग असा की, डोळ्यांत पाणी भरून पत्रकार परिषद घेणे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री बनत नाही तोपर्यंत विधानसभेत प्रवेश करणार नाही, अशी घोषणा करणे. अशा प्रकारच्या घोषणेमुळे नायडू आणि टीडीपी दोहोंना लोकांची भरपूर सहानुभूती मिळाली.

आपल्याकडे असलेले राजकीय कौशल्य नायडू यांना चांगलेच ठाऊक आहे. जर आपण १९९० ते २००० या दशकातील राजकारण आठवून पाहिले तर राष्ट्रीय राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा होते, हेही आठवेल. वास्तविक १९९६ ते २००४ पर्यंत टीडीपी आणि नायडू हे केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांमध्ये प्रमुख भूमिका बजावत होते. एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या संयुक्त आघाडी सरकारात चंद्राबाबू नायडू हे अत्यंत शक्तिशाली अशा संचालक समितीचे निमंत्रक (कन्व्हेनर) होते. नंतर जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार केंद्रात सत्तेवर आले, तेव्हा टीडीपीने त्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. लोकसभेचे सभापति-पद हे महत्त्वपूर्ण पद टीडीपीने मिळविले होते. नायडू यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने तिस-या आघाडीकडे पाठ फिरवून भाजपला समर्थन देणे राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीनेही धक्कादायक होते. धर्मनिरपेक्षतेची कास पकडणा-या पक्षाने हिंदुत्ववादी पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला कसा पाठिंबा दिला, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेलाही पडला होता. परंतु ‘राजकारण ही शक्यतांची कला आहे,’ असे सांगून नायडू आपल्या मार्गावर अग्रेसर राहिले.

चंद्राबाबू नायडू यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी वायएस राजशेखर रेड्डी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एक संपूर्ण कार्यकाळ नायडू विरोधी पक्षात राहिले. एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत रेड्डी यांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसने ब-याच चुका केल्या आणि चंद्राबाबू नायडू २०१४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री बनले. परंतु २०१९ च्या निवडणुकीत राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या पित्याचा वारसा सांभाळला आणि टीडीपी आणि नायडू यांना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला. नायडू यांनी त्यावेळी काँग्रेसशीही हातमिळवणी केली आणि काँग्रेसविरोधी वातावरणामुळे झालेले नुकसानही त्यांना सोसावे लागले. अशा त-हेने नायडू यांनी देशातील सर्व राजकीय विचारधारांची एक संपूर्ण परिक्रमा केली. संयुक्त आघाडीकडून भाजपकडे आणि तिथून पुढे काँग्रेस आघाडीपर्यंत ती जाऊन पोहोचली.

परंतु विविध विचारधारांशी क्रमश: हातमिळवणी करण्याची किंमतही चंद्राबाबू नायडू यांना मोजावी लागली आणि २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी त्यांना असलेला बहुतांश पाठिंबा गमावला. दिलेल्या आश्वासनांवर ठाम राहण्यात ते अपयशी ठरले. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसने खूप आक्रमक राजकारण केले. परिवर्तनाची हाक देऊन जगनमोहन सत्तेवर आले. त्यांचे वय आणि त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता त्यांचे भवितव्य तुलनेने अधिक उज्ज्वल आहे. त्यांना आणि त्यांच्या वायएसआर काँग्रेसला किती पाठिंबा आहे, हे कप्पम जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नुकतेच दिसून आले. त्यांच्या पक्षाने २५ पैकी १९ वॉर्डांमध्ये विजय मिळवला. विशेष म्हणजे चंद्राबाबू नायडू यांनी याच क्षेत्राचे प्रतिनिधित्व सलग ३० वर्षे केले आहे. टीडीपी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यापुढील प्रमुख संकट विश्वसनीयतेचा अभाव हे आहे.

-प्रा. पोपट नाईकनवरे
राज्यशास्त्र अभ्यासक

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या