27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषजांभळाची पाने व साल फायदे

जांभळाची पाने व साल फायदे

एकमत ऑनलाईन

जांभळाचे फळ रंगाने काळे असले तरी आपल्या निरोगी जीवनासाठी आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे हे फळ आपल्या आरोग्यासाठी एक निसर्गाने दिलेले वरदानच आहे. मुख्य म्हणजे जांभळाचे नुसते फळच नाही तर जांभळाच्या बिया, पाने, फुले, साल हे भाग देखील तितकेच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अगदी प्राचीन काळापासून सुगंधी पाने, गुणकारी बिया, फळे असलेल्या बहुगुणी या वृक्षाचा उपयोग अनेक प्रकारच्या औषधी आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी केला जात असे. जांभळाची पाने, फळे, बिया, मुळे आणि खोड असे सर्व अवयव (भाग) औषधी आहेत. उपयोग : १) डोळ्याचे आजार : लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांना डोळ्यांच्या समस्या असतात. डोळ्यांशी संबंधित अनेक आजार (जसे डोळे लाल होणे, डोळे सुजणे, डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे इत्यादी) असतात. ज्यावर जांभळाची पाने अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी जांभळाची १५ ते २० कोवळी पाने स्वच्छ धुऊन ४०० मिली पाण्यात मंद आचेवर उकळून घ्यावीत. हे द्रावण एक चतुर्थांश शिल्लक राहिल्यानंतर थंड करून गाळून घ्यावे.

या पाण्याने दररोज दोन वेळा काही दिवस डोळे धुवावेत त्यामुळे डोळ्याचे सर्व आजार कमी होऊन आराम मिळतो. २) श्वेतप्रदर : ही समस्या प्रामुख्याने महिलांमध्ये आढळते ज्यामध्ये अंगावरून (योनीमार्गातून) पांढरा स्त्राव बाहेर पडतो. यालाच पांढरे जाणे किंवा पाणी जाणे अथवा श्वेतप्रदर असे म्हणतात. ज्यामुळे डोळे व कंबर दुखणे, चक्कर येणे असे त्रास होऊन अशक्तपणा जाणवतो. त्यासाठी जांभळाची ताजी साल स्वच्छ धुऊन त्याचा काढा तयार करावा. जांभळाच्या सालीमध्ये स्तंभक कार्य करीत असल्यामुळे या आजारावर अत्यंत गुणकारी आहे. ३) दातांच्या समस्या : दात व हिरड्या कमकुवत झाल्या असतील किंवा त्यामधून रक्तस्त्राव होत असल्यास जांभळाच्या सालीच्या रसाने गुळण्या कराव्यात. जांभळाच्या सालीमध्ये जीवनसत्व-क मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे आपल्या शरीराची (दातांची व हिरड्याची) रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यासाठी जांभळाची ताजी साल स्वच्छ धुऊन बारीक वाटून त्याचा काढा तयार करावा. हा काढा सकाळ-संध्याकाळ २० मिलीप्रमाणे सेवन केल्यास आराम मिळतो. ४) त्वचेचे आजार : त्वचेचे विविध आजार बरे करण्यासाठी जांभळाची साल अत्यंत गुणकारी औषधी आहे.

त्यासाठी ताजी साल बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा. हा स्वरस १० ते १५ मिली घेतल्याने आपल्या शरीरातील रक्त शुध्द होऊन त्वचारोग दूर होतात. तसेच हा रस त्वचेवर लावून हलक्या हाताने चोळावा त्यामुळेही त्वचेचे आजार लवकर बरे होतात. कारण जांभळाच्या सालीमध्ये रक्त शुध्द करण्याचे गुणधर्म आहेत. ५) दातांची मजबुती : जांभळाच्या पानामध्ये जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारे दात मजबूत करणारे गुणधर्म आहेत. त्यासाठी जांभळाची पाने बारीक चावून हळूहळू खावीत व त्याचा चोथा थुंकून टाकावा. तसेच जांभळाच्या पानाचे भस्म तयार करावे व या भस्माने दात व हिरड्या घासाव्यात त्यामुळे दात व हिरड्या मजबूत होण्यास फायदा होतो. ६) तोंडातील व्रण : अनेक वेळा आहारात बदल झाल्यामुळे अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन तोंडात लाल चट्टे (अल्सर) होतात. यासाठी जांभळाची पाने अत्यंत उपयुक्त आहेत. त्यासाठी जांभळाची पाने बारीक वाटून त्याचा लगदा तयार करावा. हा तयार केलेला लगदा तोंडातील फोडावर लावून थोड्या वेळाने पानाच्या रसाने गुळण्या कराव्यात त्यामुळे अल्सर कमी होऊन आराम मिळतो. ७) अतिसार : पोटात येणारा मुरडा आणि अतिसारावर जांभळाची साल अत्यंत फायदेशीर आहे. त्यासाठी जांभळाची ताजी साल पाण्यामध्ये मंद आचेवर एक चतुर्थांश होईपर्यंत उकळून त्याचा काढा तयार करावा. थंड झाल्यावर धने व जिरे पूड टाकून एक कपभर याप्रमाणे सकाळ-संध्याकाळ सेवन करावा. यामुळे पोटात येणारी कळ थांबून जुलाब लवकर कमी होण्यास मदत होते.

तसेच वारंवार जुलाब होत असल्यास जांभळाच्या पानाचा ५ ते १० मिली रस शेळीच्या १०० मिली दुधात मिसळून घेतल्यास लाभदायक असते. ८) आम्लपित्त : ब-याच वेळा आपल्या जठरामध्ये आंबट द्रव (आम्ल) जास्त तयार होतो ज्यामुळे पोटात जळजळ होणे, तोंडात आंबट पाणी येणे अशा समस्या निर्माण होतात. त्यासाठी जांभळाच्या पानाचा रस अत्यंत उपयोगी आहे. त्यासाठी जांभळाच्या पानाचा रस व गूळ समप्रमाणात एकत्र मिसळून एका भांड्यामध्ये ठेवावा. या भांड्याला कापडाचे झाकण लावून ४ ते ५ दिवस उन्हात ठेवावे. त्यानंतर तयार झालेला रस दोन चमचे रोज सकाळ-संध्याकाळ नियमितपणे काही दिवस घेतल्यास आराम मिळतो. ९) मुतखडा : मुत्राशयात झालेले खडे विरघळण्यासाठी जांभळाची कोवळी पाने अत्यंत गुणकारी आहेत. त्यासाठी १० ते १५ ग्रॅम जांभळाची कोवळी पाने बारीक वाटून त्याचा लगदा तयार करावा. यामध्ये २ ते ३ काळी मिरी पावडर मिसळून त्याच्या लहान-लहान गोळ्या कराव्यात. या २ गोळ्या सकाळ-संध्याकाळ काही दिवस सेवन केल्याने खडे विरघळून लघवीद्वारे बाहेर पडतात. १०) त्वचेवरील डाग : अनेक वेळा भाजल्यामुळे त्वचेवर त्याचे काळे डाग दिसतात. त्यासाठी जांभळाची पाने बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करावी.

या तयार केलेल्या पेस्टचा प्रभावित भागावर नियमितपणे काही दिवस लेप लावावा. त्यामुळे भाजलेल्या खुणा किंवा काळे डाग कमी होऊन त्वचा सुंदर दिसते. ११) खाज : ब-याच वेळा त्वचेवर जीवाणू/ विषाणू/ बुरशीचा संसर्ग झाल्यामुळे खाज सुटते व वेदना होतात. जांभळाच्या सालीमध्ये तुरट गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचारोग दूर होतात. तसेच सालीमध्ये रक्त शुध्द करण्याचे गुणधर्म असल्याने रक्त शुध्द होण्यास मदत होते. १२) गर्भपात : जांभळाच्या पानामध्ये स्तंभक तत्त्व असल्यामुळे गर्भपात होण्यास प्रतिबंध केला जातो. त्यासाठी एखाद्या महिलेचा पुन्हा-पुन्हा गर्भपात होत असल्यास त्या महिलेला जांभळाच्या पानांचा रस फायद्याचा आहे. त्यासाठी जांभळाची कोवळी पाने घेऊन बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा. त्यामुळे जीवनसत्व-ई चा पुरवठा होतो व त्यामुळे प्रोजेस्टेरॉन या हार्मोन निर्मितीला चालना मिळते. ज्यामुळे गर्भपात निसर्गत: रोखला जातो व गर्भपाताची समस्या कमी होतो. १३) संधिवात : या आजारामध्ये सांध्यांना सूज येऊन तीव्र वेदना होतात. वाढत्या वयाबरोबर हा आजार होतो यासाठी जांभळाची साल अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी जांभळाची साल (ताजी) कमी पाण्यामध्ये मंद आचेवर उकळून त्याचा लगदा तयार करावा. हा लगदा थोडा गरम असतानाच त्याचा लेप प्रभावित भागावर द्यावा.

असे वारंवार केल्याने वेदना कमी होऊन आराम मिळतो.
१४) रक्त पित्त : अनेक वेळा नाक, कान किंवा इतर अवयवातून रक्त बाहेर पडते या रक्तस्त्राव समस्येला रक्तपित्त असेही म्हणतात. त्यासाठी जांभळाची ताजी पाने स्वच्छ धुऊन त्याचा स्वरस तयार करावा. हा तयार केलेला स्वरस ५ ते १० मिली याप्रमाणे दररोज नियमितपणे सकाळ, दुपार-संध्याकाळ जेवणापूर्वी सेवन केल्यास फायदेशीर होते. १५) प्राण्याचा चावा (दंश) : ब-याच वेळा विषारी प्राण्याने चावा घेतल्याने जिवाला धोका निर्माण होतो. यावर जांभळाची पाने अत्यंत उपयुक्त आहेत. त्यासाठी जांभळाची पाने पाण्यामध्ये बारीक वाटून घ्यावीत. हे तयार केलेले मिश्रण वस्त्रगाळ करून त्याचा रस १० मिली याप्रमाणे रुग्णाला दररोज तीन वेळा द्यावा तसेच त्याचा लगदा प्रभावित भागावर लावल्यास फायदा होतो. १६) लहान मुलांचे जुलाब : ब-याच वेळा लहान मुलांच्या खाण्यामध्ये बदल झाल्यामुळे जुलाबाची समस्या निर्माण होते. त्यासाठी जांभळाची साल अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी जांभळाची साल बारीक वाटून त्याचे चार थेंब एक चमचा दुधामध्ये मिसळून दिल्यास जुलाब थांबण्यास मदत होते. मात्र यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा. १७) श्वासाची दुर्गंधी : तोंडात हानीकारक जंतूंची जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे दुर्गंधी येते. त्यामुळे जवळच्या माणसांना व स्वत:लाही त्रास होतो. त्यासाठी जांभळाची पाने अत्यंत उपयोगी आहेत. त्यासाठी जांभळाची ताजी पाने स्वच्छ धुऊन व चावूनचावून त्याचा रस चोळावा त्यामुळे तोंडातील हानिकारक जंतू नष्ट होऊन तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. टीप : वनौषधींचा वापर करताना आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या