लातूर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी मा. बी. पी. पृथ्वीराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के आणि शासन नियुक्त संपादक मंडळाने संपादित केलेली ‘वैभवशाली लातूर’ जिल्हा पर्यटन पुस्तिका नुकतीच पाहण्यात आली. अर्थात ही कॉफी टेबल पुस्तिका आहे. आजपर्यंत पाहण्यात आलेली सर्वांत देखणी आणि मोहित करणारी पुस्तिका आहे हे मान्य करताना कोणताच संकोच वाटत नाही. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ पाहतानाच संपादक मंडळाची सौंदर्यदृष्टी आणि कल्पकता डोकावून जाते आणि पुस्तिका हाती घेऊन पूर्णपणे चाळण्याचा मोह अनावर झाल्याखेरीज राहत नाही. अंतरंगात ज्या बाबींचा समावेश आहे त्यातील प्रमुख आणि महत्वाच्या बाबी फुलाच्या स्वरूपात मुखपृष्ठावर आणलेल्या आहेत आणि पुस्तिकेच्या मुखपृष्ठासाठी ज्या कॉफी रंगाची योजना केलेली आहे त्यावर ते फूल अधिकच आकर्षकपणे उठाव घेत आहे. ‘वैभवशाली लातूर’ या नावासाठी वैभवाचे प्रतीक असलेल्या सोनेरी रंगाचा केलेला वापर संपादक मंडळाची समयसूचकता आणि कल्पकता दर्शवतो.
शासनाने अत्यंत दूरदृष्टीने पुस्तिका संंपादनाचा घेतलेला निर्णय आहे आणि त्याची पूर्तता करणारी ही पुस्तिका आहे याची जाणीव होते. संपादक मंडळाचे सचिव या नात्याने जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी आपल्या मनोगतात पुस्तिका संपादनाचा सर्व प्रवास सहजतेने उलगडला आहे. वैभवशाली लातूर या जिल्हा पर्यटन पुस्तिकेची मांडणी मुख्य एकोणीस भागात केलेली असून प्रत्येक मुख्य भागाची विभागणी किमान दोन ते तेरा उपविभागामधून झालेली दिसून येते. सर्वस्पर्शी आणि सर्व विषयांना न्याय देणारे उपविभाग दिसून येतात. संपादक मंडळाने अभ्यासपूर्वक विभागणी करताना प्रत्येक विभागासाठी आकर्षक शीर्षकं दिलेली आहेत हे विशेष. चला निसर्गाच्या सानिध्यात, जलसंपत्ती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, इतिहासाच्या पाऊलखुणा, मुशाफिरी ऐतिहासिक स्थळांची, मंदिराच्या प्रांगणात, कलाविष्कार, हरितक्रांती, पशूवैभव, उष:काल होता होता, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटल्या मशाली, ममतेचं अंगण, वाहतुकीचे जाळे ही काही वाणगीदाखल बोलकी शीर्षके सांगता येतील.
लातूर जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणा-या सर्व क्षेत्रातील सर्व विषयांना संपादक मंडळाने निश्चितच न्याय दिलेला आहे.अर्धशतकापेक्षा अधिक कालावधी या जिल्ह्यात वास्तव्य असून देखील ज्या बाबी अपरिचित होत्या त्या बाबींची सविस्तर माहिती ही पुस्तिका वाचताना आणि पाहताना मिळाली. पुस्तिका निर्मिती करताना कोणत्याच बाबतीत तडजोड केलेली नाही हे प्रामुख्याने निदर्शनास आले. मजबूत बांधणी, दर्जेदार कागद, छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांना न्याय देऊन बोलकी करणारी छपाई ही या पुस्तिकेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.
लातूर जिल्ह्यातील १९९३ साली झालेला प्रलयंकारी भूकंप लातूर जिल्ह्यातील नागरिकांना विसरणे शक्य नाही. त्यासाठीचे दोन भाग खूपच प्रभावित करून गेले. भूकंपामुळे झालेली उद्ध्वस्तता दाखविणा-या भागासाठी रंगीत छपाई शक्य असताना देखील कृष्णधवल छायाचित्रे जाणीवपूर्वक वापरलेली दिसून येतात. या भागासाठी वापरलेले शीर्षक देखील ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’ हे अत्यंत समर्पक योजले आहे. या काळरात्रीतून सावरून नव्या दिमाखात भूकंपग्रस्त भाग पुन्हा उभा राहिला हे पुढील भागात छान पद्धतीने दाखविण्यात आले आहे आणि त्यासाठी ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटल्या मशाली’ हे शीर्षक देखील लातूरकरांची दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवून देणारे आणि लातूरचा बाणा दाखविणारे आहे असे वाटते.
व्यावसायिक जरी असतील तरी या पुस्तिकेतील छायाचित्रांसाठी छायाचित्रकारांनी घेतलेली मेहनत दुर्लक्षून चालणार नाही. प्रत्येक छायाचित्राला त्यांनी बोलके आणि जिवंत केलेले असून सर्व कसब पणाला लावले आहे याची जाणीव होते.
संपादक मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, गणेश महाडिक, प्रभारी उपसंचालक (माहिती)आणि सदस्य सचिव अशा दुहेरी भूमिका बजावणारे सुनील सोनटक्के यांचे मनस्वी अभिनंदन… महाराष्ट्र शासनाच्या वतीने या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी अशासकीय सदस्य म्हणून संपादक मंडळावर ज्यांची इतिहास संशोधक म्हणून नियुक्ती करण्यात आली ते विवेक सौताडेकर आणि डॉ. सुनील पुरी या उभयतांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे असून ही पुस्तिका संदर्भ ग्रंथ ठरण्यासाठी यांचे योगदान मोलाचे ठरते. त्यांनी संपादक मंडळावर काम करण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने केले आहे, उभयतांचे अभिनंदन!
४ बालाजी मा. जाधव, उजेडकर
मोबा.: ९७६७७ ०९२१३