आजही अनेक ज्येष्ठ नागरिक डिजिटल विश्वापासून दूर आहेत, हे चिंताजनक आहे. या गैरसोयीमुळे एका क्लिक्वर उपलब्ध असलेल्या सेवासुविधा त्यांना मिळू शकत नाहीत. डिजिटल इक्विटी फॉर ऑल एज ही संकल्पना वडीलधा-यांच्या जगात मोठा बदल घडवू शकते. ज्येष्ठांना तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि त्याचा योग्य वापर करायला शिकविणे ही जीवनाच्या या टप्प्यावरही ज्येष्ठांची गरज बनली आहे.
अलीकडील वर्षांत वृद्ध लोक त्यांच्या प्रियजनांकडून होणा-या उपेक्षेचे बळी ठरत आहेत. हे केवळ बदलत्या सामाजिक-कौटुंबिक परिस्थितीचेच नव्हे तर वैचारिक संवेदनशीलतेतील बदलाचे कठोर वास्तव आहे. आपल्याच कुटुंबातील सदस्यांमध्ये ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करण्याची भावना झपाट्याने वाढू लागली आहे, हे कटू सत्य आहे. आपल्याकडे कुटुंबाशी तरुण पिढीचे जोडलेले असणे आणि तिच्यातील जबाबदारीची भावना हेच वृद्धांच्या सुरक्षिततेचे आणि ताकदीचे द्योतक असायचे. अशा स्थितीत एकाकपणा आणि नैराश्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता हाही चिंतेचा विषय बनला आहे. या आघाडीवर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वृद्धांना होणारा त्रास कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाला आपला साथीदार बनविण्यावर भर देण्यात येत आहे.
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाने सर्व वयोगटातील लोकांचे जीवन सोपे केले आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. घरातील वृद्ध सदस्यांचे जीवन सुस करण्यासाठी, त्यांना महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी आणि प्रियजनांशी कायम संवाद ठेवण्यासाठी वृद्ध पिढीही डिजिटल युगाशी कनेक्ट होणे आवश्यक आहे. कोरोना संकटात एकटे राहणा-या वृद्धांना दूरवर राहणा-या मुलांशी संपर्क साधण्यासाठी, दैनंदिन गरजेच्या वस्तू मागविण्यासाठी आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरल्याचेही दिसून येत आहे. शेजा-यांची मदत घेण्याची, तुमच्या प्रियजनांशी संवाद साधण्याची किंवा फक्त एका क्लिकवर घरबसल्या औषधे मिळविण्याची मुभा देणा-या तांत्रिक सुविधांमुळे अनेक वृद्धांचे प्राण वाचले आहेत आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील त्रास दूर झाला आहे. एवढेच नव्हे तर त्यांना एकटेपणापासून वाचविण्यात यश आले आहे. डिजिटल जगातील साधने ज्येष्ठांसाठी अनेक बाबतीत उपयुक्त ठरत आहेत.
अशा परिस्थितीत सध्याच्या काळातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन, २०२२ या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय वृद्ध अत्याचार जागरूकता दिनाची थीम सर्व वयोगटांसाठी डिजिटल इक्विटी अशी ठेवण्यात आली आहे, हे खूप अर्थपूर्ण आहे. हे तंत्रज्ञान कसे वापरायचे हे शिकणे आणि डिजिटल युगात वृद्धांचा सहभाग वाढविणे याबाबत ही थीम आहे. भारताच्या संदर्भात हे खरोखर महत्त्वाचे आहे, कारण आजही वृद्ध लोक डिजिटल तंत्रज्ञानाचा खुलेपणाने वापर करणे शिकू शकलेले नाहीत. खेड्यांपासून शहरांपर्यंत अगदी महानगरापर्यंत असे अनेक ज्येष्ठ आहेत ज्यांना माहिती आणि जागरूकतेच्या अभावामुळे स्मार्ट गॅजेट्स वापरता येत नाहीत. त्यांना मिळणा-या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणूनच या विशेष दिवसासाठी संयुक्त राष्ट्रांनी निवडलेली थीम वृद्ध व्यक्तंना मोबाइल फोन, इंटरनेट आणि संगणकाच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्याशी संबंधित आहे. वयाच्या या टप्प्यावर त्यांच्या गरजा आणि आवडीनुसार त्यांना तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित केले पाहिजे, जेणेकरून वृद्धांना त्यांच्या वास्तविक जीवनातील एकटेपणा आभासी जगातील सोयींनी भरून काढता येईल. तांत्रिक माध्यमांद्वारे त्यांचे जीवन सुखकर आणि सोयीस्कर बनवता येईल, असा संदेश देण्यात आला आहे. ज्या देशात ज्येष्ठांचा आश्रय मिळाल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तला सुरक्षित वाटत असे, त्याच समाजात आज ज्येष्ठ नागरिक एकाक आणि असुरक्षित आहेत, हीच मोठी शोकांतिका आहे. ज्येष्ठ आज इतके एकाक आहेत की, अनेकदा त्यांच्या जाण्याची बातमीही काही महिन्यांनी मिळते.
शरीर आणि मन थकण्याच्या वयात एकटे राहणा-या वृद्धांना वेळेवर उपचार आणि वैद्यकीय मदतही मिळत नाही. जमीन, संपत्ती घेतल्यानंतर मुले, नातेवाईक त्यांच्यापासून दूर जातात हे दु:खद आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाने दिलेल्या सुविधेमुळे त्यांचे जीवन ब-याच अंशी सुखकर होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचे शोषण आणि छळापासून संरक्षण करण्यातही मदत होते, असे म्हटल्यास चुकचे ठरणार नाही. जे वडील घराबाहेर पडू शकत नाहीत ते फोन, इमेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रशासकय कर्मचा-यांना त्यांच्या परिस्थितीविषयी माहिती देऊ शकतात. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, गेल्या वर्षी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या जगातील सर्वांत मोठ्या सर्वेक्षणात म्हणजेच लॉन्गिट्यूडिनल एजिंग स्टडी इन इंडिया या सर्वेक्षणात जे खुलासे झाले होते ते देशातील वृद्धांच्या आरोग्याबाबत भीषण परिस्थिती दाखवून देणारे आहेत. म्हातारपणामुळे येणा-या शारीरिक समस्याच नव्हे तर वीस टक्क्यांहून अधिक वृद्धांना मानसिक आरोग्याशी संबंधित काही समस्यांनी ग्रासले आहे. ही बाब चिंताजनक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, २०३० पर्यंत जागतिक स्तरावर वृद्ध लोकांची संख्या १.४ अब्ज होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठांची काळजी आणि सेवांशी संबंधित इतर बाबींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून तंत्रज्ञानदेखील वृद्धापकाळासाठी एक आधार बनू शकते.
डिजिटलायझेशनने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवे रंग भरले असताना ज्येष्ठांनी डिजिटल जगाशी जोडले जाणे गरजेचे झाले आहे, हेही विचारात घेण्यासारखे आहे. डिजिटल सुविधांचा मुक्तपणे वापर करण्यास शिकल्याने त्यांचे जीवन प्रत्येक आघाडीवर सोपे होऊ शकते. यासोबतच व्हर्च्युअल विंडोच्या माध्यमातून जगाला जोडणा-या वृद्ध व्यक्तंमध्येही आपला सहभाग ते नोंदवू शकतात. आजही मोठ्या संख्येने वृद्ध लोकांचे डिजिटल जगापासून वेगळे असणे चिंताजनक आहे. या गैरसोयीमुळे ते क्लिकवर उपलब्ध असलेली वैशिष्ट्ये आणि सेवा वापरण्यापासून पूर्णपणे दूर राहतात. डिजिटल इक्विटी फॉर ऑल एज ही संकल्पना वडीलधा-यांच्या जगात मोठा बदल घडवू शकते. ज्येष्ठांना तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि त्याचा योग्य वापर करायला शिकवणे ही जीवनाच्या या टप्प्यावरही गरज बनली आहे. म्हणजेच प्रत्येक बाबतीत आवश्यक गोष्टी आणि सुविधांपर्यंत पोहोचणे आणि दूरच्या लोकांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देणे आदी बाबींमध्ये डिजिटल विश्व ज्येष्ठांना सहाय्यभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी स्वत:ला डिजिटल विश्वाशी जोडून घेतले तर त्यांचे शोषण आणि दुर्लक्ष यापासून संरक्षण होऊ शकेल.
-महेश कोळी,
संगणक अभियंता