21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeविशेष‘ट्विटर’ची चिमणी पुन्हा घरट्यात

‘ट्विटर’ची चिमणी पुन्हा घरट्यात

एकमत ऑनलाईन

जगप्रसिद्ध अब्जाधीश एलन मस्क याने ‘ट्विटर’ या बहुलोकप्रिय सोशल नेटवर्किंग कंपनीची खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा ज्याप्रकारे जगाला आश्चर्याचा धक्का बसला होता, तसाच धक्का देत त्याने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेऊन दिला आहे. यामागचे कारण सांगताना मस्कने ट्विटरकडून बनावट खात्यांच्या संख्येविषयीची खरी माहिती दिली गेली नसल्याचे म्हटले आहे. ही संख्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, अशी अट मस्कने घातली होती. पण आता ट्विटरवरील सुमारे २२९ दशलक्ष खात्यांपैकी २० टक्के खाती बनावट असल्याचा दावा आता मस्ककडून करण्यात आला आहे. या करारनाट्याच्या अंतरंगाचा वेध घेणारा लेख…

नवसमाजमाध्यमांच्या विश्वातील आघाडीची कंपनी असणा-या ‘ट्विटर’ची तब्बल ४४ अब्ज डॉलर्सना खरेदी करण्याचा निर्णय जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी घेतला होता. यासंदर्भातील कराराचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अर्थातच संपूर्ण जगाच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण त्यावेळी ट्विटर इन्कॉर्पोरेटचे भागभांडवल सुमारे २८ अब्ज असल्याचे समोर आले होते. साहजिकच, दीडपट अधिक रक्कम मोजून पब्लिक लिमिटेड कंपनीची मालकी मिळवण्याचा मस्क यांचा निर्णय हा अचंबित करणारा वाटणे स्वाभाविक होते. अर्थात एलन मस्क हा नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यांनी किंवा मार्गांनी जगाला आश्चर्याचे धक्के देण्याचा प्रयत्न करत असतो. पण संपूर्ण जगभरात वापरल्या जाणा-या सोशल मीडियामध्ये ‘ट्विटर’ची असणारी लोकप्रियता आणि राजकारण, समाजकारणामध्ये प्रभाव टाकण्याची या समाज माध्यमाची क्षमता यांमुळे या सौद्याकडे अनेक दृष्टिकोनातून पाहिले गेले.

ट्विटरवरील अकाऊंटची संख्या अन्य माध्यमांच्या तुलनेत कमी असली तरी अकाऊंटधारकांमध्ये राष्ट्रप्रमुख, राजकीय नेते, खेळाडू, सेलिब्रिटी आदींचा समावेश आहे. म्हणजेच, लोकांवर प्रभाव टाकू शकणा-या व्यक्ती ट्विटरच्या अकाऊंटधारक आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मस्कने ट्विटरमधील ९.२ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ‘ट्विटर’मध्ये तो एक महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र १३ एप्रिल रोजी त्याने ४.२ डॉलर प्रति समभाग या दराने ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर खरेदीची योजना मांडली आणि ट्विटरकडूनही या प्रस्तावाला संमती देण्यात आली होती. त्यानंतर मस्कने ट्विटरच्या सर्व कर्मचा-यांशी संवाद देखील साधला होता. येत्या काही महिन्यांत हा करार पूर्णत्वाला जाईल असे वाटत असतानाच एलन मस्क यांनी हा सौदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुळात या खरेदीच्या सौद्याची घोषणा करताना मस्कने ‘ट्विटर हे निष्पक्ष माध्यम राहिले पाहिजे’ असे म्हटले होते. त्याचबरोबर मानवजातीचे भवितव्य यावर अवलंबून असून ते टिकवले नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थाच धोक्यात येईल असे म्हटले होते. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी ज्याप्रकारे हे माध्यम वापरले आणि वाकवले जाते ते पाहता त्यामध्ये अनेक गोष्टी खटकणा-या किंवा आक्षेपार्ह आहेत, हेही नाकारता येणार नाही. मुख्यत: त्यामध्ये जो त्रयस्थपणा असणे आवश्यक आहे तो दिसून येत नाही. सर्वसामान्यपणे कुणीही ते मॅन्युप्युलेट करू शकेल अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये आढळतात. अर्थात, मस्कची यामागची खरी भूमिका काय होती, ते कुणीच सांगू शकणार नाही.

कारण मागील काळात खुद्द मस्कने याच ट्विटरचा वापर करत चित्रविचित्र गोष्टी केलेल्या आहेत. उदाहरणच द्यायचे झाल्यास, बिटकॉईनसंदर्भात उलटसुलट भाष्य करणा-या मस्कच्या एका ट्विटने या आभासी चलनाची किंमत १०-१५ टक्क्यांनी वधारलेली किंवा घसरलेली जगाने पाहिली आहे. त्यामुळे ‘ट्विटर’ खरेदीसाठी त्याने व्यक्त केलेला उद्देश हा कितपत खरा मानायचा असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते. त्याची भूमिका त्याच्या वागण्या-बोलण्याशी सुसंगत किंवा साजेशी असते का असाही प्रश्न पडतो. मस्कने ‘ट्विटर’ विकत घेताना घातलेल्या काही अटींपैकी एक महत्त्वाची अट होती ती म्हणजे या समाजमाध्यमावर पाच टक्क्यांपेक्षा अधिक बॉटस् असता कामा नयेत. बॉटस् म्हणजे फेक किंवा बनावट अकाऊंटस्वरून स्वयंचलितरीत्या उलटसुलट ट्विट्स करणे, ठराविक पोस्टना लाईक करत राहणे किंवा त्या रीट्विट करत राहणे अशा प्रकारचे प्रोग्रॅमिंग. अशा प्रकारचे बॉटस् ट्विटरच्या एकूण युजर्सच्या संख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी असावेत आणि त्याबाबतचे पुरावे ट्विटरने दिले पाहिजेत, असा मस्कचा आग्रह होता. परंतु ट्विटरकडून ते पुरावे सादर केले गेले नाहीत.

उलट ट्विटरच्या सुमारे २२९ दशलक्ष खात्यांपैकी २० टक्के खाती बनावट असल्याचा दावा आता मस्ककडून करण्यात आला आहे. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे (एसईसी) दाखल केलेल्या एका पत्रात हा करार रद्द करण्याचे कारण नमूद करताना मस्कने या करारावेळी खोटी आणि भ्रामक माहिती दिली गेल्याचे म्हटले आहे. मे महिन्यामध्येही त्याने ट्विटरकडून बनावट खात्यांविषयीची माहिती दिली गेली नसल्याचे सांगतानाच जोपर्यंत ही माहिती मिळत नाही तोपर्यंत हा करार पूर्णत्वाला जाऊ शकणार नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात एक गोष्ट सर्वश्रुत आहे ती म्हणजे ट्विटरवरील बनावट खात्यांचा आकडा हा पाच टक्क्यांपेक्षा निश्चितच जास्त आहे. कदाचित मस्कलाही याची पूर्वीपासून कल्पना असावी आणि त्यामुळेच त्याने हा प्रस्ताव दिलेला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण येनकेन प्रकारेण जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणूनही याकडे पाहिल्यास ते गैर ठरणार नाही.

आणखी एक मुद्दा म्हणजे, एखादी ट्विट जास्तीत जास्त लोकप्रिय होत जाते किंवा ठराविक अकाऊंटस्ना ट्विटर प्रोत्साहित करत जाते किंवा काही अकाऊंटस्वर ट्विटरकडून बंदी घातली जाते या सर्वांसाठीचे अल्गोरिदम किंवा सॉफ्टवेअर्स कसे काम करतात हे ट्विटरने जगजाहीर केले पाहिजे, अशी मस्कची मागणी होती. थोडक्यात, ओपन सोर्स सॉफ्टवेअरप्रमाणे ट्विटरने याचा सर्व तपशील लोकांपुढे मांडला पाहिजे, कारण त्यातून लोकांच्या मनातील शंका दूर होतील असे त्याचे म्हणणे होते. ट्विटरसंदर्भात वाढत जाणारे गैरसमज किंवा शंका-कुशंकांच्या पार्श्वभूमीवर पाहता त्याची मागणी योग्यच होती; परंतु व्यवहार्यदृष्ट्या तसे करता येणे शक्य नव्हते. कारण ही सर्व माहिती जगजाहीर केल्यास ट्विटरचा व्यवसाय करण्याचा ‘यूएसपी’ किंवा वेगळेपणच उरणार नाही. इतर कंपन्याही त्याचा वापर करू शकतील. त्यामुळे हा करार पूर्णत्वाला न जाण्यामध्ये या मुद्याचाही समावेश असू शकतो. ट्विटरचा इतिहास पाहिल्यास अत्यंत नाट्यमय कलाटण्या आणि कॉर्पोरेट जगातल्या चक्रावून टाकणा-या उलथापालथी त्यात आहेत. तसेच एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात ट्विटरच्या संस्थापकांनी रचलेल्या चालीही त्यात आहेत. इव्हान विल्यम ऊर्फ इव्ह, नोआ ग्लास, जॅक डॉर्सी आणि ख्रिस्तोफर ऊर्फ बिझ स्टोन हे चार जण ट्विटरचे संस्थापक आहेत. यापैकी जॅक डॉर्सीने अलीकडेच निवृत्ती घेतली आणि भारताच्या पराग अग्रवाल याची ट्विटरचा सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यामुळे ‘ट्विटर’चा एकंदर प्रवास हा काहीसा वादळीच राहिला आहे.

दुसरीकडे एलन मस्कही अशा वादळी भूमिकांमुळेच अधिक चर्चिले जातात. म्हणूनच या प्रकरणामध्ये दोघांपैकी चूक कोणाची याबाबत मतमतांतरे दिसून येतात. कायद्याच्या चौकटीतून विचार करता ट्विटरने अटींची पूर्तता न केल्यामुळे हा करार रद्द केल्याचे खापर मस्कवरच फुटण्याच्या शक्यता दिसत नाहीत. दुसरीकडे येत्या काळात ट्विटरने मस्क यांनी घातलेल्या अटींची पूर्तता करण्याची तयारी दर्शवल्यास या कराराचे काय होईल हे पहावे लागेल. शेवटी या सर्वाचे सार काढायचे झाल्यास सोशल मीडियाचा वाढलेला प्रसार आणि व्याप्ती पाहून त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज सर्वांनाच जाणवू लागली आहे. काही जण ती जाहीरपणाने व्यक्त करताना दिसतात; तर काही जण व्यक्त न करता अप्रत्यक्ष मार्गाने तसे प्रयत्न करताना दिसतात. असाच एक डाव आजमावून पाहण्याची इच्छा जगातील अब्जाधीशाला झाल्यास त्यात नवल काहीच नाही.

-अतुल कहाते,
प्रख्यात आयटीतज्ज्ञ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या