29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeविशेषडोंगरी भागातील मानवतेचा झरा

डोंगरी भागातील मानवतेचा झरा

एकमत ऑनलाईन

कारगिल हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्याला भारतीय जवानांच्या कडव्या संग्रामाची आणि अतुलनीय पराक्रमाची आठवण येते. त्याचप्रमाणे तेथील अवघड कडेही आठवतात. परंतु या सर्वांपलीकडे निखळ मानवताही या दुर्गम खो-यात वसते, हे ब-याच जणांना ठाऊक नसेल. या मानवतेच्या अनेक गाथा येथील कडेकपा-यांमध्ये कोरल्या गेल्या आहेत. स्टँजिन सेल्डन या पंचविशीतल्या तरुणीची कथा अशीच सर्वांसाठी प्रेरक आहे. १९८७ मध्ये सेल्डनचा जन्म एका बौद्ध कुटुंबात झाला. इतर समाजांमध्ये ज्याप्रमाणे मुलींच्या करिअरचे स्टिअरिंग तिच्या कुटुंबीयांच्या हातात असते, तसेच सेल्डनच्या बाबतीत घडले. मुलींना एक तर शिक्षिका बनण्यास प्रवृत्त केले जाते किंवा डॉक्टर. तसेच सल्ले त्यांना वारंवार दिले गेल्यामुळे आपला रस कशात आहे, हेच अनेक मुलींना कळेनासे होते. सेल्डन ही खूप हुशार विद्यार्थिनी. डॉक्टरांविषयी समाजात सन्मानाची भावना असते, हे ती लहानपणापासून आजूबाजूला पाहत होती. म्हणूनच तिने वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

२००७ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जम्मू येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तिला प्रवेशही मिळाला. परंतु सेल्डनला वर्षभरात वेगळेच काहीतरी वाटू लागले. सातत्याने तिला असे वाटू लागले, की आपण या क्षेत्रात खुश नाही. आपण डॉक्टर बनलोच तरी आपण या पेशाला न्याय देऊ शकू का? आपले सर्वोत्तम प्रयत्न देऊ शकू का, असे प्रश्न तिच्या मनात येऊ लागले. या विचारांमधून अखेर ती जम्मू-काश्मीरमधील सार्वजनिक आरोग्य सेवेत गुंतलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे ओढली गेली. त्याचबरोबर एक क्षण असा आला की, वैद्यकीय क्षेत्रातच राहायचे की अन्य क्षेत्रात जायचे, याचा निर्णय घ्यावा असे तिला वाटले. जीवनाचा नवा अर्थ ती शोधू पाहत होती. या टप्प्यावर तरी हा निर्णय घेणे सोपे अजिबात नव्हते. वैद्यकीय शिक्षण जवळजवळ निम्मे पूर्ण झाले होते. हे क्षेत्र सोडून अन्य क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय कुटुंबात कुणाला रुचणार नाही, हेही तिला ठाऊक होते.

परंतु तिने तिच्या मनाचे ऐकले. वैद्यकीय क्षेत्र सोडून सामाजिक क्षेत्रात जाण्याचा धाडसी निर्णय तिने अखेर घेतलाच. या निर्णयामुळे कुटुंबातील सर्वांना प्रचंड दु:ख झाले. शेजारीपाजारी आणि ओळखीच्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु कुणी काही म्हणाले तरी तिने तिच्या अंतरात्म्याला स्मरून निर्णय घेतला होता; त्यामुळे तिला पश्चात्ताप वगैरे अजिबात झाला नाही. तिने थेट अमेरिकन इंडिया फाऊंडेशन फेलोशिपसाठी अर्ज केला. विद्यावेतन मिळण्यास ती पात्र ठरली आणि त्या माध्यमातून तिने कर्नाटकमधील मुलींसाठी काम केले. मुलींचे आरोग्य आणि आरोग्यविषयक शिक्षण यावर तिचा भर होता. सुमारे १४ वर्षे तिथे काम केल्यानंतर सामाजिक क्षेत्रात पुढे कसे जायचे, याचा भरपूर अनुभव तिने गाठीशी बांधला. जम्मू-काश्मीर आणि लडाख-कारगिल या भागात आरोग्य शिक्षणाविषयी कार्य करणा-या सामाजिक संस्थांशी ती संबंधित होतीच. तिची कामाची ओढ पाहून एका संस्थेने २०१५ मध्ये तिच्याकडे द्रास येथील एका हायस्कूलमध्ये आरोग्य शिक्षणाची जबाबदारी सोपविली. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला. तिने या निधीतून मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधून घेतली. विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

कारगिल हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम भाग. त्यामुळे तेथील लोकांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही आणि त्यामुळे करिअरही घडवता येत नाही. परंतु त्याचबरोबर या लोकांमध्ये स्वच्छताविषयक सवयींचा अभाव असल्याचेही सेल्डनला चांगलेच ठाऊक होते. नोकरी आवडत्या क्षेत्रात होती; त्यामुळे आव्हाने ही तिला संकटे वाटली नाहीत. उलट लढण्यासाठी तिच्यात उत्साह संचारला. तिने आणि तिच्या मित्रमंडळींनी या भागात ‘आर जाम्बा’ या संस्थेची उभारणी केली. २०१६ मध्ये सेल्डनने चाकोरीबाहेरील आणखी एक पाऊल उचलले. ती ज्याच्यावर प्रेम करत होती, तो बौद्ध नसून मुस्लिम होता. मूर्तझा आगा हे त्याचे नाव. तिने त्याच्याशी लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण लडाख-कारगिल परिसरात खळबळ उडाली. सेल्डनला जिवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या. पतीसह भूमिगत होण्याची वेळ तिच्यावर आली. स्थानिक बौद्ध संघटनेने लडाख भागातील मुस्लिमांना धमकी दिली, की एक तर सेल्डनला आमच्या स्वाधीन करा किंवा या भूभागातून बाहेर जाण्याची तयारी ठेवा.

सेल्डनचे स्वत:चे मत काय आहे, हे कोणी विचारले नाही आणि त्याची पर्वाही केली नाही. परंतु सेल्डनही तिच्या निर्णयावर ठाम राहिली. परिस्थिती निवळण्यासाठी नवविवाहित दाम्पत्याला अखेर जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली. त्यानंतर आर जाम्बा या संस्थेमार्फत त्या दोघांनी कारगिलमधील ग्रामीण शाळांमध्ये काम सुरू केले. मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर सेल्डन मुलांना सामाजिक आणि भावनिक शिक्षण देऊ लागली. शाळा तिथे ग्रंथालय असायलाच पाहिजे या जिद्दीने काम करू लागली. आजमितीस सेल्डनने खूपच मोठे अंतर पार केले आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून कारगिल भागात सामाजिक बदल घडवून आणण्यात तिचा मोठा वाटा आहे. ती सध्या १४ कम्युनिटी लर्निंग सेंटर चालवते. गेल्या तीन वर्षांत १२ हजार मुलांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न तिने केला आहे.

-स्वाती देसाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या