26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeविशेषतपस्वी भगवान महावीर

तपस्वी भगवान महावीर

एकमत ऑनलाईन

‘इच्छा निरोधस्तप:’ अर्थात अमर्याद इच्छा, अपेक्षा, आकांक्षांना नियंत्रणात ठेवणे यालाच तप असे म्हणतात. हिंदीत तप म्हणजे ‘तपाना’ होय. तप केल्याने आत्मा रुपी मनावर आलेला मैल, विषय कषाय, विकार दूर होतो, असा शुद्ध आत्मा निर्विकल्प, निरामय, नि:स्वार्थी, निरपेक्ष, नि:संदेह, निराकूल असे जीवन जगतो. तप केल्याने कर्माची निर्जरा होते. तप केल्याने मुक्त व चंचल हत्ती स्वरूपी मनावर नियंत्रण प्राप्त करता येऊ शकते. एवढी शक्ती तपसाधनेत आहे. ही शक्ती ओळखण्याचे महत् कार्य ज्या ज्या महापुरुषांनी केले ते अजरामर झाले.

अशाच युगपुरुषापैकी एक जैन धर्मिय, मानवतेचे उपासक, शाकाहार सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याचे संवाहक, ‘जियो और जिने दो’चा संदेश देणारे अनेकांतवाद- स्याद्वादचे उद्गाता संयम-त्यागाचे प्रतिमूर्ती भगवान महावीर हे आहेत. चैत्र शुक्ल त्रयोदशीला जन्म घेतलेल्या महावीरांचा जन्मोत्सव साजरा करणे हे त्यांच्या आत्मसाधनेला विनम्र वंदन करणे आहे. भगवान महावीर जन्मोत्सव हा नैमेत्तिक पर्व आहे. जे पर्व महापुरुषांच्या जन्मउत्सवाच्या रुपाने सातत्यपूर्वक साजरे होतात ते नैमेत्तिक पर्व असतात. भगवान महावीरांनी राजवैभवाचा त्याग करून संसार दु:खाचे कारण दूर करण्यासाठी व विश्वकल्यासोबत आत्मकल्याणाच्या शोधासाठी अखंड तीस वर्ष तपसाधना केली. तपाद्वारे शरीर व मनाची शुद्धता होते. मन मोह, माया, क्रोध, लोभ, कषाय, द्वेष, घृणा, आसक्ती यासारख्या दुष्ट विकारांनी ग्रस्त असते. त्याच्या मनावरील या अनिर्बंध कवचाने मनुष्य सदाचारी, सद्ग्रस्थ होऊ शकत नाही. हे भगवान महावीरांनी स्वानुभवाने समाजाला सिद्ध करून दाखविले. म्हणूनच ते युगप्रवर्तक म्हटले जातात. अनिष्ट विचार व रुढी परंपरांचा युगांत करून सद्विचारांची युगवाणी त्यांनी केली.

जैनागमामध्ये बारा प्रकारचे तप वर्णिलेले आहेत. मुख्यत: दोन प्रकारचे तप असतात एक-बा तप व दोन -अभ्यंतर तप.जे तप बा पदार्थ अथवा वस्तुच्या सहाय्याने केले जातात. त्यांना बा तप म्हणतात. असे तप स्वत:सोबतच इतरांना ही दिसतात. हे तप सहा प्रकाराने केले जातात. ज्यांचा उद्देश आपल्या आचरणात शुद्ध भाव निर्माण करणे हा आहे. ते या प्रमाणे- १) उपवास म्हणजेच अनशन तपाद्वारे आपल्या अंतर्गत शक्तीच्या वाढीसाठी अन्न-जल आदिचा त्याग करणे. आपली सहनशिलता वाढविणे २) अवमौदये तप म्हणजेच आपल्या भुखेपेक्षा अल्प आहार घेऊन इच्छेला नियंत्रणात ठेवणे. यासाठी संयमाची आवश्यकता असते. ३) साधु-तपस्वी- मुनि आहार घेण्यासाठी जाताना त्यांच्या मनात जे संकल्प घेऊन ते निघतात व अनिर्बंध मनाला आवर घालतात ते वृत्तिपरिसंख्यान तप होय. ४) चंचल मन मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी उताविळ असते त्याच्या या प्रवृत्तीला रोखण्यासाठी जे तप केले जाते त्यास रस परित्याग तप म्हणतात. आपल्या आहारात जे सहा प्रकारचे रस आहेत. त्यापैकी कोणत्या-ना -कोणत्या रसाचा त्याग करून मनाला बांध घालण्याचे कार्य हे तप करते. ५) मनामध्ये राग-द्वेष इत्यादी भाव निर्माण करणा-या आसन व्यवस्थेचा त्याग करून एकांत किंवा शून्य अवस्था ज्या ठिकाणी प्राप्त होईल अशा जागेची निवड करणे विविक्त शय्यासन तप म्हणून संबोधले जाते. ६) आपले शरीर व मन सुखाच्या, आनंदाच्या शोधात एवढे वाहत जाते की सुखाची अमर्याद लालसा त्याची कधीच पूर्ण होत नाही.

नेहमी तृष्णा त्याची जीवंतच राहते. अशा वेळी शरीराला सदाचारी मनाच्या बंधनात बांधण्याचे तप म्हणजेच कायक्लेष तप होय. शरीराला त्रास किंवा क्लेष देऊन शरीर ऊर्जावान बनविता येऊ शकते. भूख, तहान सहन करणे, थंडी-उष्णता सहन करणे, शरीराला त्रास देणा-या अनेक जीवजंतू पासून त्रास सहन करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे, कोणी कितीही अपमान केला तरी क्रोध न करणे, आजारपण आल्यास दु:ख न करणे, ज्ञानी-विद्वान असला तरी अभिमान- गर्व न करणे यशप्राप्तीसाठी अपयशास खचून न जाणे इत्यादी कायक्लेष तप हे शरीरसौष्ठव वाढविण्याचेच काम करतात. या सर्व तपाद्वारे शरीर तेजस्वी, तपस्वी बनते. मनुष्याच्या अमर्याद गरजा वाढती भौतीक सुख-सुविधांची साधने, बदललेली जीवनशैली या अशा दुष्टचक्रामध्ये आजचा मनुष्य अडकलेला आहे. त्याला सन्मार्गाची आवश्यकता आहे. यासाठीच हे बा तप आज प्रासंगिक आहेत. तपाचा दुसरा मुख्य प्रकार अभ्यंतर तप होय. भगवान महावीरांनी बा आणि अभ्यंतर तपाचा कठोर साधनेद्वारे आत्मोन्नती साधली व तीस वर्षाच्या तप साधनेनंतर सतत बारा वर्ष ज्ञानदान-प्रसाराचे कार्य केले.

आपल्या उपदेश वाणीतून त्यांचे अनेक शिष्य ज्ञानी-गुणवान झाले ज्यांनी समाजाला दिशा देण्याचे पवित्र कार्य केले. अभ्यंतर तप हा बा वस्तूच्या सहाय्याने न करता मनाच्या अवस्थेतून केला जातो. मन नियंत्रणात असेल तर सर्व काही साध्य होते. मनाला भटकवू न देण्यासाठी हे तप महत्त्वाचे समजले जाते. असे म्हणतात की, ‘जो मन की भडासपर विजय पा ले उसे वीर कहते है’ किंवा ‘मन के हारे हार है मन जीते जीत’ किंवा ‘मन चंगा तो कटौती में गंगा’अशा सुविचारातून हेच समजाविण्याचा प्रयत्न आहे. अभ्यंतर तप देखील सहा प्रकाराने केले जाते ते पुढीप्रमाणे- १) प्रायश्चित्त घेणे अर्थात जानते- अज्ञानतेपणी आपल्याकडून काही दोष घडले असतील चुका झाल्या असतील तर गुरु अथवा जेष्ठ ज्ञानी व्यक्तीकडून प्रायश्चित तपाचे वृत घेणे व ते पूर्ण करणे ज्यामुळे मनावरील नाहक ओझे कमी होते. २) जे व्यक्ती सदाचारी आहेत सद्गुणी आहेत त्यांच्या प्रति नेहमी नम्र-विनयता भाव धारण करणे हा विनय तपाचा भाग आहे. ३) ज्येष्ठ-श्रेष्ठ मनुष्याची सेवा करणे, मदत करणे वैय्यावृत्य तप समजले जाते. यामुळे गुरुजणांप्रति आपल्या मनात आदर-भाव जोपासला जातो. ४) आत्मकल्याण व विश्वकल्याण साधण्यासाठी स्वाध्याय करण्याची अनिवार्य गरज मनुष्यास आहे.

स्वाध्यायातून ‘स्व’ची जाणीव मनुष्यास होते. वाचन, चिंतन, पठन, श्रवण किंवा उपदेशित करणे स्वाध्यायांतर्गत येते. त्यामुळे मनुष्याने स्वाध्याय तपाची आराधना ही जीवनापर्यंत करीत राहिली पाहिजे. ५) आपल्या शरीर व मनावर अनेकवेळा अहंकार गर्वाचे आक्रमण होते. अशावेळी या अतिक्रमणाला रोखण्यासाठी व्युत्सर्ग तप केला जातो. निश्चित कालावधीसाठी संकल्प केला जातो की मी झालेल्या चुकीबद्दल यापुढील काळात आत्मसाधना करेन. याद्वारे मनाची मलीनता दूरच होते.
६) आत्म्याला समताभाव धारण करण्यासाठी, निर्मल शांतभाव प्राप्त करून देण्यासाठी ध्यानरूपी तप महत्त्वाचा मानला जातो. आपले चित्त शुद्ध एकाग्र ठेवण्यासाठी ध्यान महत्त्वाचे मानले जाते. एकूणच तपसाधना ही मनुष्याच्या जीवनोद्धारासाठी, सार्थकी जीवनासाठी आवश्यक जीवनशैली म्हणून पाहिली पाहिजे. ही तपसाधना भगवान महावीरांनी आपल्या जीवनात साध्य केली. त्यामुळेच ते युगदृष्ट्या म्हटले जातात. हाच विचार-बोध आजच्या शुभदिनी अर्थात भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या सर्वांनी घेतल्यास आत्मशांती ते विश्वशांती पर्यंतचा प्रवास सुखमय होईल यात संदेहच नाही.

-डॉ. प्रा. महावीर सु. उदगीरकर
मोबा. ९४२३६ १४७२५

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या