26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeविशेषदीर्घकालीन फायद्याचे विलिनीकरण

दीर्घकालीन फायद्याचे विलिनीकरण

एकमत ऑनलाईन

एचडीएफसी बँकेचा ग्राहकवर्ग विस्तृत असून, त्याची संख्या ६.८ कोटी एवढी प्रचंड आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या सहभागांचे विलिनीकरण करण्याची घोषणा केल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांत दोन्ही संस्थांच्या शेअर्सनी १० टक्क्यांची उसळी घेतली. बीएसईवर एचडीएफसी बँकेचा शेअर ९.९९ टक्क्यांनी वधारून १६५६.९० रुपयांवर गेला. एचडीएफसी या तारण कर्जदात्या कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी वाढून २६९६ रुपयांवर गेला.

बाजार भांडवलीकरणाच्या दृष्टीने भारतातील तिसरी सर्वांत मोठी आर्थिक संस्था निर्माण करण्याच्या हेतूने एचडीएफसी ही तारण कर्जदार संस्था एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे. प्रस्तावित विलिनीकरणामुळे एचडीएफसी बँकेला तिचा गृहनिर्माण कर्जाचा पोर्टफोलिओ तयार करण्यास आणि सध्याची ग्राहकसंख्या वाढविणे शक्य होईल. विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक १०० टक्के सार्वजनिक भागधारकांच्या मालकीची असेल आणि एचडीएफसीचे सध्याचे भागधारक एचडीएफसी बँकेचे ४१ टक्के मालक असतील. एचडीएफसीने म्हटले आहे की, कंपनीच्या भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या एचडीएफसी या बिगरबँकिंग कर्जदात्या कंपनीच्या प्रत्येक २५ समभागांच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे ४२ भाग मिळतील. प्रस्तावित व्यवहारामुळे संबंधित भागधारक, ग्राहक, कर्मचारी यांसह विविध भागधारकांसाठी अर्थपूर्ण मूल्यनिर्मिती होईल. कारण व्यवसायच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे सर्वसमावेशक प्रॉडक्ट ऑफरिंग, ताळेबंदाची लवचिकता आणि महसूलवृद्धीच्या संधींमध्ये समन्वय साधण्याची क्षमता या घटकांचा लाभ मिळेल, असे एचडीएफसीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.

एचडीएफसीच्या उपकंपन्या आणि सहयोगी कंपन्याही एचडीएफसी बँकेत स्थानांतरित होतील. एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केक मिस्त्री यांनी गुंतवणूकदारांना सांगितले क, विलिनीकरण नियामक मंजुरीच्या अधीन असून, दोन्ही वित्तसंस्था समानतेच्या तत्त्वावर एकत्र येत आहेत. याचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना होईल. एचडीएफसी बँकेचा ग्राहकवर्ग विस्तृत असून, त्याची संख्या ६.८ कोटी एवढी प्रचंड आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या सहभागांचे विलिनीकरण करण्याची घोषणा केल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांत दोन्ही संस्थांच्या शेअर्सनी १० टक्क्यांची उसळी घेतली. बीएसईवर एचडीएफसी बँकेचा शेअर ९.९९ टक्क्यांनी वधारून १६५६.९० रुपयांवर गेला. एचडीएफसी या तारण कर्जदात्या कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी वाढून २६९६ रुपयांवर गेला. दोन दिग्गज वित्तसंस्थांच्या विलिनीकरणामुळे एचडीएफसी समूहाला बँकिंग प्लॅटफॉर्म अंतर्गत अत्यंत स्पर्धात्मक दरात गृहकर्ज पोर्टफोलिओ तयार करणे शक्य होईल. सध्या एचडीएफसी बँक एचडीएफसीच्या गृहकर्जाची विक्री करते आणि त्या मोबदल्यात शुल्क घेते. प्रस्तावित व्यवहार एचडीएफसी बँकेला तिचा गृहकर्ज पोर्टफोलिओ तयार करण्यास आणि सध्याचा ग्राहकाधार वाढविण्यास सक्षम करेल, असे बँकेचे म्हणणे आहे.

विलिनीकरणामुळे २५.६१ लाख कोटी रुपयांचा प्रचंड मोठा ताळेबंद असणारी संस्था अस्तित्वात येईल. आतापर्यंत देशातील सर्वांत मोठ्या बँकेच्या म्हणजेच स्टेट बँकेचा ताळेबंद आजमितीस सर्वांत मोठा असून तो ४५.३४ लाख कोटींचा आहे. एचडीएफसी बँक ही देशातील दुस-या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत एचडीएफसी बएकेचा ताळेबंद १७.७४ लाख कोटी रुपयांचा आहे. एचडीएफसी लिमिटेडच्या भारतातील सेवा केंद्रांची संख्या ४४५ आहे. या केंद्रांचा उपयोग सर्वसमावेशक अशा बँकिंग सेवांच्या क्रॉस सेल वाढविण्यासाठी केला जाईल. एचडीएफसी लिमिटेडकडे केवळ गृहकर्जाचे व्यवहार पूर्ण करणारा प्रशिक्षित कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे विलिनीकरणामुळे तयार होणा-या वित्तसंस्थेला मोठे बळ मिळेल. प्रस्तावित विलिनीकरणामुळे बँकेचे असुरक्षित कर्जांचे प्रमाण कमी होईल. एक्सपोजर जास्त नसताना अधिक उत्पन्नामुळे बँक आपले क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जे आक्रमक पद्धतीने वाढवत होती. विलिन झालेली संस्था केवळ असुरक्षित कर्ज एक्सपोजरच कमी करणार नाही तर अधिक कर्जे अंडरराइट करण्याची क्षमताही प्रदान करेल.

कमी व्याजदरात गृहकर्ज दिल्याने निर्माण होणारा मोठा ग्राहकवर्ग हा एचडीएफसीला विलिनीकरणामुळे मिळणारा सर्वांत मोठा फायदा असेल. रिअल इस्टेट क्षेत्र आणि गृहकर्जाचे क्षेत्र यांच्यात घनिष्ट संबंध असतो. विलिनीकरणामुळे कमी व्याजदराने गृहकर्ज मिळू लागले तर कर्जाचा ग्राहकवर्ग जसा वाढेल, त्याचप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्राची बाजारपेठही वाढणार आहे. अर्थव्यवस्थेतील कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी आगामी काळात बँकांचा आकार वाढण्याची गरज आहे. त्यामुळेच या क्षेत्रात विलिनीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. अशा काही घटनांमध्ये बँका आणि एनबीएफसीचे विलिनीकरणही आगामी काळात दिसून येऊ शकते. एनबीएफसीच्या कर्जाचा आवाका आणि क्षेत्र मर्यादित असते. गृहबांधणी क्षेत्रासाठी स्वस्त कर्जाची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण होईल, अशी अपेक्षा ब-याच कालावधीपासून व्यक्त होत होती. दोन्ही वित्तसंस्थांच्या भागधारकांसाठी हा एक दीर्घकालीन लाभ देणारा ‘विन-विन’ व्यवहार आहे. दोन्ही कंपन्यांना स्पर्धेतून मार्ग काढण्यासाठी विलिनीकरणाचा मोठा लाभ होणार असून, त्यात गुंतवणूक करणा-यांचाही त्यामुळे लाभ होणार आहे.

रेरा कायद्याची अंमलबजावणी, गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा, सर्वांसाठी परवडणारी घरे यांसारखी अनेक पावले उचलली गेल्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रात वित्तपुरवठा करण्याचा व्यवसायही वृद्धिंगत होणे अपरिहार्य होते. बँका आणि बिगरबँकिंग वित्तसंस्थांच्या नियमांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सुसूत्रता दिसून येत होती. त्यामुळेही विलिनीकरणाची प्रक्रिया सुलभ होऊ शकली, असे एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेतील पतवाढीचा वेग या निर्णयामुळे वाढणार असून, परवडणारी स्वस्त घरे उभारणा-या प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

एचडीएफसी इन्व्हेस्टमेन्ट लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्ज लिमिटेड या दोन्ही एचडीएफसीच्या उपकंपन्या असून, त्या एचडीएफसी बँकेत विलिन होणार आहेत. विलिनीकरणाची प्रक्रिया २०२४ च्या दुस-या किंवा तिस-या तिमाहीपर्यंत पूर्ण होणार आहे. विलिनीकरणाची घोषणा होताच शेअर बाजारात दोन्ही संस्थांच्या शेअर्सच्या दरांनी घेतलेली उसळी पाहता विलिनीकरणाचे परिणाम सांगण्याची गरजच राहिली नसावी. मुळात कोणत्याही क्षेत्रात वित्तपुरवठा मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आता निर्माण झाली आहे. क्षेत्र कोणतेही असो; उत्पादक मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतो आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक प्रचंड असते. त्यामुळे वित्तसंस्था आणि बँकांचे स्वरूपही मोठे व्हायला पाहिजे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण ही त्या दिशेने होणारी प्रक्रिया असून, निर्माण होणा-या संस्थेचा आकार प्रचंड असणार आहे.

पायाभूत संरचनांच्या उद्योगात आगामी काही वर्षांत बूम असणार आहे आणि ती सर्वांच्याच दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. त्यात वित्तसंस्थांचाही समावेश आहे. क्रॉस सेलिंगमुळेही फायदा होणार आहे. गृहनिर्माणाला पायाभूत सुविधेचा दर्जा दिल्यामुळे या क्षेत्राशी निगडीत बँकिंग क्षेत्रही वेगाने प्रगती करणार आहे. गृहनिर्माणाच्या क्षेत्रात ब-याच वर्षांचा अनुभव असलेली एचडीएफसी लिमिटेड ही संस्था बँकिंग क्षेत्रातील क्रमांक दोनच्या संस्थेत म्हणजे एचडीएफसी बँकेत विलीन होणे म्हणजे केवढी मोठी आर्थिक ताकद तयार होते, याचा अंदाज गुंतवणूक आणि बँकिंग क्षेत्रातील माहीतगारांना आहेच. या सर्व कारणांमुळे एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण आगामी काळात महत्त्वाचे आणि लाभदायक ठरणार आहे.

-सीए संतोष घारे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या