18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeविशेषनैतिक मूल्यांची रुजवण करणारा संग्रह ‘शब्दमोती’

नैतिक मूल्यांची रुजवण करणारा संग्रह ‘शब्दमोती’

एकमत ऑनलाईन

व्यंकटेश काटकर लिखित ‘शब्दमोती’ (विचार-सुविचार संग्रह) हाती आला आणि परम पूज्य पांडुरंग शास्त्री यांच्या या सुविचाराने मन विचारप्रवण झाले. ‘नैतिक शिक्षणाचा पाया आत्मसन्मान हा असला पाहिजे. एकदा का आत्मसन्मान वाढला म्हणजे मग दुस-याच्या घामाचे मी कधीही खाणार नाही व घेणार नाही ही वृत्ती निर्माण होते. आजच्या आधुनिक जगात माणसाने ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचे पंख लावून उंच भरारी घेतली. या भरारीतून माणूस सुखी झाला का? या प्रश्नाचे उत्तर कठीणच. काहीतरी मिळवण्यासाठी आपण काहीतरी गमावत आहोत काय? काय मिळवले यापेक्षा काय गमावले याची यादी निश्चितच मोठी आहे. परम पूज्य आठवले गुरुजी आपल्या सुविचारातून नैतिकतेचे महत्त्व सांगतात. ही नैतिकता खूप महत्त्वाची आहे. ‘जगातील सगळं काही मलाच मिळायला पाहिजे’ या वृत्तीने झपाटलेल्या माणसाला आज नक्की त्याचा विसर पडला म्हणून आज संत-महंत-विचारवंत यांनी ज्या नैतिक मूल्यांची ठेव आपल्यासाठी ठेवली त्याचे स्मरण करून ती आत्मसात करणे अत्यंत आवश्यक वाटते. या संत-महंत-विचारवंतांच्या सुविचाराचा खजिना सापडतो ‘शब्दमोती’ या संग्रहात.

मानवाचे सहावे अदृश्य इंद्रिय ‘मन’. या मनाच्या वरदानामुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा निराळा. शरीरावर योग्य संस्कार होणे गरजेचे तसेच मनावर योग्य संस्कार होणेही महत्त्वाचे, नव्हे मनावरच्या योग्य संस्कारामुळे शरीराला वळण लागते. कुटुंब, शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शरीर-मनावर योग्य संस्कार करण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होतच असते. दैनंदिन परिपाठ, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, नैतिक मूल्यतासिका, अभ्यासक्रम ही मुलांवर संस्कार करण्याची साधनं. चांगल्या पुस्तकातून ही मूल्यांची रुजवण होत असते. लेखक व्यंकटेश काटकर यांनी आपल्या ‘शब्दमोती’ संग्रहात देश-विदेशातील तत्त्ववेत्ते विचारवंत, संत यांच्या विचारपुष्पांना एकत्र गुंफून त्यांची सुंदर विचारमाला आपल्यासमोर ठेवली आहे.

‘शब्दमोती’तील विचार मौल्यवान आहेत. स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, भगवान गौतम बुद्ध, संत एकनाथ, लोकमान्य टिळक, चार्ली चॅप्लिन, विनोबा भावे, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत बहिणाबाई, साने गुरुजी, संत नामदेव, अशा कितीतरी संत-महंत-विचारवंतांच्या जवळपास एक हजार सुविचारांचा संग्रह अत्यंत वाचनीय आहे. यात आलेले सर्व सुविचारपुष्प विचारप्रवण आहेत जसे-१) केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे तर ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे विद्या. २) शिक्षक विद्यार्थ्यांच्या हृदयात असावा. ३) एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट करतो. ४) बोलून विचार करण्यापेक्षा विचारांनी नम्रपणे बोलावे. ५) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक. ६) पराक्रम हा न बोलता करावा. ७) विचार बदला, जगही बदलेल. ८) अविचाराने आत्मघात होतो. ९) दुस-याच्या मनाचा विचार करणारा खरा सुशिक्षित. १०) क्रोधाला लगाम घालण्यासाठी मनाइतका उत्तम मार्ग नाही.

असे अनेक सुंदर सुंदर विचार प्रस्तुत संग्रहात आपल्याला पाहायला, वाचायला मिळतात. हा विचारसंग्रह वाचताना शाळेतील मूल्यशिक्षणाची तासिका डोळ्यासमोर आली. शालेय जीवनात झालेले मूल्यसंस्कार मानवाच्या जीवनाची अनमोल शिदोरी असते. ज्यामुळे जीवनाची इमारत पक्की होते म्हणून प्रत्येक शिक्षकांनी, पालकांनी आपल्या मुलांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कार करताना महान पुरुषांच्या सुविचारांचा वारसा आपल्या मुलांना दिला पाहिजे त्यासाठी व्यंकटेश काटकर यांचा ‘शब्दमोती’ हा संग्रह अत्यंत उपयुक्त आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर पालक-शिक्षक, सुजाण नागरिकांसाठी संग्रा असा हा संग्रह मूल्य संस्काराची शिदोरी आहे.
काही सुविचार विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त, तर काही जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे, काही जीवनाची सार्थकता पटवणारे, काही पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे, काही अध्यात्मवादी, काही शिक्षणाचा खरा अर्थ दाखवणारे, काही मानवाच्या मनाचा तळ शोधणारे. एकूणच काय तर जीवनाच्या विविध पैलूंवर विचार करायला भाग पाडणारे असे हे सुविचार अनेक विचारवंतांना आपल्यासमोर ठेवतात.

आदर्श शिक्षक, कलाकार असणारे व्यंकटेश काटकर यांनी आपले हे विचारपुष्प (शब्दमोती) मातृहृदयी शिक्षक साने गुरुजी यांना समर्पित केले. इसाप प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केलेला हा सुविचारसंग्रह, संतोष धोंगडे यांनी साकारलेले समर्पक असे मुखपृष्ठ, एकूणच काय तर अत्यंत वाचनीय असा विचारांचा हा ‘शब्दमोती’ प्रत्येक घरात, शाळेत असायलाच हवा. व्यंकटेश काटकर यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

-४ स्वाती कान्हेगावकर,
नांदेड मो. ९४२३१ ३७१६०

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या