26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेष‘पन्नाशी’मध्ये संकट नेतृत्वाचे

‘पन्नाशी’मध्ये संकट नेतृत्वाचे

एकमत ऑनलाईन

अण्णा द्रमुक या पक्षाची स्थापना १९७२ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांनी केली होती आणि नंतर या पक्षाला जे. जयललिता यांनी बळ दिले होते. २०१६ मध्ये जयललिता यांचे निधन झाल्यानंतर अण्णा द्रमुक एका अभूतपूर्व अशा नेतृत्वविषयक संकटाचा सामना करीत आहे. शशिकला, पनीरसेल्वम आणि दिनाकरन यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवता येत नाहीत. पलानीस्वामी यांच्या बाबतीत आशेचा किरण दिसतो. सुवर्णमहोत्सवी वर्षात ते पक्षाला वाचवू शकतील का?

कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा राजकीय पक्षासाठी पन्नाशी हा टप्पा महत्त्वाचा असतो. व्हिक्टर ुगो यांनी असे म्हटले होते की, चाळिशी हे तारुण्याचे म्हातारपण असून, पन्नाशी हे म्हातारपणाचे तारुण्य आहे. परंतु व्हिक्टर ुगो आज हयात असते तर अण्णा द्रमुक पक्षात सुरू असलेल्या घडामोडी पाहून व्यथित आणि चकित झाले असते. या पक्षाची स्थापना १९७२ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांनी केली होती (ते १९७७ मध्ये सत्तेवर आले आणि १९८७ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत सत्तेवर होते) आणि नंतर या पक्षाला जे. जयललिता यांनी बळ दिले होते. २०१६ मध्ये जयललिता यांचे निधन झाल्यानंतर अण्णा द्रमुक एका अभूतपूर्व अशा नेतृत्वविषयक संकटाचा सामना करीत आहे. एमजीआर यांच्या निधनानंतर दक्षिण भारतीय चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत असणा-या जयललिता अण्णा द्रमुकच्या निर्विवाद नेत्या म्हणून उदयास आल्या होत्या आणि ५ डिसेंबर २०१६ रोजी अंतिम श्वास घेईपर्यंत त्या पक्षात क्रमांक एकच्या नेत्या राहिल्या. सुरुवातीला जयललिता यांना एमजीआर यांनी मार्गदर्शन केले होते; मात्र नंतरच्या काळात जयललिता यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. त्याच काळात तामिळनाडू सरकारच्या एका सहायक पीआरओच्या पत्नी व्ही. के. शशिकला यांनी जयललिता यांच्या जीवनात प्रवेश केला. मॅट्रिक पास असलेल्या शशिकला यांनी त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. चेन्नईच्या पोएस गार्डनमध्ये जयललिता (अम्मा) यांच्या वेद निलायम या बंगल्यातच शशिकला राहू लागल्या.

१९९६ च्या निवडणुकांमध्ये जयललितांना मानहानिकारक पराभव पत्करावा लागला असला, तरी २००१ आणि २०११ च्या निवडणुकीत त्यांनी आश्चर्यकारक पुनरागमन केले होते. द्रमुक या आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाचा जयललितांनी या दोन निवडणुकांमध्ये धुव्वा उडवला होता. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ३९ पैकी ३७ जागा जिंकून अण्णा द्रमुकने वरचष्माच सिद्ध केला होता. २०१६ च्या निवडणुकीतही जयललिता यांनी विजय संपादन केला; परंतु तोपर्यंत त्या स्वत: आरोग्य आणि ऊर्जा गमावून बसल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अण्णा द्रमुकच्या सुवर्णयुगाचा अस्त झाला.

सहा डिसेंबरच्या पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे ओ. पनीरसेल्वम यांना शशिकला आणि त्यांच्या भाच्याच्या नेतृत्वाखालील मंडळींनी मार्गातून हटविले होते. या मंडळीने ५ आणि ६ डिसेंबर २०१६ रोजी मध्यरात्री वेद निलायम बंगल्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले होते. शशिकला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला ऑक्टोबर २०११ मध्ये जयललिता यांनी वेद निलायममधून बाहेर काढले होते. या मंडळींबरोबर कोणताही संपर्क करू नये, असे त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना बजावले होते. परंतु शशिकला यांना केवळ त्यांच्या आक्का (जयललिता) यांची सेवा करण्यातच रस आहे आणि त्या राजकारणात प्रवेश करू इच्छित नाहीत, असे खुद्द शशिकला यांनी एप्रिल २०१२ मध्ये जाहीर केल्यानंतर त्यांना पुन्हा जयललितांच्या बंगल्यात प्रवेश मिळाला. त्यांचा भाचा टीटीव्ही दिनाकरन यांनाही २०११ मध्ये वेद निलायममधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. तेही जयललितांच्या निधनानंतर वेद निलायममध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरले. शशिकला यांनी त्यांना उपसरचिटणीस नियुक्त केले. पक्षात आतापर्यंत ते कुणाला ठाऊकच नव्हते.

डिसेंबर २०१६ पर्यंत शशिकला यांना अण्णा द्रमुकच्या कार्यवाहक सरचिटणीस पदापर्यंत पदोन्नती मिळाली होती. तत्कालीन लोकसभा उपाध्यक्ष थम्बी दुराई यांनी सरचिटणीसपदी शशिकला यांना पदोन्नती देण्याची थेट शिफारस केली होती. पक्षप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांतच दुराई यांनी मुख्यमंत्रिपदी त्यांची निवड व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर वेगवान घटना घडत गेल्या. फेब्रुवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ पक्षाने एका विशेष सत्रात सर्वसंमतीने शशिकला यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली.

शपथग्रहण समारंभ १५ फेब्रुवारीला निश्चित करण्यात आला. परंतु तत्पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सर्वकाही बदलून गेले. शशिकला, त्यांचा भाचा सुधाकरन आणि चुलत भाऊ इलावरसी यांनी ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याबद्दल त्यांना दोषी मानणारा कर्नाटकच्या विशेष न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ग्रा मानला होता. त्यानंतर त्यांना चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली. ज्या दिवशी शशिकला यांना मुख्यमंत्री बनायचे होते, त्याच दिवशी मुख्यमंत्रिपद पलानीस्वामी यांच्याकडे सोपवून त्यांनी कारागृहाची वाट धरली. पलानीस्वामी यांनी कारभाराला सुरुवात केली; परंतु दिनाकरन यांनी त्यांचा रस्ता रोखायला सुरुवात केली. जयललिता यांच्या आरकेनगर मतदारसंघातून निवडून येणे आणि पलानीस्वामी यांना पराभूत करणे हे दिनाकरन यांचे लक्ष्य होते. शशिकला जेलमध्ये असल्यामुळे पलानीस्वामी यांनी भाजपमधील आपल्या संपर्कांचा वापर पनीरसेल्वम यांना वश करण्यासाठी सुरू केला. पनीरसेल्वम यांनी अनिच्छेनेच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले होते.

सप्टेंबर २०१७ मध्ये एका सर्वसाधारण बैठकीद्वारे शशिकला आणि दिनाकरन यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. दिनाकरन यांनी अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम नावाचा नवा पक्ष स्थापन केला आणि ते आजही राज्याच्या राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. २०२१ मध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने अण्णा द्रमुकचा पराभव केला. परंतु विजयाचे अंतर फारसे नव्हते. पनीरसेल्वम हे पलानीस्वामींना विरोधी पक्षनेतेपद दिले गेले नाही म्हणून नाराज आहेत. पक्षातील दरी आणखी रुंदावण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. पलानीस्वामी यांच्या विश्वासू सहका-यांवर (सर्वजण गौंडर समाजातील आहेत) अधिका-यांकडून छापेमारी करण्यात येत आहे. पनीरसेल्वम आणि शशिकला हे दोघेही शक्तिशाली अशा थेवर समाजातील आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांच्याविरुद्ध धर्मयुद्ध पुकारल्याची घोषणा करूनसुद्धा त्यांच्यासमवेत आहेत. आपले अस्तित्व ज्या पक्षामुळे आहे, त्या पक्षाचे नेतृत्व करण्याची ताकद शशिकला यांच्यात आहे का, हा मुख्य प्रश्न आहे.

जयललिता यांच्यासमवेत पडद्याआडच्या हालचालींमध्ये सक्रिय राहण्याव्यतिरिक्त शशिकला यांनी एक नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण केलेली नाही. अण्णा द्रमुकमध्ये जर उभी फूट पडत असेल, तर द्रमुकला ते हवेच आहे आणि असे झाल्यास त्याचा सर्वाधिक लाभ स्टॅलिन यांनाच मिळेल. जयललिता यांनी पनीरसेल्वम यांची निष्ठा पाहूनच त्यांना दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडले होते. वस्तुत: पनीरसेल्वम यांच्याकडे पलानीस्वामी यांच्यासारखे कोणतेच गुण नाहीत, असे जयललितांच्या निकटवर्तीयांकडून त्यांना सांगण्यात आले होते. अण्णा द्रमुकची सुवर्णजयंती हाच त्या पक्षाचा अखेरचा मुक्काम ठरू शकतो. शशिकला, पनीरसेल्वम आणि दिनाकरन यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवता येत नाहीत. पलानीस्वामी यांच्या बाबतीत आशेचा किरण दिसतो. अण्णा द्रमुकचा बचाव करण्यासाठी ईश्वराने त्यांना शक्ती द्यावी, एवढेच आपण म्हणू शकतो.

-के. श्रीनिवासन

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या